ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत

ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत

तासगाव - महिनाभर हवामान सतत बदलते आहे. त्यामुळे हंगामाच्या तोंडावरच द्राक्ष बागायतदारांचे हाल होत आहेत. ढगाळ हवामानामुळे ‘टेन्शन’ पुन्हा वाढले आहे. पावसाची शक्‍यता कमी असली तरी तापमानातील चढउतारामुळे भुरी, डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्‍यतेने द्राक्ष शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

द्राक्ष हंगाम जवळ आला आहे. मणेराजुरी, सोनी, बेडग, खंडेराजुरीतील द्राक्षे डिसेंबरमध्ये बाजारपेठेत येतील अशी स्थिती आहे. छाटण्यानंतर बहुतांश बागा ३० ते ६० दिवसांत हाती येणार आहेत. अशा स्थितीत तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाने डाऊनी मिलेड्युचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागाच्या बागा सोडून द्याव्या लागल्यात. डाऊनीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होत आहे. 

पाच दिवसांपासून थंडी कमी होऊन तापमान वाढले आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज तर पावसाची स्थिती निर्माण झाली. द्राक्ष पीक अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे हवामानातील थोड्या बदलाचाही परिणाम होतो. भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असते. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बुरशीनाशकाच्या फवारण्या सुरू आहेत. भुरी बरोबर डाऊनीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता तज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे. 
वर्षातून एकदा येणारे पीक द्राक्षे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून द्राक्ष बागायतदारांची धडपड सुरू आहे. रात्रंदिवस बागांत औषध फवारणीमुळे पंपांची घरघर वाढली आहे. शेतकरी रात्रंदिवस बागेत तळ ठोकून आहेत. 

तीन-चार दिवस ढगाळी वातावरण...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजपासून पुढील तीन दिवस ढगाळी, तर मंगळवारी (ता. २१) रात्री हलक्‍या पावसाचा अंदाज आहे. सध्याच्या वातावरणाने भुरीसह डाऊनीचा धोका जास्त आहे. विविध कंपन्यांची औषधे फवारून रोग येऊ नये म्हणून, तर काही शेतकरी आलेल्या रोगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

एका फवारणीसाठी तीन हजारांवर खर्च
गेल्यावर्षी पूर्ण हंगाम हवामान चांगले असल्याने खर्च कमी, उत्पादन जास्त अशी स्थिती होती. यावर्षी छाटण्यांपासून हवामानातील फेरबदलाने द्राक्ष बागायतदार हैराण झालेत. औषधांचा एक स्प्रे घेण्यासाठी ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत खर्च वाढतो. तीन आठवड्यांत डाऊनीची भीती, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने चार स्प्रे जादा वाढणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com