निवडणुकीपूर्वी जिल्हा दुष्काळमुक्त  - गिरीष महाजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

सांगली - म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन योजना पूर्ततेसाठी सरकारने भरीव पाच हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. ठिबकची सक्ती, बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनच्या पाणी वापराने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जमीन निवडणुकीपूर्वी दोन वर्षांत कायमस्वरूपी सिंचनाखाली आणू, असा विश्‍वास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी येथे व्यक्त केला. राज्यातील बाजार समित्या ओस पडत असताना सांगली बाजार समितीच्या कारभाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

सांगली - म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन योजना पूर्ततेसाठी सरकारने भरीव पाच हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. ठिबकची सक्ती, बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनच्या पाणी वापराने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जमीन निवडणुकीपूर्वी दोन वर्षांत कायमस्वरूपी सिंचनाखाली आणू, असा विश्‍वास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी येथे व्यक्त केला. राज्यातील बाजार समित्या ओस पडत असताना सांगली बाजार समितीच्या कारभाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळीराजा ऍप आणि बेदाणा ऑनलाईन मार्केटिंगचे उद्‌घाटन मंत्री महाजन यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार पतंगराव कदम, खासदार संजय पाटील प्रमुख पाहुणे होते. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील अनुपस्थित होते. 

मंत्री महाजन म्हणाले,""शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. सांगली बाजार समितीतून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळतो आहे. शेती विकासासाठीच आम्ही सिंचन योजनांसाठी पाच हजार कोटी निधी मंजुरीसाठी प्रयत्न केला. त्याला यशही आले. हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनीही मान्य केले. उपलब्ध पाण्यात जास्तीत जास्त बागायतीसाठी ठिबकची सक्ती केली आहे. परंपरागत शेती सोडून आधुनिकतेकडे सर्वांनी वळावे.'' कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार पतंगराव कदम, खासदार संजय पाटील यांची भाषणे झाली. सभापती प्रशांत शेजाळ यांनी बाजार समितीचा आढावा घेतला. त्यांनी हळद सौदे रस्त्यावर होत असल्याचे सांगितले. बाजार समिती विस्ताराला मंजुरी आणि हळद, मिरची, धने जीएसटीतून वगळण्याची मागणी केली. आमदार सुरेश खाडे, दिनकर पाटील, कॉंग्रेसचे पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत, मकरंद देशपांडे, अण्णासाहेब कोरे, दिनकर पाटील उपस्थित होते. उपसभापती रामगौंडा संती यांनी आभार मानले. 

""सांगली बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. येथे निर्यात केंद्र उभारण्याचा प्रस्ताव द्या, तो तातडीने मंजूर केला जाईल. जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा करण्यासाठी केंद्र फायदेशीर ठरेल. हळद, गूळ, बेदाण्याची येथे मोठी उलाढाल होईल.'' 
- मंत्री सदाभाऊ खोत 

काही मंडळी स्वत:च्या महत्त्वाकांक्षेपोटी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला टार्गेट करीत असल्याची टीका खासदार संजय पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता केली. माझं कोंबडं ओरडत नाही, तोपर्यंत सूर्य उजडायला नको पाहिजे, सर्व माझ्या तंत्राने चालले पाहिजे, असे म्हणून जाणीवपूर्वक काही भाजपच्या मंत्र्यांकडे तक्रारी करीत आहेत. मात्र पणन राज्यमंत्री आणि मी बाजार समितीच्या पाठीशी राहणार आहे. चांगल्या संस्थेत राजकारण येऊ नये, म्हणून आपण मदत करणार आहे. परंतु चुका आढळल्या तर कान धरू. 
- खासदार संजय पाटील 

""आम्ही सत्तेत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे सिंचन योजनांसाठी भरीव निधी देऊ शकलो नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री महाजन यांच्यामुळे भरीव निधी मिळाला. याबद्दल मी मुख्यमंत्री व महाजन यांचा जाहीर सत्कार करणार आहे. आता पै-पै चा खर्च आणि इंचन इंच जमीन पाण्याखाली आणण्यासाठी प्रयत्न हवेत.'' 
- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम 

जत, सांगोला भागाला पाण्यासाठी प्रयत्न 
दरम्यान, यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणाले,""कोयनेचे पाणी कर्नाटकला दिले जाईल. त्या बदल्यास कर्नाटकातून जत आणि सांगोला भागात पाणी देण्यासाठी लवकरच एक मंत्रालय पातळीवर दोन्ही राज्यांची बैठक घेतली जाईल. त्यात दोन्ही राज्यांचे हित पाहिले जाणार आहे.''