भाऊ, छत्री कशी उगवली?

योगेश घोडके
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

शिराळा तालुक्‍यातील एका गावात  तीन उमेदवारांना ‘छत्री’ हे चिन्ह मिळाले आहे. आता त्यात नवल ते काय?...खरी गोष्ट इथेच आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ४८ चिन्हांच्या यादीत छत्रीचा समावेशच नाही. मग ही छत्री उगवलीच कशी?

सांगली - गावकारभाराचा गाडा ओढण्यासाठी ग्रामपंचायतीचा सदस्य होऊ पाहणारा प्रत्येकजण हुशारच असेल, याची खात्री देता यायची नाही...पण, निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणारे लोक शहाणे आणि दक्ष असावेत, हे नक्कीच अभिप्रेत आहे. या दोघांचेही घोडे पेंड खात असेल तर मात्र नसता घोळ होऊन बसतो. तसाच प्रकार शिराळा तालुक्‍यातील एका गावात झालाय. तीन उमेदवारांना ‘छत्री’ हे चिन्ह मिळाले आहे. आता त्यात नवल ते काय?...खरी गोष्ट इथेच आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ४८ चिन्हांच्या यादीत छत्रीचा समावेशच नाही. मग ही छत्री उगवलीच कशी?

त्यात झाले असे, की शिराळा तालुक्‍यातील डोंगरी भागातील एका गावातून अनेकांनी गावकारभारी होण्याची इच्छा व्यक्त करीत अर्ज भरले. याआधीच्या अनेक निवडणुकांत ‘छत्री’ हे तसे चर्चेतील चिन्ह असे. शिराळा हा तर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा तालुका. त्यामुळे त्या भागात छत्री घरोघरी असतेच असते. हे चिन्ह सहजपणे पोहचवता येईल, या हिशेबाने या तीन इच्छुकांनी अर्जात ‘छत्री’ चिन्हाची मागणी केली.

मागणाऱ्याने मागावे, देणाऱ्याने द्यावे...पण, निवडणूकच ती. तसे कसे चालेल? अधिकाऱ्यांनी शहानिशा केलीच नाही. एक नंबरला काय चिन्ह मागितले, ते पाहिले अन्‌ दिला खटका दाबून...उघडली ना भाऊ छत्री...गडी खूष. छत्री मिळाली म्हणून जल्लोष...नंतर लक्षात आले, छत्री तर चिन्हच नाही. मग पुन्हा धावपळ सुरु झाली. अधिकाऱ्यांनीही चूक लक्षा आल्‍यानंतर, ती दुरुस्त करत तिघांनाही ‘कपाट’ चिन्‍ह दिले. आता मतदार त्यांना कपाटभर मते देतात का, हे निवडणूकीत कळेलच...

Web Title: sangli news Grampanchayat election