पेरू @ १०० रुपये किलो

पेरू @ १०० रुपये किलो

सांगली - गारेगारवाला पिपाणी वाजवतो तशी पिपाणी वाजवत बुट्ट्यांत पेरू घेऊन पेरूवाला दारावर यायचा. दोन रुपयांना एक अन्‌ पाचला तीन घ्या म्हणायचा. पेरू म्हणजे ‘घर की मुर्गी दालबराबर’च जणू! स्वस्त फळ. परसबागेत पिकणारं, सहज मिळणारं; पण हाच पेरू आता बाजारात भाव खाऊ लागला आहे. सध्या पेरू नगावर विकायचा जमाना संपला असून, तो किलोवर विकला जातोय. थोडाथोडका नव्हे तर सफरचंदाइतका म्हणजे १०० रुपये किलोपर्यंत दर मिळतोय.  

पेरू हे दक्षिण अमेरिकन फळ, इथे बांधावर रुजले. परसबागेत हक्काचे झाले. त्यामुळे पेरू बाजारात कोपऱ्यात दिसायचा. अलीकडे मात्र पेरूला चांगले दिवस आलेत. पेरू स्वतंत्र पीक म्हणून वाढतेय. जिल्ह्यात यंदा १६० हेक्‍टरवर लागवड झालीय. सकाळी सहाला येऊन व्यापारी पेरू तोडतात, वजन करून बाजारात जातात. बागेतून खरेदीचा दर २० ते २५ रुपये किलो, मात्र बाजारात तो ८० ते १०० रुपये किलो आहे. कारण, हे जलद नाशवंत फळ आहे. ते दुसऱ्या दिवशी बाजारात ‘विकेल’ इतके चांगले राहत नाही.

‘‘पेरू कितीला एक?’’ असा आजही ग्राहकांचा प्रश्‍न आहे; परंतु उत्तर बदलले आहे- ‘‘पंचवीस रुपयांना पावशेर, पन्नासला अर्धा,’’ असे उत्तर ऐकून ‘‘अँऽऽऽ’ अशी आश्‍चर्यमुद्रा होतेय. हंगामात सफरचंद १०० रुपये किलोने मिळते. तोच दर पेरूला आलाय. सध्या अन्य फळांचे दर गगनाला भिडल्याचाही परिणाम आहे. आरोग्यशास्त्रातील पेरूचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘पोस्ट’ हल्ली फेसबुक, व्हॉटस्‌अपवर फिरत असल्याने ग्राहक वाढल्याचे विक्रेते सांगतात. 

पेरूचे वैशिष्ट्य
पेरूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि ‘क’ जीवनसत्त्व अधिक आढळते. त्यात तंतुमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ आणि काही प्रमाणात ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वही आढळते. पेरू हे उत्साह वाढविणारे फळ आहे. 

जिल्ह्यात सरदार, ललित, अलाहाबाद सफेद, जी. विलास, श्‍वेता अशा पाच जातीचे पेरू अधिक  पिकतात. यंदा ऐन आंब्याच्या हंगामात पेरू तयार झाल्याने सुरवातीला झटका बसला; मात्र शेवटच्या टप्प्यात आता चांगला दर मिळतोय. बहर कमी असून मागणी अधिक असल्याचा फायदा होतोय.
- सिद्धार्थ खुजट,  पेरू बागायतदार, कवठे एकंद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com