..तर चंद्रकांतदादांना ट्रकभर नोटा आणाव्या लागतील - मुश्रीफ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

खड्डे दाखवणा-याला पैसे द्यावयाचे झाल्यास पालकमंत्र्यांना 2 हजाराच्या ट्रक भरुन नोटा आणाव्या लागतील, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. 

उत्तुर : रस्त्यावर खड्डा दाखवा आणि दहा हजार रूपये बक्षिस मिळवा, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तेवर येत्ताच जाहीर केले होते. मात्र आता जिल्ह्यातील सर्वच रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे. आता हे खड्डे दाखवणा-याला पैसे द्यावयाचे झाल्यास पालकमंत्र्यांना 2 हजाराच्या ट्रक भरुन नोटा आणाव्या लागतील, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. 

उत्तुर विभागातील नुतन सरपंच वा सदस्य यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. बहिरेवाडीचे चंद्रकांत उर्फ जंबो गोरुले यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारच्या कारभाराबाबत टीका केली. याचा संदर्भ देत आमदार मुश्रीफ म्हणाले, ""केंद्र शासनाच्या नोटाबंदीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. कर्ज माफीचा घोळ सुरुच आहे. खड्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत.'' 

वडकशिवालेचा पराभव जिव्हारी 
वडकशिवाले गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत एका केंद्रीय मंत्र्याच्या सचिवाने आपल्या भावाला उभे करुन निवडणूक जिंकली, मात्र यामुळे राष्ट्रवादीच्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा राजकिय बळी गेल्याने हा पराभव आपल्या जिव्हारी लागल्याचे आमदार मुश्रीफ या वेळी म्हणाले.