मधुमेहाची त्सुनामी रोखण्यासाठी सज्ज व्हा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

सांगली - भारतात आजमितीस ६२ मिलियन (६२ दशलक्ष) लोक मधुमेह व्याधीने ग्रासले आहेत. एकूण प्रौढ लोकसंख्येच्या ७.१ % इतके प्रमाण आहे. दरवर्षी दहा लक्ष लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे होतो. जागतिक स्तरावर भारताचा मधुमेहाच्या रुग्णसंख्येत पहिला नंबर लागतो. अगदी लहान वयातही हा ‘गोड’ आजार विळखा घालू लागला आहे. मधुमेहाची ही 
त्सुनामी रोखण्याची गरज आज निर्माण झाली आहे. 

सांगली - भारतात आजमितीस ६२ मिलियन (६२ दशलक्ष) लोक मधुमेह व्याधीने ग्रासले आहेत. एकूण प्रौढ लोकसंख्येच्या ७.१ % इतके प्रमाण आहे. दरवर्षी दहा लक्ष लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे होतो. जागतिक स्तरावर भारताचा मधुमेहाच्या रुग्णसंख्येत पहिला नंबर लागतो. अगदी लहान वयातही हा ‘गोड’ आजार विळखा घालू लागला आहे. मधुमेहाची ही 
त्सुनामी रोखण्याची गरज आज निर्माण झाली आहे. 

यासाठी आयएमए आणि सकाळ माध्यम  समूहातर्फे मधुमेह तज्ज्ञ डॉ. मिलिंद पटवर्धन यांचे ‘मधुमेहाची त्सुनामी लाट सोपवता येईल काय?’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असून अध्यक्षस्थानी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी आहेत. आयएमए सांगलीचे अध्यक्ष डॉ. बी. एम. पाटील, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र मोहिते उपस्थित राहणार आहेत.भारतात मधुमेही रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी समाजात जागृती करणे आवश्‍यक आहे.

काही वर्षांपूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर होणारा मधुमेह आता तिशीच्या नव्हे तर विशीच्या आतही होऊ लागला आहे. गनिमीकाव्याने शरीरावर हल्ला करणारा हा ‘गोड’ आजार रोखण्याची  गरज आहे. त्यामुळे तो होऊच नये यासाठी कोणती काळजी घ्यावी यादृष्टीनेही आता प्रबोधन सुरू झाले  आहे. मधुमेहाला आळा घालण्यासाठी नागरिकांना त्याची माहिती होण्याच्या दृष्टीने मधुमेह तज्ज्ञ डॉ. मिलिंद पटवर्धन यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच यावेळी सावळजमधील शेतकरी प्रकाश पाटील यांचे कीटकनाशक औषधे व त्याचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावर व्याख्यान होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव डॉ. अशोक धोंडे यांनी केले आहे.

भारतात सर्वाधिक रुग्ण...
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सर्वाधिक मधुमेहींची संख्या भारतात असून येथील रुग्णांचा आकडा पाहता मधुमेह ही भविष्यात राष्ट्रीय समस्या निर्माण करू शकते. सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल असे एकही औषध उपलब्ध नाही. ज्यांना झाला आहे त्यांनी काय काळजी घ्यावी आणि मुळात हा आजार आपल्या वाटेला येऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी, याचे चित्रफितींसह सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे. तसेच अन्नपदार्थांवरील औषधांचा होणारा परिणाम आणि खबरदारी कोणती घ्यावी याबाबतही मार्गदर्शन होणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी मोफत आहे.

वेळ - रविवार, ता. ६ ऑगस्ट, सकाळी दहा वाजता.
स्थळ - विष्णुदास भावे नाट्य मंदिर, सांगली.