मटकेवाल्यांची हद्दपारी कागदावरच..! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सांगली  - मटकेवाल्यांच्या पाच टोळ्यांना जिल्ह्यातून तडीपार करून पोलिसांनी आपली पाठ थोपटली खरी... पण, अवघ्या महिन्यातच तडीपार मटकेवाले शहरात सापडू लागले. पोलिसांनी आठवडाभरात आठ-दहा मटकेवाल्यांना पुन्हा ताब्यात घेतले. अजून किती आहेत ते स्पष्ट झालेले नाही. पण, मटकेवाल्यांची तडीपारी केवळ कागदावरच झाली आहे का, असा सवाल उभा राहिला आहे. 

सांगली  - मटकेवाल्यांच्या पाच टोळ्यांना जिल्ह्यातून तडीपार करून पोलिसांनी आपली पाठ थोपटली खरी... पण, अवघ्या महिन्यातच तडीपार मटकेवाले शहरात सापडू लागले. पोलिसांनी आठवडाभरात आठ-दहा मटकेवाल्यांना पुन्हा ताब्यात घेतले. अजून किती आहेत ते स्पष्ट झालेले नाही. पण, मटकेवाल्यांची तडीपारी केवळ कागदावरच झाली आहे का, असा सवाल उभा राहिला आहे. 

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जूनमध्ये मटकेवाल्यांवर धडक कारवाई करून 192 मटका बुकींना जिल्ह्यातून एक किंवा दोन वर्षांसाठी हद्दपार केले. त्यामुळे मटका व्यवसाय बंद पडेल, अशी अटकळ होती. नागरिकांनीही अवैध व्यवसायावर अशी धडक कारवाई केल्याने समाधान व्यक्त केले. पण, हा आनंद काही फार टिकला नाही. केवळ महिना-दीड महिन्यात तडीपार मटकेवाले त्यांच्या हद्दीतच फिरताना पोलिसांना सापडले. त्यामुळे तडीपारीनंतर मटका खरेच बंद झाला होता का, असा सवाल उभा राहिला आहे. 

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात मटका जोमात असताना पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. त्या वेळी स्वत: मुख्यमंत्री व गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी "मटकेवाल्यांना ठोकून काढा' असा आदेश दिला होता. आता मटकेवाल्यांना ठोकून काढणे वगैरे काही झाले नाही, मात्र त्यांच्यावर कठोर कारवाईही झाली नाही. त्यामुळे मटका व्यवसाय सुरूच राहिला. 

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवैध व्यवसायांना प्रतिबंध घालण्यासाठी जूनमध्ये मटकेवाल्यांवर तडीपारीची कारवाई केली. भगत टोळी, जाधव टोळी, राक्षे टोळी, पाटील टोळी, जाधव टोळी अशा पाच टोळ्यांना हद्दपार करून मटक्‍याच्या साम्राज्याला त्यांनी हादरा दिला. 

जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मटकेवाल्यांना तडीपार करण्याचे धाडस पोलिस अधीक्षकांनी दाखविले. त्यामुळे त्यांचे कौतुक झाले. आता किमान दोन वर्षे मटका वगैरे बंद राहील, अशी भाबडी आशा नागरिकांना होती. पण, दारूबंदी झालेल्या गावांत जशी चोरून दारूविक्री सुरू असते, तशीच अवस्था मटकेवाल्यांच्या तडीपारीची झाली. कागदोपत्री मटकेवाले हद्दपार झाले असले, तरी ते शहरातच फिरत आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, मिरजेत झालेल्या कारवाईने मटकेवाले पुन्हा ताब्यात आल्याचे स्पष्ट झाले. 

लागेबांधे असल्यानेच... 
मटकेवाल्यांचे पोलिसांशी असलेले लागेबांधे लपून राहिलेले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय बिनबोभाट सुरू होता. स्वत: दत्तात्रय शिंदे यांनी हद्दपारीची कारवाई करण्यापूर्वी जिल्ह्यात मटका व्यवसायाविरोधात कारवाईची मोहीम केली. त्यानंतर त्यांनी सरळ या टोळ्यांना हद्दपार करण्याचे धाडस दाखविले. पण, केवळ महिनाभरानंतर मटकेवाले शहरात सापडू लागले. त्यामुळे मटकेवाले पुन्हा शहरात आल्याचे दिसून आले. 

दत्तात्रय शिंदे यांनी मटकेवाल्यांना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला. हद्दपार केलेले मटकेवाले पुन्हा शहरात दिसल्यास 24 तासांत त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र, सध्या तरी अशी कारवाई त्यांनी केलेली नाही. 

ग्रामीण भागातील मटकेवाल्यांचे काय? 
शहरातील काही मटकेवाले सापडले. अजून काही जण शहरात फिरत आहेत. पण, ग्रामीण भागातील मटकेवाल्यांचे काय? ग्रामीण भागातून हद्दपार झालेले मटकेवाले जिल्ह्याच्या बाहेर गेले असतील यावर विश्‍वास ठेवणे जरा अवघडच आहे. शिवाय, कागदाच्या चिठ्‌ठयांवर मटका घेण्याचे दिवस आता संपल्याने हद्दपार केलेले अन्‌ जिल्ह्यातच फिरणारे मटकेवाले मोबाईलवर बुकिंग घेऊन मटका लावत नसतील, असेही नाही. त्यामुळे हद्दपारी केवळ कागदावरच राहणार, असे दिसत आहे. 

पोलिसांनी मटकेवाल्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. काही जण शहरात सापडले आहेत. त्यांना ताब्यात घेतले आहे. जर हद्दपार केलेले मटका बुकी शहरात, गावात फिरताना आढळून आल्यास नागरिकांनी त्यांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
- दत्तात्रय शिंदे, पोलिस अधीक्षक 

Web Title: sangli news Gambling

टॅग्स