सांगलीत प्रदूषणाची ‘धूळ’दाण

सांगलीत प्रदूषणाची ‘धूळ’दाण

सांगली -  सांगलीत शहरात मिरवावं, असं फारकाही नसलं तरी इथली हवा शुद्ध आहे, हे बिरूदही आता हातातून सटकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सांगलीसह कुपवाड परिसरात हवेत धुळीचे वाढलेले प्रमाण चिंता वाढविणारे आहेत. येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने सर्वेक्षण करून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर केलेले हवेतील धुळीच्या प्रमाणाचे आकडे शहराचा ‘श्‍वास’ रोखणारे आहेत. 

मायक्रोग्रॅम प्रती चौरस मीटर (क्‍यूब) १०० पर्यंत  धुळीचे प्रमाण सुरक्षित मानले जाते. शहरातील राजवाडा चौक, उद्योग भवन आणि कुपवाड शहरामध्ये नोव्हेंबर २०१७ ला केलेल्या सर्वेक्षणानुसारे हे प्रमाण तब्बल २२९ मायक्रो ग्रॅमपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. काही दिवस १९४, १९६, १७४ असे प्रमाण नोंदवले गेले आहे. या महिन्यात एकूण आठ दिवस सर्वेक्षण झाले. सरासरी सहा दिवस हे प्रमाण १०० पेक्षा जास्त आढळले आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा, बाजूपट्ट्यांवरील  प्रचंड माती, वाढलेली वाहने हे प्रमुख कारण आहे. सध्या रस्त्याचे सुरू असलेले काम शंभर टक्के तांत्रिक पद्धतीने केले जात नसल्याने धुळीचे लोळ उठत आहेत.  विस्तारित भागातील एकही रस्ता डांबरीकरण झालेला नाही. त्या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून धुळीचे  प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. जोडीला जुन्या वाहनांतून प्रचंड प्रमाणात सोडला जाणारा धूर हेही कारण आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून शहरावर धुळीचे अच्छादन पसरले आहे. 

दिवसा प्रखर सूर्यप्रकाशात धुळीचे अस्तित्व डोळ्यांना जाणवत नसले तरी सायंकाळी पाचनंतरचा नजारा धडकी भरवणारा आहे. पथदिव्यांकडे नजर टाकली तरी धुळीचा एक दाट थर हवेत तरंगताना दिसतो. पहाटे धुके पडावे, असा तो नजारा असतो. शहरात व सभोवती औद्योगिक वसाहती फारशा नसल्याने इथे घातक रासायनिक धुराचे प्रमाण नगण्य आहे. अन्यथा, इथली हवा राहण्यास अयोग्य, असाच शेरा या सर्वेक्षणात मारला गेला असता.

धुळीमुळे श्‍वसन विकार झपाट्याने वाढत आहे. वैयक्तिक पातळीवर काळजी घ्यावीच, शिवाय सार्वजनिक पातळीवर काहीतर ठोस उपाय तातडीने करायला हवेत. डांबरीकरण नसल्याने धूळ जास्त आहे. रस्त्यांवर होणारे जनावरांचे मलमूत्र विसर्जन धोकादायक आहे. धूर ओकणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणावे लागतील. आयएलडी हा आजार फार वाढला आहे. त्यातील एका प्रकारावर औषधच नाही, तो जीवघेणा ठरतोय. लोकांनी प्रदूषणापासून दूर रहावे, हाच पर्याय आहे.
- डॉ. अनिल मडके, छाती विकार तज्ज्ञ

रस्त्यावर आलात तर रुमाल बांधाच
सध्या हिवाळा आहे. हवा जड आहे. धूळ फार उंच जात नाही. तिचा काही उंचीवर एक थर तरंगत राहतो. धूरही उंच न जाता आडवा प्रवास करतो. त्याचाही परिणाम दिसू लागला आहे. जे लोक घरात आहेत, त्यांना त्याचा फार त्रास जाणवत नाही, मात्र तुम्ही रस्त्यावरून प्रवास करणार असाल तर रुमाल बांधावाच लागेल. अन्यथा, सर्दी, खोकला आलाच म्हणून समजा. 
 

धूळधाण कशाने?

  •  शहरातील रस्त्यांची दुर्दशा

  •  विस्तारित भागात मुरमाचेच रस्ते

  •  बाजूपट्ट्यांवर प्रचंड माती

  •  जुन्या वाहनांचे मोठे प्रमाण

  •  रस्ते कामात तांत्रिक चुका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com