कवठेमहांकाळला राजकारणाचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

कवठेमहांकाळला राजकारणाचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

कवठेमहांकाळ -  खासदार संजय पाटील यांचा भाजप प्रवेश, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन, अजितराव घोरपडे यांचा भाजप प्रवेश आणि खासदार पाटील यांच्याशी संघर्ष, विजयराव सगरे यांचे आकस्मित निधन... अशा राजकीय उलथापालथींच्या पार्श्‍वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्‍यात गावगाड्याचे कारभारी ठरविणारे रणांगण पेटले आहे. त्यात मोठ्या राजकीय उलथापालथी होत आहेत. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांप्रमाणेच या निवडणुकीवर तालुक्‍यासह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे पत्ते निश्‍चित होणार आहेत. त्यामुळे कवठेमहांकाळच्या गावगाड्यावर झेंडा फडकावून ‘बाहुबली’ होण्यासाठी सर्वच गटांनी शक्ती पणाला लावली आहे. तालुक्‍यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. दहा ग्रामपंचायतींत थेट सरपंचपद सर्वसाधारण असल्याने ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ सुरू आहे.

तरुणाई ताकदीने उतरली असल्याने  हवा तापलेली आहे. नेत्यांनी गावोगावी भेटीगाठी, दौरे, बैठकांचा सपाटा लावलाय. आघाड्यांच्या राजकारणात गावोगावी नवी राजकीय समीकरणे समोर येत आहेत. भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी ही वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. केरेवाडी, लांडगेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित सत्तावीस ग्रामपंचायतींत धुमशान सुरू आहे.  माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गावी कोंगनोळीत सहा जागा बिनविरोध झाल्यात. सात जागांसाठी  निवडणूक आहे. 

खरशिंग, हरोली, शिरढोण, मळणगाव, आगळगाव, रांजणी, कुकटोळी, कुची, नागज, घाटनांद्रे, हिंगणगाव, आरेवाडी, बोरगाव गावाच्या निवडणुका लक्षवेधी आहेत. काही ठिकाणी आघाड्या तर काही गावात स्वंतत्र पॅनेल उभे केले आहे.

खरशिंग येथे थेट सरपंचपदासाठी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कुमठेकर व सुहास पाटील यांच्यात चुरस आहे. कुमठेकर हे घोरपडे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी स्थानिक नेत्यांबरोबर आघाडी केली आहे. सुहास पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभा करत ताकद दाखविली आहे. हरोलीत राष्ट्रवादीचे पंचायत समिती सभापती मनोहर पाटील व शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्यात टक्कर सुरू आहे. बोरगावात घोरपडे गट, आमदार सुमन पाटील गट व सगरे गट एकत्रित आहेत. त्यांचा मुकाबला खासदार संजय पाटील गटाशी होत आहे. मळणगावात आमदार सुमन पाटील, सगरे गट व घोरपडे गटात दुरंगी सामना आहे.

हिंगणगावमध्ये पाटील गट, सगरे गट, कोठावळे गट  आणि घोरपडे गटात टशन आहे. या दुरंगी सामन्याने संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष वेधले आहे. कुकटोळीत घोरपडे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी यमगर, सगरे गट विरुद्ध संजय हजारे, श्रीकांत हजारे यांच्यात सामना आहे. गावात दोन्ही गटाकडून जोरदार विजयाचा दावा  होत असून निकालानंतरच समजणार आहे.

शिरढोण येथे आघाडी झाली असून घोरपडे समर्थक तात्यासाहेब नलवडे, शामराव पाटील, संजय पाटील तर भाजपच्या पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते टी. व्ही. पाटील असा तिरंगी सामना रंगत आहे. रांजणीत भाजपा, मनसे, शेतकरी संघटना, आरपीआयने आघाडी केली असून उद्योगपती विजयराव कुलकर्णी सरपंचपदाचे उमेदवार आहेत. घोरपडे-आबा-सगरे गट एकत्रित असून नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक जीवनराव भोसले यांना सरपंचपदाची उमेदवारी दिली आहे. रांजणीतील लढत हाय व्होल्टेज आहे. लोणारवाडीत घोरपडे-आबा-सगरे गट व खासदार संजय पाटील, काँग्रेसचे प्रशांत शेजाळ असा दुरंगी सामना होत असून स्थानिक नेतेही रिंगणात आहेत.

कुची मंडळात कुची येथे जोरदार टशन असून येथील ग्रामपंचायत प्रतिष्ठेची बनणार आहे. माजी सभापती मदन पाटील व भाजपचे लक्ष्मण पवार विरुद्ध घोरपडे-आबा- सगरे गटाचे शिलेदार एकत्र आले आहेत. बाबूराव सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, पुंडलिक पाटील सोबत आहेत. घाटनांद्रेत भाजपचे माजी उपसभापती अनिल  शिंदे, प्रभाकर शिंदे यांनी एकत्रित असून राष्ट्रवादी  युवकचे अमर शिंदे यांच्यात दुरंगी सामना आहे. घाटमाथ्यावरील या गावाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आगळगावात व नागजमध्ये जोरदार चुरशीचा सामना होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com