हुमणी नियंत्रणाचे नियोजन कागदावरच

हुमणी नियंत्रणाचे नियोजन कागदावरच

बागायतीत प्रादुर्भाव - पिकांचे ५० टक्केपर्यंत नुकसान  

सांगली - बागायत जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांत ओलावा, अन्नपुरवठा जास्त होत असल्याने हुमणीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक फटका उसाला बसत आहे. कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाचे नियोजन कागदावरच राहिले आहे. ऊस पिकासह भात, ज्वारी, हळद पिकांवर हुमणी वाढली आहे. पिकांचे सरासरी ५० टक्केपर्यंत नुकसान होण्याची भीती आहे.  

पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंबावर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हालवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावेत. ते रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून मारावेत. ती झाडे दुसऱ्या दिवशी  कार्बारील ५० टक्के प्रवाही दोन ग्रॅम प्रतिलिटर  पाणी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के प्रवाही एक ग्रॅम प्रती लिटर पाणी या विषारी औषधाने फवारावीत जेणेकरून पाने खाऊन ती मरतील, असा प्रयत्न शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या करावा. या प्रयत्नाने अंडी घालण्यापूर्वीच भुंग्यांचा नायनाट होईल. भुंगेरे ८० ते ९० दिवस जगतात. हुमणीची एक पिढी पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो.

खोल नांगरट फायद्याची
अळीच्या बंदोबस्तासाठी नांगरट शक्‍यतो सकाळी अथवा सायंकाळी करावी. पीक काढणीनंतर लगेच १५ ते २० सेंटी मीटर खोल नांगरट करावी. जेणेकरून उघड्या पडलेल्या अळ्या गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारता येतील. आंतरमशागतीवेळी सापडणाऱ्या अळ्या गोळा करून लोखंडी खुरप्याने माराव्यात. शेतात पाणी भरताना ते जास्त वेळ साचून राहील याकडे लक्ष द्यावे. जेणेकरून साचलेल्या पाण्यात अळ्या गुदमरून नष्ट होतील. हुमणीग्रस्त शेतातील वाळू लागलेली  पिकांची रोपे उपटावीत व मुळाशेजारील अळ्यांचा नाश करावा. 

जैविक नियंत्रण
हुमणीवर नियंत्रण ठेवण्याच्या कामी तिच्या नैसर्गिक शत्रूचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार आदी. पक्षी व मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा आदी प्राणी अळ्या आवडीने खातात. परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसीयाना किंवा बिव्हेरिया बॅगोनिटी किंवा मेटॅरायझीयम ॲनसोपली यांचा वापर हेक्‍टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतातून द्यावा. जीवाणू (बॅसलिस पॉपिली) व सूत्रकृमी (हेटरो हॅब्डेटीस) हे होलोट्रॅकिया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.  त्यांचाही वापर करून हुमणीचे नियंत्रण करता येते.

हुमणीच्या नियंत्रणासाठी एकत्र मोहीम राबवून  एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास तिचे नियंत्रण लवकर होते. हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या काळासाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीच्या आत असतात. या अवस्थेत किडींचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
- सुरेश मगदूम, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’

कीटकनाशक वापरा
भुईमूग- कार्बोफयुरॉन ३ जी-३३ किलो प्रतिहेक्‍टर
फेंच घेवडा-कार्बोफयुरॉन ३ जी-२३.३ किलो प्रतिहेक्‍टर
बाजरी, ज्वारी, ऊस, भुईमूग - फोरेट-१० जी २५ किलो प्रतिहेक्‍टर        
ऊस- क्‍लोरोपायरीफॉस २० ई.सी.- ५ लिटर प्रतिहेक्‍टर (शेताला पाणी देताना पाण्यात सोडावे)
ऊस- फिप्रोनिल ०.३ जी ३३ किलो प्रतिहेक्‍टर किंवा क्‍लोरॅन्ट्रेनिलीप्रोल ०.४ जी २५ किलो प्रतिहेक्‍टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com