सांगलीत काँग्रेस, राष्‍ट्रवादी तरले; कमळ फुलले

सांगलीत काँग्रेस, राष्‍ट्रवादी तरले; कमळ फुलले

सांगली - जिल्ह्याच्या राजकारणात भाजपच्या धमाकेदार एंट्रीनंतर सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने ग्रामपंचायत निवडणुकीत  हा चौखुर उधळलेला वारू रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळवले.

भाजप १३०, काँग्रेस १०३, राष्ट्रवादीने ६४, शिवसेनेने ३३ तर संयुक्त आघाड्यांनी ७८ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवला. आठ ग्रामपंचायतींत सत्तेचे कडबोळे झाले आहे. जिल्‍ह्याच्‍या इतिहासात भाजपने प्रथमच एवढे मोठे यश मिळविले आहे.

माजी मंत्री पतंगराव कदम यांनी पलूस-कडेगावचा, जयंत पाटील यांनी वाळव्याचा, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी खानापूरचा अस्थिर झालेला बालेकिल्ला सावरला आहे. भाजप गावपातळीवर रुजवत खासदार संजय पाटील यांनी तासगावबरोबरच घोरपडे सरकारांच्या बालेकिल्ल्यात स्वतःचा गट बांधला. आमदार विलासराव जगताप यांनी जतमध्ये सातत्य कायम ठेवले, मात्र तिथे काँग्रेसने थेट सरपंच निवडीत अनेक ठिकाणी  धक्कादायक कामगिरी नोंदवली. आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनी मिरज तालुक्‍यात गावपातळीवरचे गट मजबूत करीत स्वतंत्र भाजप म्हणून वाटचाल सुरू केली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे रयत संघटनेचे फटाके होम पिचवर फुटलेच नाहीत. खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ यांच्यातील संघर्षाचा सरळ फायदा राष्ट्रवादीने उठवला.

मिरज पश्‍चिम भागासह वाळवा तालुक्‍यावर वर्चस्व राखले. आमदार अनिल बाबर यांच्या शिवसेनेचा ग्रामीण पायाला काँग्रेसने सौम्य धक्का दिला असला तरी त्यांनी आटपाडीत लक्षवेधी कामगिरी नोंदवत स्वतःचा गट अधिक मजबूत केला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना आपल्या गडात कडेगाव, पलूस तालुक्‍यात पतंगरावांना रोखता आले नाही. जतमध्ये विक्रम सावंत यांनी विधानसभेच्या पूर्वतयारीला झोकून देत थेट सरपंच निवडीत भाजपला शह दिला. तेथे सरपंच एकाचा अन्‌ सत्ता दुसऱ्याची  अशी अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिराळ्यात आमदार शिवाजीराव नाईक समर्थकांनी एकहाती निवडणूक लढत राष्ट्रवादी-काँग्रेसच्या संयुक्त मोहिमेला तगडी लढत दिली. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात पहिल्यांदाच गाव निवडणुकीला सामोरे जाताना तासगाव तालुक्‍यात आमदार श्रीमती सुमन पाटील यांचा कस लागला. भाजपच्या तुलनेत (१६) त्यांची पिछेहाट (१०) झाली मात्र त्यांचा गट सर्वत्र कायम राहिला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपशी  पंगा कायम ठेवताना शक्‍य तिथे आघाड्या करून स्वंतत्र गटाची ताकद वाढवली. खासदार पाटील यांनी कवठेमहांकाळमध्ये नोंदवलेली कामगिरी अर्थातच घोरपडेंसाठी चिंता वाढवणारी असेल. ती संघर्षाची नांदी ठरेल. आटपाडी तालुक्‍यात माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजप प्रवेशानंतर सेनेच्या आव्हानाचा सामना केला. त्यात त्यांची कामगिरी काकणभर चढ ठरली.

सांगली जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होती. त्यापैकी २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सव्वाचारशे ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारुला ग्रामपंचायत निवडणुकीत काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र दिसत असले तरी प्रथमच भाजपने गावगाड्याच्या राजकारणात वातावरण ढवळून काढले. गल्लीबोळात भाजपचे वारे शिरले. जिल्हा परिषद, पंचायत समितीत समिती आणि नगरपालिकांमध्ये भाजपने दमदार कामगिरी नोंदवली होती. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा आलेख सातत्याने खालावत निघाला होता. तो या निवडणुकीत सावरताना दिसला. गावपातळीवर सोयीस्कर आघाड्याही झाल्या होत्या. एकूणच कधी नव्हे इतके ग्रामीण  राजकारण उभे आडवे, तिरपे अक्षरशः भेगाळून गेले.

दादांच्या पद्माळेत राष्ट्रवादी
वसंतदादा पाटील यांच्या पद्माळे (ता. मिरज) या गावातच काँग्रेस समर्थकांची सत्ता संपुष्टात आली. राष्ट्रवादीने तेथे झेंडा फडकावला. स्वातंत्र्यापासून सतत वसंतदादांच्या विचारांचा झेंडा वागवणाऱ्या या गावात प्रथमच सत्तांतर झाले आहे. या गावाला सरपंचपद राखीव आहे. त्या आरक्षणाचा एकही व्यक्ती तेथे नसल्याने सध्या तरी हे गाव सरपंचाविना राहिले आहे.

सत्ता एकाची; सरपंच दुसऱ्याकडे
जिल्ह्यातील वीसहून अधिक गावांमध्ये सत्ता एकाची आणि सरपंच दुसऱ्याचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐतिहासिक गाव कुंडलमध्ये सरपंच राष्ट्रवादीचा आणि बहुमत काँग्रेसचे झाले आहे. सोनीमध्ये 
राष्ट्रवादीचा सरपंच, तर बहुमत विरोधकांकडे आहे. अशा गावांमध्ये गावकारभार हाकताना राजकीय हेवेदावे बाजूला ठेवले जाणार का, याकडे लक्ष असणार आहे.

जिल्हा नजरेत 
 मिरज - काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व; भाजप लक्षवेधी
 वाळवा - जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम
 आटपाडी - तालुक्‍यात कमळच सरस
 कवठेमहांकाळ - घोरपडेंचे वर्चस्व, मात्र काकांचीही एंट्री
 तासगाव - भाजपची सरशी; राष्ट्रवादी पाठोपाठ
 कडेगाव - कडेगावच्या देशमुखांना धक्का; भाजप मागे
 पलूस - पतंगरावांचे ‘काँग्रेस की जय हो’ 
 शिराळा - काँग्रेस-राष्ट्रवादीची आगेकूच, एकाकी शिवाजीरावांची टक्कर 
 जत - काँग्रेसची सरपंच संख्येत तर सदस्यांमध्ये भाजपची आघाडी
 खानापूर - १२ गावात सत्तांतर; काँग्रेसची कामगिरी सुधारली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com