अंजनीत द्राक्ष बागायतदाराची कर्जामुळे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

अंजनी (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायत शेतकरी, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जालिंदर आबासाहेब पाटील (वय ४४) यांनी कर्जास कंटाळून विष घेऊन घरात आत्महत्या केली. त्यांच्या द्राक्षशेतीवर सोसायटी व बॅंकांचे मिळून सुमारे १५ लाख रुपये कर्ज आहे. 

तासगाव - अंजनी (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायत शेतकरी, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जालिंदर आबासाहेब पाटील (वय ४४) यांनी कर्जास कंटाळून विष घेऊन घरात आत्महत्या केली. त्यांच्या द्राक्षशेतीवर सोसायटी व बॅंकांचे मिळून सुमारे १५ लाख रुपये कर्ज आहे. 

अंजनी येथील जालिंदर पाटील यांची चार एकर द्राक्ष बाग आहे. त्यांनी बागेसाठी कर्ज काढले होते. त्यांच्यावर विकास सोसायटीचे १३ ते १५ लाख रुपये कर्ज होते. पावसामुळे गेल्या वर्षी कमी उत्पादन मिळाले होते.  

सलग तीन वर्षांच्या भीषण दुष्काळामुळे टॅंकरने पाणी विकत घेऊन द्राक्ष बाग जगवण्याचा प्रयत्न जालिंदर पाटील यांनी केला होता. यंदाही पाण्याची समस्या भेडसावत असताना द्राक्ष बागेची पीकछाटणी घ्यायची कशी, हा प्रश्‍न त्यांना सतावत होता. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले होते. आज सकाळीही मित्रांबरोबर कर्जाबाबत चर्चा झाली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास घरातच विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार त्यांच्या पत्नी घरी आल्यानंतर उघडकीस आला. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. रात्री उशिरा तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर जालिंदर पाटील यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंजनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 
महसूल विभागाने या घटनेची दखल घेऊन त्याबाबतचा अहवाल तहसीलदार सुधाकर भोसले यांच्याकडे दाखल केला आहे. त्यामध्ये जालिंदर पाटील यांच्यावर १३ ते १५ लाखांचे कर्ज असल्याचे म्हटले आहे.