कवठेमहांकाळला घोरपडे गटाचे वर्चस्व

कवठेमहांकाळला घोरपडे गटाचे वर्चस्व

कवठेमहांकाळ -  तालुक्‍यात अत्यंत अटीतटीने झालेल्या सत्तावीस ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने अकरा व राष्ट्रवादीने चार, खासदार संजयकाका पाटील गटाने आठ, काँग्रेसने तीन, शिवसेनेने एका ग्रामपंचायतीवर यश मिळविले आहे. तालुक्‍यातील प्रमुख ग्रामपंचायतीवर खासदार संजयकाका पाटील समर्थकांनी झेंडा फडकविला आहे.

सर्वाधिक चुरशीच्या रांजणी ग्रामपंचायतीवर खासदारसमर्थक उद्योगपती विजयराव कुलकर्णी  यांच्यासह पॅनेलने लक्षवेधी विजय मिळविला आहे. खरशिंग, घाटनांद्रे, आगळगाव, रांजणी, शेळकेवाडीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवीत कमळ फुलविले. आरेवाडी, लोणारवाडी येथे भाजप सरपंच असून सराटी सरपंचपदावर भाजपने दावा सांगितला आहे. सरपंच निवडून आला आहे. तर माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने कोंगनोळी, बोरगाव, चुडेखिंडी, जायगव्हाण, मळणगाव, कुची, शिंदेवाडी (हिं), शिरढोण, ढालेवाडी, लांडगेवाडी, नागज येथे घोरपडे गटाचा सरपंच झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगणगाव, लंगरपेठ, विठूरायाचीवाडी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. अलकूड (एस) येथेही स्थानिक आघाडीने सरपंचपदावर दावा सांगितला आहे. निकालात शिवसेनेने एक, जाखापुरात सर्वपक्षीय, तर काँग्रेसने तीन ठिकाणी यश मिळविले आहे. तालुक्‍यात हरोलीत शिवसेनेने एकहाती सत्ता घेतली आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत काही ठिकाणी सरपंच एका गटाचा तर सत्ता दुसऱ्या गटाची असे चित्र आहे. एंकदरीतच कवठेमहांकाळ तालुक्‍यात झालेली सत्तावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही ठिकाणी सत्तांतर  झाले आहे.

रांजणीत माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमन पाटील, महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आरपीआय, मनसे, शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने थेट सरपंचपदासह बारा जागा मिळविल्या आहेत. सरपंचपदी विजयराव कुलकर्णी यांनी विजय मिळविला आहे. चुडेखिंडीत भाजपचे बापूसाहेब भुसनूर आणि राष्ट्रवादी व घोरपडे गटात दत्तात्रय पाटील यांच्यात लढत झाली. यात सरपंचपदासह दोन जागा मिळाल्या असून घोरपडे गटाच्या लक्ष्मी पाटील सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. भाजपला पाच जागा मिळाल्या आहेत.

आगळगावात तिरंगी लढतीत भाजपने सरपंचपदासह आठ जागा जिंकल्या असून राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदी भाजपचे व्यंकटराव पाटील विजयी झाले आहेत. कुचीत राष्ट्रवादीचे माजी सभापती मदन पाटील, भाजपचे लक्ष्मण पवार यांच्या गटाला दोन, तर राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील, पुंडलिक पाटील व घोरपडे गटाचे बाबूराव सूर्यवंशी याच्यात टशन होत घोरपडे गटाच्या वैशाली पवार विजयी झाल्या असून अकरा जागा मिळाल्या आहेत. बोरगावात घोरपडे-आबा-सगरे गटाला सरपंचपदासह दोन जागा मिळाल्या असून घोरपडे गटाचे सरपंचपदी सहदेव परीट विजयी झाले, तर भाजपला नऊ जागा मिळाल्या.

विठूरायाचीवाडीत राष्ट्रवादीला सरपंचासह चार जागा मिळाल्या असून सरपंचपदी नयना खोत विजयी झाल्या आहेत. खासदार पाटील गटाला पाच, तर घोरपडे गटाला दोन जागा मिळाल्या. शिंदेवाडी (हिं) येथे झालेल्या  तिरंगी लढतीत माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला सरपंचासह सहा जागा मिळाल्या असून सरपंचपदी विष्णू मिरजे विजयी झाले, तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहेत. कुकटोळीत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला सरपंचासह सात जागा मिळाल्या आहेत, तर माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला चार जागा मिळाल्या.

जाखापुरात काँग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीत झालेल्या लढतीत आघाडीचे सूर्यकांत पाटील सरपंचपदी विजयी झाले असून सहा जागा मिळाल्या, तर काँग्रेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या  वाघोलीत काँग्रेसला सरपंचपदासह चार जागा मिळाल्या. सरपंचपदी सुरेश गायकवाड विजयी झाले, तर घोरपडे गटाला तीन जागा मिळाल्या. जायगव्हाण येथे घोरपडे गट विरुद्ध राष्ट्रवादी झालेल्या सामन्यात घोरपडे गटाने  एकहाती सत्ता मिळविली. घोरपडे गटाचा  सरपंचपदी गोरख पाटील यांचा विजय झाला.

