डबघाईला आलेल्या संस्था सरकारने ओट्यात घ्याव्यात - राज्यपाल श्रीनिवास पाटील 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

सांगली - डबघाईला आलेल्या सहकारी संस्थांना सरकारने पोटाशी धरावे, ओट्यात घ्यावे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. 

सांगली - डबघाईला आलेल्या सहकारी संस्थांना सरकारने पोटाशी धरावे, ओट्यात घ्यावे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील उत्कृष्ट विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, त्यांचे सचिव, जिल्हा बॅंक शाखा, त्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपाल श्री. पाटील यांच्या हस्ते सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्काराने गौरवले. त्यावेळी ते बोलत होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख अध्यक्षस्थांनी होते. आमदार जयंत पाटील, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार हाफिज धत्तुरे उपस्थित होते. 

राज्यपाल पाटील म्हणाले, "" जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षापर्यंत अनेक सहकारी संस्था बुडल्या म्हणून नका, डबघाईला आल्या. त्यांना सहकाराच्या माध्यमातून उभा करण्याचे सहकारमंत्री देशमुख यांचा प्रयत्न चांगला आहे. सरकारने अशा संस्थांना ओट्यात घेण्याची गरज आहे. शक्‍य तेवढी मदत करुन त्यांना उभारता येईल. त्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प सांगलीतून तयार व्हावा. सहकाराच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब विखे- पाटील, वसंतदादा पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून राजारामबापू पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी काम केले. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बॅंकेचा पाया घातला. त्याच्या आर्दशावरच बॅंकेची वाटचाल आहे. त्यांच्या नावांने राज्यभरातील सहकारी संस्थांना पुरस्कार अभिमानाची बाब ठरेल. बॅंकेने भविष्यात 5600 कोटी ठेवीचे उद्दिष्ट ठेवावे.'' 

सहकार मंत्री देशमुख म्हणाले,"" जिल्ह्यातील 748 विकास सोसायट्यांनी ठेवी गोळा करुन सक्षम व्हावे. गावचा विकास करावा. किमान एकतरी व्यवसायिकांस उभे करावे. कर्जमाफीसाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे. '' 

आमदार जयंत पाटील म्हणाले,"" आमच्या मागणीप्रमाणेच कर्जमाफी मिळाली. कर्जमाफीची प्रमाणपत्राऐवजी प्रत्यक्षात खात्यावर रक्कम जमा झाल्यावर अधिक बोलता येईल. नेते शरद पवार यांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही माफीची मागणी सरकारने मान्य केली. 35 हजार कोटी कर्जमाफीचे आम्ही स्वागत करतो. जिल्हा बॅंक अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व सहकाऱ्यांनी बॅंकेबद्दल विश्‍वास निर्माण केला आहे.'' 

बॅंक अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले,"" जिल्हा बॅंक जडणघडणीत गुलाबराव पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. शांत स्वभावाचे अध्यक्ष ही त्यांची ख्याती होती. त्यांचेच अनुकरण, लोकांचा विश्‍वास संपादन करुन बॅंकेची घौडदोड सुरु आहे. आगामी वर्षापासून त्यांच्या नावाने राज्यभरातील उकृष्ट संस्थांना पुरस्कार दिले जातील. बॅंकेने ठेववाढ, पिक कर्जवाढ आणि व्याजदर कपात केली. सहकार मंत्री देशमुख यांच्या सूचनेनुसार काम सुरु आहे.''

प्रतिष्ठानचे सदस्य पृथ्वीराज पाटील म्हणाले,"" सहकाराचे आधारस्तंभ यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, राजारामबापू आणि गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याच्या सहकार चळवळीचा वेगळा आदर्श निर्माण केला. गुलाबराव पाटील यांच्या नावाने पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. पुरस्काराच्या प्रेरणेने कामाला आणखी गती येणार आहे.''

जेष्ठ नेते बापुसाहेब पुजारी, आनंदराव मोहिते, जिल्हा बॅंकेचे सीईओ एम. बी. रामदुर्ग, सरव्यवस्थापक मानसिंग पाटील, सिंकदर जमादार, विक्रम सावंत, महेंद्र लाड, गणपती सगरे, जिल्हा सहकार उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, बाजार समिती संचालक प्रशांत शेजाळ उपस्थित होते. उपाध्यक्ष तथा झेडपी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आभार मानले. 

 पुरस्कारप्राप्त सोसायट्या, अधिकारी... 

पुरस्कारप्राप्त- उत्कृष्ट विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या-

दक्षिण भाग भिलवडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी भिलवडी ( प्रथम), समडोळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी समडोळी ( व्दितीय), शिंदेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी शिंदेवाडी ( तृतीय).

सचिव - आण्णासाहेब कुंभार (कर्नाळ, प्रथम), अनिल पाटील (दुधगाव, व्दितीय), आमाण्णा गावडे (अंकलखोप, तृतीय).

जिल्हा बॅंक शाखा - कडेपूर (ता. कडेगाव, प्रथम), देशिंग (ता. कवठेमहांकाळ, व्दितीय), बावची (ता. वाळवा, तृतिय).

जिल्हा बॅंक अधिकारी-कर्मचारी - तानाजी काशीद (जत, प्रथम), सुनीता पाटील (शाखाधिकारी, मार्केट यार्ड, व्दितीय), शशिकांत माने (शाखा कवठेमहांकाळ, तृतीय). 

आपण सर्व शेतकऱ्यांचीच पोर आहोत. राज्यपाल पाटील यांचे वडिलही शेतकरीच होते. मात्र जिल्ह्यातील एक मंत्री ( सदाभाऊ खोत यांच्या उल्लेख टाळून) मी शेतकऱ्यांचा पोरग असल्याचं राज्यभर सांगत फिरतोय.
- दिलीप पाटील , जिल्हा बॅंक अध्यक्ष, सांगली. 

सांगलीतूनही लढायची तयारी : पालकमंत्री 
बॅंक अध्यक्ष श्री. पाटील यांनी सहकार मंत्री देशमुखांना पालकमंत्री म्हणून सोलापूर सोडा, सांगलीत या, असे आवाहन केले. त्यावर मंत्री देशमुख म्हणाले की, मी उस्मानाबादचा आणि पाच वेगवेगळ्या ठिकाणाहून निवडणुक लढवली आहे. सांगलीत जागा असेल तर येथेही यायची माझी तयारी आहे.