भावी पिढ्या मधुमेहाच्या चक्रव्युहात सापडण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

फूड रॅपर कागद नसतो ते प्लास्टीक असते. ही रसायने शरिराच्या कार्यात अडथळा आणतात. यामुळे विविध आजार होतात.

सांगली : आजाराला आंदण मिळाले आहे. त्यामुळे भावी पिढ्या मधुमेहाच्या चक्रव्युहात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याला रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावा लागेल, असे प्रतिपादन मधुमेहतज्ज्ञ डॉ. मिलिंद पटवर्धन यांनी केले. 

सकाळ माध्यम समूह आणि आयएमए (सांगली) यांच्या वतीने आज भावे नाट्यगृहात मधुमेहाची त्सुनामी रोखणार कशी? या विषयावर डॉ. मिलिंद पटवर्धन यांचे व्याख्यान झाले. "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी अध्यक्षस्थानी होते. शहर पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. "आयएमए'चे अध्यक्ष डॉ. बी. एम. पाटील, सावळजचे शेतकरी प्रकाश पाटील, डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते. 
शेखर जोशी म्हणाले,""डॉक्‍टर आणि समाज यांच्यात संवाद झाला पाहिजे. त्यातूनच आरोग्याची संकटे दूर होतील. संवादाचा पूल बांधण्याचे काम "सकाळ'ने केले. आयएमएच्या सहकार्याने "सकाळ' यापुढेही समाजात वैद्यकीय साक्षरता वाढीसाठी पुढाकार घेईल.'' 
प्रकाश पाटील यांनी पिकांवरील कीटकनाशकांमुळे शरिरावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. स्वागत डॉ. बी. एम. पाटील यांनी केले. सचिव डॉ. अशोक धोंडे यांनी आभार मानले. 

साखरेमुळे मधुमेह होण्याचे प्रमाण जास्त 
अनुवांशिकता, बदलती जीवनशैली, झोपेची अनियमितता, नैराश्‍य, संप्रेरकांमधील (हार्मोनल) असंतुलन यामुळे मधुमेह होतो. साखरेमुळे वजन वाढते, स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होते, स्थूलता वाढते त्यामुळे मधुमेह होतो. लठ्‌ठपणा वाढला, की मधुमेहाची शक्‍यता वाढते. त्यामुळे साखर, मिठाई कमी करावे. साखर दारुपेक्षा जास्त ऍडिक्‍ट असते. 

तरुणांवर लक्ष केंद्रीत करा 
आज मुले, तरुणांत लठ्‌ठपणा वाढत आहे. आज दहा-बारा वर्षांची मुलेही लठ्‌ठ होताहेत. कमी खाणे आणि व्यायाम वाढवूनही फरक पडत नाही. आता त्यावर जगभरात चर्चा सुरु आहे. पोट वाढलेल्या तरुणांवर लक्ष केंद्रीत करुन उपचार केले तर त्यांना मधुमेहापासून रोखता येऊ शकेल. 

फास्ट फूड, सॉफ्ट ड्रिंक म्हणजे विष 
बदलत्या जीवनशैलीत काय खावे, कधी खावे, काय खावू नये हे सांगण्याची गरज आहे. सुर्यास्तानंतर खावू नये. त्यामुळे इन्सुलीनची मात्रा घटते. मधुमेह नसणाऱ्यांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या काळातच खावे. फास्ट फूड आणि सॉफ्ट ड्रिंक म्हणजे विष आहे. जंक फूडमध्ये प्रचंड फॅट, चरबी असते, साखरेचे प्रमाण मोठे असते. आहारातील चरबीचे प्रमाण कमी करावे. 

वजन कमी करण्यास वेळ द्या 
हल्ली व्यायाम करुनही वजन कमी होत नसल्याच्या तक्रारी येतात. मात्र वजन कमी करण्यास वेळ द्या. बैठे खेळ आणि बैठ्या कामांमुळे हल्ली चालणे बंद झाले. चालण्याची गरज आहे. शहरात वाहनांमुळे सायकल चालवणेही बंद झाले आहे. रस्ते "वॉकर्स पॅराडाईज' हवेत. काही रस्ते खास चालण्यासाठी, सायकलींसाठीच ठेवावेत. 

रसायनांमुळे ऊर्जा चक्र बिघडले 
पर्यावरणात रसायनांचे प्रमाण वाढल्याने ती अन्नाच्या माध्यमातून शरिरात जातात. शरिराच्या ऊर्जा नियामक चक्राच्या कार्याय अडथळा निर्माण होतो. त्यामुळे लठ्‌ठपणा, मधुमेहास पोषक परिस्थितीत निर्माण होतेअसा सिध्दांत शास्त्रज्ञांनी मांडला आहे. पर्यावरणात अनिर्बंध रसायने हल्ली विविध माध्यमातून सोडली जातात. किटकनाशक, कीडनाशके, खते, प्लॅस्टीक यातून ही रसायने निर्माण होतात. 

पृथ्वी बनली प्लास्टिक प्लॅनेट 
हल्ली प्लास्टीकच्या बाटल्या पाण्यासाठी तसेच टिफिन जेवणासाठी वापरतात. मात्र या प्लॅस्टीकमधील रसायने पाण्यात आणि अन्नात उतरतात. फूड रॅपर कागद नसतो ते प्लास्टीक असते. ही रसायने शरिराच्या कार्यात अडथळा आणतात. यामुळे विविध आजार होतात. प्लास्टिकचा वापर एवढा अनिर्बंध झाला आहे की आपली पृथ्वी प्लॅस्टीक प्लॅनेट बनली आहे, असे वाटते. 
या सगळ्या आजारापासून दूर राहण्यासाठी प्लास्टीकचा वापर बंद करावा. घरातून, विशेष करुन स्वयंपाक घरातून प्लास्टीक हद्दपार करावा. व्यायाम करावा. सेंद्रीय अन्न खावे. सरकारने प्लॅस्टीक कलेक्‍शन केंद्र सुरु करुन त्याचे रिसायकल करावे.