सराटीत खासदार संजयकाका पाटील गटाला सरपंचासह दोन जागा मिळाल्या तर घोरपडे गटाने पाच जागा जिंकल्या. येथे खासदार गटाच्या सुनंदा लेंढवे सरपंच झाल्या. शेळकेवाडीत खासदार संजयकाका पाटील गटाला सरपंचासह पाच जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदी अमर पाटील विजयी झाले आहेत. यापूर्वी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

मळणगावात राष्ट्रवादी विरुद्ध  घोरपडे गटात झालेल्या सामन्यात घोरपडे गटाने सरपंचपदासह दहा जागा मिळवित ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला आहे. पंचायत समितीच्या उपसभापती सरिता शिंदे यांचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले. राष्ट्रवादीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

हिंगणगावात राष्ट्रवादी विरुद्ध घोरपडे गटात झालेल्या दुरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. सरपंचपदी महांकालीचे माजी संचालक शामराव इरळे यांच्यासह राष्ट्रवादीला बारा जागा मिळाल्या, तर घोरपडे गटाला एक जागा मिळाली. घाटनांद्रे ग्रामपंचायतीवर भाजपने निसटते बहुमत मिळविले आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्या पत्नी रूपाली शिंदे यांचा अवघ्या पाच मतांनी सरपंचपदी विजयी झाल्या. येथे भाजपला चार जागा, तर राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास पाटील यांच्या अधिपत्याखाली अलकूड (एम) ग्रामपंचायतीवर पॅनेल निवडून आले. सरपंचपदी राजाक्का गिड्डे या निवडून आल्या, तर काँग्रेसला पाच, तर भाजपला दोन जागा मिळाल्या.

कोंगनोळी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना जनतेने पुन्हा कौल दिला. विद्यमान सरपंच नीता जाधव या पुन्हा सरपंचपदी निवडून आल्या. राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांनी आरेवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा वर्चस्व मिळविले, मात्र सरंपचपदी भाजपचे आबासाहेब साबळे विजयी झाले. येथे राष्ट्रवादीला सात जागा, तर भाजपला दोन जागा मिळाल्या. 

हरोली येथे पंचायत समितीचे सभापती मनोहर पाटील यांना धक्का बसला. एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल ग्रामपंचायतीवर भगवा झेंडा फडकविला आहे. सरपंचपदी शिवसेनेचे भाऊसाहेब शेंडे विजयी झाले असून सेनेला आठ जागा मिळाल्या आहेत. लोणारवाडीत दुरंगी लढतीत खासदार संजयकाका पाटील यांचा गटाने सरपंचासह तीन जागा मिळाल्या असून सरपंचपदी रूपाली सातपुते विजयी झाल्या. तर घोरपडे  गट व राष्ट्रवादी गटाला सहा जागा जिंकता आल्या.

राज्यमार्गावरील नागज येथे झालेल्या दुरंगी लढतीत सरपंच घोरपडे गटाला पाच जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीला सात जागा मिळाल्या आहेत. येथील एका अपक्षाला विजय मिळाला.

शिरढोण येथे झालेल्या स्थानिक आघाडीत घोरपडे  गटाचा सरपंच झाला असून आघाडीत भाजपचा एक सदस्य विजयी झाला. सरपंचपदी अशोक मंडले विजयी झाले असून आठ जागा मिळवित सत्ता कायम राखली आहे. खरशिंग येथे झालेल्या दुरंगी लढतीत सुहास पाटील यांनी स्वबळावर पॅनेल उभा करत त्यांच्याविरुद्ध घोरपडे गट व राष्ट्रवादी यांच्यात सामना झाला. येथे सरपंचपदी सुहास पाटील यांना विजय मिळाला असून सात जागा मिळाल्या, तर घोरपडे गट, राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या.

लंगरपेठ ग्रामपंचायतीवर आमदार सुमन पाटील गट, खासदार संजयकाका पाटील गट विरुद्ध माजी मंत्री अजितराव घोरपडे गट अशी लढत झाली. यात राष्ट्रवादीचा सरपंच महेश पवार विजयी झाले असून आबा-काका गटाला आठ जागा मिळाल्या, तर घोरपडे गटाला एकच जागा मिळाली. ढालेवाडीत राष्ट्रवादीचे महांकाली कारखाना, घोरपडे गटाचे यांच्या संयुक्त पॅनेलचे सरपंचपदी रामदास साळुंखे विजयी झाले. राष्ट्रवादी एक जागा मिळाली असून अपक्षाने विजय मिळविला.

-  कुकटोळी- घोरपडेसमर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी यमगर यांच्या पॅनेलचा पराभव.
- हरोली- पंचायत समितीचे सभापती मनोहर पाटील यांच्या पॅनेलचा सुफडासाफ
-  कोंगनोळी- माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे गावावरील वर्चस्व कायम 
-  जाखापूर- काँग्रेसचे विद्यमान सरपंच शिवाजी बोराडे यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात
-  आगळगाव- जिल्हा परिषद सदस्या आशाराणी पाटील यांच्या पॅनेलसह माजी सरपंच संदीप पाटील यांचा दारुण पराभव. 
-  शिरढोण- जिल्हा परिषद सदस्या संगीता नलवडे  यांची सत्ता.
-  अलकूड (एम्‌) - काँग्रेसचे नेते भानुदास पाटील यांचे कमबॅक
- खरशिंग- पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब कुमठेकर यांच्यासह पॅनेलचा सुहास पाटील पॅनेलकडून पराभव. 
-  वाघोली - काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांची सत्ता कायम. 
-  कुची - माजी सभापती व विद्यमान सदस्य मदन पाटील यांची सत्ता संपुष्टात.
-  आरेवाडी - सरपंचपदी भाजपचे आबासाहेब साबळे, तर सत्ता राष्ट्रवादीकडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com