मिरजेतील हैरदखान बावडीची दुरावस्था

मिरज - पॉंडीचेरीपासून दिल्लीपर्यंत धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना पाणी पुरवणारी मिरज जंक्‍शनमधील हैदरखान विहीरीची दुरावस्था. 
मिरज - पॉंडीचेरीपासून दिल्लीपर्यंत धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना पाणी पुरवणारी मिरज जंक्‍शनमधील हैदरखान विहीरीची दुरावस्था. 

मिरज - गेली सव्वाशे वर्षे देशभर फिरणाऱ्या रेल्वे गाड्यांनी पाणी देणारी मिरजेतील हैदरखान बावडीची दुरावस्था झाली आहे. रेल्वे जंक्‍शनमध्ये नवी पाणी योजना अस्तित्वात आल्यानंतर ही ऐतिहासीक विहीर अडगळीत पडली आहे. गरज संपल्याने तिचा कचरा कोंडाळा होऊ पाहत आहे. गाळ आणि कचऱ्यामुळे तिचा श्‍वास गुदमरतो आहे. 

दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत धावणाऱ्या नव्वदभर गाड्या दररोज मिरज जंक्‍शनमध्ये येतात. त्यांत दररोज अडीच लाख लिटर पाणी भरले जाते. हुबळीनंतर पुण्यापर्यंतच्या अंतरात फक्त मिरजेतच पाण्याची सोय आहे. मध्य रेल्वे आणि दक्षिण-पश्‍चिम रेल्वेसाठी हैदरखान बावडी एका अर्थाने जीवनदायी ठरली होती. ब्रिटीशांनी रेल्वेस्थानके उभारताना पाण्याच्या उपलब्धतेचा विचार केला; चांगले स्त्रोत पाहून स्थानके उभारली. सध्या काळ बदलला तसे अनेक स्त्रोत आटून गेले. हैदरखान बावडी मात्र अजुनही "तरुण" आहे. गतवर्षी टंचाईग्रस्त लातुरला रेल्वेने पाणी देण्याचा यशस्वी विक्रमी उपक्रम राबवला गेला; तोदेखील हैदरखान बावडीच्या जीवावरच. या उपक्रमाने या बावडीलाही देशभर ओळख मिळाली होती. 

चार वर्षांपुर्वी रेल्वेने कृष्णा नदीतून स्वतंत्र पाणीयोजना राबवली; त्यानंतर बावडीचे महत्व कमी झाले. रेल्वे प्रशासनाचे तिच्याकडे दुर्लक्ष झाले. एखाद्या जुनाट विहीरीसारखी सध्या अवस्था झाली आहे. भिंतींची पडझड सुरु आहे. काठावरच्या झाडांच्या फांद्या आणि पाने पाण्यात पडून विहिरीचे पाणी दुषित करत आहेत. विहीरीतील अनेक जिवंत झरे झाकून जात आहेत. पाण्याला वास येतो आहे. गंजलेल्या पाईप, लोखंडी अँगल आणि विहीरीत कोसळणारे मातीचे ढिगारे यामुळे बावडीची "दशा" झाली आहे. पाण्याचा उपसा नसल्याने दुर्गंध पसरला आहे. 

असा आहे इतिहास

दुसऱ्या इब्राहीम आदीलशहाचा सरदार हैदरखान याने 1587 मध्ये शेतीच्या पाण्यासाठी विहीर खोदली. त्याच्याच नावाने ती ओळखली जाते. तसा फार्सी शिलालेख विहीरीत आहे. मिरज रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिम बाजुला विहीर आहे. तेथील पाणी पाईपमधून नेऊन मिरासाहेब दर्ग्यात कारंजा खेळवला जात असे. मुस्लिम शैलीचे बांधकाम, तळापर्यंत पायऱ्या, दगडी कमानी आणि मोटेतून उपसा ही तिची वैशिष्ठ्ये होती.

खोदल्यापासून सव्वाशे वर्षांत एकदाही ती आटली नाही. अनेक भीषण दुष्काळातही तग धरला. 1885 मध्ये रेल्वेने विहीर ताब्यात घेतली. केरळ-तमिळनाडूनपासून दिल्ली-राजस्थान आणि वाराणशीपर्यंतच्या प्रत्येक शहरात तिचे पाणी रेल्वेच्या माध्यमातून पोहोचले. आज सव्वाशे वर्षांनंतरही बावडीतील झरे जिवंत आहेत.

ऐतिहासीक ठेवा जपावा - संदीप शिंदे
रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, मिरजेत जंक्‍शनच्या वाटचालीचा साक्षीदार म्हणून हैदरखान बावडीची ओळख आहे. सव्वाशे वर्षे तहान भागवल्यानंतर आता तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल. रेल्वे प्रशासन बोगींच्या व स्थानकाच्या स्वच्छतेसाठी फिल्टर केलेले महागडे पाणी वापरते; त्याऐवजी हैदरखान विहीरीतील पाण्याचा वापर करावा. ठिकठिकाणी सुरु असणाऱ्या रेल्वेच्या बांधकामांसाठीही ते वापरता येईल. नियमित उपशाने विहीर जिवंत राहील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com