सांगलीत द्राक्ष, उसासह रब्बीचे प्रचंड नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सांगली - गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील ऊस, द्राक्षासह रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शिवारात पाणी साचून राहिल्याने पिकांना धोका वाढला आहे. आताच उगवू लागलेली रब्बीची पिके पाण्याखाली गेलीत. दलदलीत उतरून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर फवारणी घेण्याची धडपड चालवली आहे. अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावलेत. 

सांगली - गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील ऊस, द्राक्षासह रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शिवारात पाणी साचून राहिल्याने पिकांना धोका वाढला आहे. आताच उगवू लागलेली रब्बीची पिके पाण्याखाली गेलीत. दलदलीत उतरून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर फवारणी घेण्याची धडपड चालवली आहे. अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावलेत. 

वेधशाळेने वर्तवलेल्या अतीवृष्टीच्या अंदाजानुसार तंतोतंत पावसाने पंधरा दिवसांत हजेरी लावली. दोन-चार दिवसांत मात्र मुसळधार पाऊस कोळतोय. शनिवारी रात्रीच्या पावसाने सगळीकडे भंबेरी उडवून दिली. सलगपणे दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी उभे राहिले. पंधरा दिवसांतील पावसाचे पाणी जमिनी मुरले आहे. ओढ्या-नाल्यांतून पाणी वाहतेय. उगूळ फुटावा, अशी स्थिती आहे. त्यात या मुसळधार पावसाची भर पडल्याने साहजिकच आज दुपार झाली तरी पाणी मुरलेले नव्हते. उसाच्या सरीत, द्राक्ष बागेत बांधा कडेला पाणी साचून राहिले आहेत. द्राक्ष बागांतून पाणी बाहेर काढण्यासाठी सकाळपासून शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. त्यात भर म्हणून दावण्याचा दणका बसला आहे. ढबूसह फळभाज्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. कोबी, फ्लॉवर, वांगी, दोडका याला फटका बसला आहे. मेथी, कोथींबीर जमीनदोस्त झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

 झेंडूची पंचाईत
दिवाळीसाठी झेंडूची शेती बहरलेली आहे, मात्र कालच्या पावसाने कळ्या आणि फुलांची पुरती दाणादाण करून टाकली आहे. अनेक ठिकाणी रोपटी जमिनीला टेकली आहेत. परिणामी, दिवाळीत झेंडूची आवक कमी होण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

 ओढे वाहू लागले
कालचा पाऊस जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी झाला आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहते झाले आहे. जमिनीतील पाणीसाठा वाढण्यासाठा हा पाऊस फायद्याचा आहे, मात्र पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

मिरजेला धो धुतले
मिरज शहर आणि पूर्व भागात शनिवारी रात्री पावसाने धो धुतले. तीन ते साडेतीन तासांत सुमारे ४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात गुडघ्याएवढे पाणी साचले होते. पूर्व भागातील सर्व ओढे भरून वाहू लागल्याने काही वेळासाठी रस्ते बंद झाले होते. द्राक्ष बागांची अवस्था बिकट झाली आहे. दावण्या रोगाने घाला घातल्याने शेतकरी धास्तावले आहेत. 

ट्रॅक्‍टर अडकू लागले
जिल्ह्यात द्राक्ष बागांवर औषध फवारणीसाठी अनेक शेतकरी ट्रॅक्‍टरचा वापर करतात. सध्या शेतात इतकी दलदल झाली आहे की ट्रॅक्‍टर नेणे शक्‍यच नाही. क्षेत्र मोठे असलेल्या ठिकाणी मजुरांचा वापर करून औषध फवारणीही कठीण झाली आहे. दावण्याचा घाला पाहताना शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्‍टर अडकून पडले आहेत. 

इस्लामपुरात फटाके स्टॉल पाण्यात
नगरपालीकेच्या खुले नाट्यगृहाच्या मैदानात पावसाचे पाणी साचते त्यामुळे नाट्यगृहाच्या बाहेरील फुटपाथवर फटाका स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्टॉलधारकांनी नगरपालिकेकडे केली होती. मात्र त्यांची मागणी पालिकेने धुडकावली आहे. दिलेल्या जागेवर स्टॉल लावा, असा आदेश दिला आणि आज पावसाने फटाका स्टॉल पाण्यात गेले.