खाडे-घोरपडेंच्या गडात खासदारांची घुसखोरी

खाडे-घोरपडेंच्या गडात खासदारांची घुसखोरी

मिरज - भाजपला काँग्रेसचा गुण नसला तरी अवगुण लवकर लागला, हे पूर्व भागातील चित्र पाहिले की अनुभवास येते. येथे चक्‍क खासदार-आमदारांच्या गटातच वर्चस्ववाद उफाळला आहे. पूर्व भागातील वीस गावांमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी खासदार संजय पाटील यांनी आपल्या भविष्यकालीन जुळणीसाठीच प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तर काही गावांत आमदार सुरेश खाडे यांच्या गटाला खासदार गटाशीच लढावे लागते आहे.

सलगरे, टाकळी, बोलवाड, खटाव, सिद्धेवाडी या मुख्य गावांतच खासदारांनी थेट लक्ष घातले आहे. यापैकी बहुसंख्य उमेदवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आहेत; पण त्यांना खासदारांची रसद असल्याची चर्चा आहे. मिरज पूर्व भाग हा काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे. तिथे फक्त कधी अजितराव घोरपडे, तर कधी मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने राजकारण केले; पण गेल्या काही वर्षांत मिरज पूर्व भागातील राजकीय चित्र हे झपाट्याने बदलत गेले. एकेकाळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी पूर्व भागातील गावेच्या गावे अगदी कट्टर होती; किंबहुना आजही आहेत. त्यांच्या पश्‍चात यापैकी काही गावांमध्ये मदन पाटील यांनी बाजू सांभाळली.

मध्यंतरीचा काही काळ येथील राजकारण हे माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मदन पाटील यांच्यातील टोकाच्या संघर्षाने गाजले; पण घोरपडे यांच्या विकास आघाडीचा उगवत्या सूर्याने मिरज पूर्व भागात वेगळा पर्याय तयार केला. अर्थात घोरपडेंचा झंझावात मदन पाटील यांनी थोपविला आणि गेल्या काही वर्षांत तर काही गावांमधून अजितराव घोरपडे यांचे अस्तित्वही संपुष्टात आले. मदन पाटील यांच्या निधनानंतर मात्र निर्माण झालेली ही पोकळी संजय पाटलांनी नेमकी हेरली आहे. अर्थात माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे अस्तित्व तर जत्रा किंवा वाढदिवसात डिजिटल फलकांवर झळकण्यापुरतेच उरले आहे. 

सध्या पूर्व भागातील जवळजवळ सर्व गावांत निवडणुकांमध्ये संजय पाटील यांचे समर्थक आणि त्यांच्याविरोधात खाडेंसह इतर असे चित्र आहे. यापैकी काही गावांमध्ये तर संजय पाटील यांच्या समर्थकांविरोधात आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीलाही सोबत घेतले आहे.  तर काही गावांमध्ये खाडे समर्थक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत चालले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही खासदार पाटील यांचे प्रयत्न हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर शक्‍यतो निवडणूक होऊ नये असेच होते; पण आमदार सुरेश खाडे यांनी ‘ब्रॅंडेड’ उमेदवारीच्या मुद्द्यावर बाजी मारली आणि मिरज पंचायत समितीमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडवून आणले.

परंतु, या सत्तातरांच्या शिलेदारांनी अंगावरच्या गुलालासह लगेच सांगली रस्त्यावरील ‘विजय’ बंगल्यावर जाऊन जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन आम्ही तुमचेच आहोत. सोयीसाठी तिकडे गेलो असलो तरी आम्हाला परके समजू नका, अशीही विनवणी केली. पंचायत समिती ताब्यात मिळाल्यानंतर आमदार खाडे यांनी येथील सत्ताधारी आणि भरभरून मते दिलेल्यांचा अपेक्षाभंग केल्याने ही सगळीच मंडळी आता संजय पाटील यांच्याशी संपर्क साधून आहेत. नुकत्याच बदललेल्या या राजकीय गणितांचे पडसाद सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमटले आहेत.

सरपंच पद हे ज्या गावांमध्ये खुल्या प्रवर्गातील आहे, त्या सलगरे, टाकळी, सिद्धेवाडी, सोनी गावांमध्ये सरपंचपदासाठीची स्पर्धा तीव्र आहे. काही गावांमध्ये तर सरपंच एका गटाचा आणि पॅनेल विरोधी गटाचे निवडून येण्याचीही शक्‍यता आहे. एकूणच ग्रामपंचायतीची ही निवडणूक पूर्व भागाच्या भविष्यातील राजकारणास कलाटणी देणारी ठरेल.

जेवणावळींवर लाखोंची उधळण...
एरवी म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे बिल शासनाने भरण्यासाठी टाहो फोडणारे गावागावांतील अनेक नेते आणि त्यांचे शागिर्द सध्या निवडणूक रिंगणात आहेत. दुष्काळ असल्याने सरकारने पाण्याचे बिल भरावे, अशी म्हणणारी मंडळीच सध्या सत्तेसाठी मताला हजारो रुपये आणि जेवणावळींवर लाखो रुपयांची उधळण करीत असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक निकालानंतर दारूची अधिकृत आकडेवारी समोर येईल तेव्हा पाण्यापेक्षा कशावर खर्च अधिक होतो याची चर्चाही होईल!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com