मराठा समाजाने ग्रामपंचायतीला 'नोटा' अधिकार वापरावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

'मराठा क्रांती'चे आवाहन - सरकारने आश्‍वासन न पाळल्याने 27 पासून आंदोलन

'मराठा क्रांती'चे आवाहन - सरकारने आश्‍वासन न पाळल्याने 27 पासून आंदोलन
सांगली - मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मोर्चे व अनेक आंदोलने झाली. मुंबई मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्‍वासनेही पाळली नाहीत. एकही राजकीय पक्ष मराठा समाजाच्या मागण्यांचे समर्थन करीत नाही. राजकीय पक्षांना समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत समाजाने सर्व राजकीय पक्ष, आघाडीच्या कार्यकर्त्यांना मते देऊ नयेत. मतदानावर बहिष्काराऐवजी नकारार्थी मतदानाचा "नोटा'चा वापर करावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे श्रीरंग पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

पाटील म्हणाले, 'मराठा समाजाचा मुंबईत शेवटचा मोर्चा निघाला. सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासने दिली. त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. पाठपुराव्यासाठी सतत आग्रह धरला जाईल. मराठा क्रांती मोर्चाने सांगलीत मोर्चा काढून बुधवारी (ता. 27) एक वर्ष होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर "मराठा जोडो अभियान' सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत एकाही राजकीय पक्षाने समर्थन केलेले नाही. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पुढील महिन्यात होणाऱ्या 453 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विविध पक्षांच्या आघाड्या, कार्यकर्त्यांना ताकद दाखवून द्यावयाची आहे. त्यांना मतदान न करता समाजाने थेट "नोटा'चा पर्याय निवडावा, असे आवाहन त्यांनी केले. कदाचित हा निर्णय विधानसभा आणि लोकसभेलाही स्वीकारला जाऊ शकतो.''