अंकलीत गोवा बनावटीचा दारूसाठा पकडला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सांगली - राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, सांगलीच्या अधीक्षिका कीर्ती शेडगे यांच्या विशेष भरारी पथकाने अंकली फाट्यावर बेकायदा विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या सुनील सुरेश यादव (वय ३७, सर्किट हाऊसजवळ, सांगली) याला अटक केली. यादवकडून दारूच्या ३०५ बाटल्या आणि मोटार असा सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अधिक माहिती अशी, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटर अंतरात दारू विक्री बंदचे आदेश दिल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उत्पादन शुल्कच्या आयुक्त अश्‍विनी जोशी यांनी आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्त दरेकर यांनी कोल्हापूर  विभागात  विशेष भरारी पथकाची स्थापना केली आहे. पथकाने गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी छापे  मारून कारवाई केली आहे. काल सायंकाळी गोवा राज्यातील विदेशी बनावटीच्या दारूची जिल्ह्यातून तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली.

विभागीय आयुक्त दरेकर, अधीक्षिका शेडगे यांनी स्वत: अंकली फाट्यावर पथकासह उपस्थित राहून सापळा रचला. तेव्हा मोटार (एमएच ०९ एक्‍यू ४८७२) अडवली. मोटारीतील यादवला ताब्यात घेऊन झडती घेतली. तेव्हा गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या ३०५ बाटल्या मिळाल्या. दारूसाठा आणि मोटार असा सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यादवला अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. निरीक्षक सुरेश चौगुले तपास करत आहेत.

विशेष भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक संजय वाडेकर, अतुल पाटील, जी. पी. थोरात, युवराज कांबळे, संतोष बिराजदार, श्रीपाद पाटील, सुशांत बनसोडे, मीना देवल, वसंत घुगरे यांचा कारवाईत सहभाग होता.

येथे तक्रार करा-
आपल्या परिसरात बनावट, परराज्यातील दारूची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास मोबाईल क्र. ७७६८९९७७९९ वर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे विभागीय आयुक्त दरेकर यांनी सांगितले.