सांगली जिल्ह्यात चौदा पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

सांगली - पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चौदा पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या केल्याने खळबळ उडाली. काहीजण ‘कलेक्‍शन फेम’ म्हणून ओळखले जात होते. बदल्यांमुळे उलटसुलट चर्चा रंगली.

सांगली - पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चौदा पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या केल्याने खळबळ उडाली. काहीजण ‘कलेक्‍शन फेम’ म्हणून ओळखले जात होते. बदल्यांमुळे उलटसुलट चर्चा रंगली. पोलिस दलाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. 

याबाबत माहिती अशी - पोलिस दलातील विविध ठिकाणच्या चौदा पोलिसांच्या सायंकाळी बदल्यांचे  आदेश श्री. शर्मा यांनी काढले. त्यातील नऊजणांना पोलिस अधीक्षक कार्यालयात गार्ड नियुक्ती दिली आहे. दोघांची स्वागत कक्षाकडे बदली केली आहे. दोघांची एक खिडकी योजना कक्षाकडे, तर एकाला मोटार परिवहन विभागात पाठविले.

अनिकेत कोथळे प्रकरण, दिवसेंदिवस वाढत्या घरफोड्या, चोऱ्या, खुनी हल्ले यामुळे बदनाम होत असलेल्या पोलिस दलाची प्रतिमा पुन्हा सुधारण्यासाठी ‘साफसफाई’ ची गरज आहे. गेल्या महिन्यात  अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर शर्मा दलात सुधारणा करण्यासाठी आणि प्रतिमा उंचावण्यासाठी कोणती पावले उचलतात याकडे लक्ष लागले होते.

श्री. शर्मा यांनी आजच्या कृतीने एक प्रकारे पोलिसांना इशाराच दिल्याचे मानले जात आहे. या सर्व पोलिसांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांना दररोज सकाळी सहा वाजता राखीव पोलिस निरीक्षकांना रिपोर्ट करण्याच्या सूचनाही आहेत. यामुळे दलात खळबळ उडाली आहे. कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय निकड म्हणून बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बदली करण्यात आलेल्यांमध्ये शहर, इस्लामपूर, मिरज, विटा उपाधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे अन्वेषण, महात्मा गांधी पोलिस चौकी, कवठेमहांकाळ, उमदी, जत आदी ठिकाणच्या पोलिसांचा समावेश आहे. यात काहीजण त्या त्या ठिकाणी ‘कलेक्‍शन’ साठीच ओळखले जात होते. काहीजण वादग्रस्त ठरले होते. 

यांच्या झाल्या बदल्या
बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे (सध्याचे ठिकाण) : पोलिस अधीक्षक कार्यालयात गार्ड : ए. ए. पाटील (सांगली डीवायएसपी), अमोल ढोले (विश्रामबाग), सागर दबडे (मिरज, डीवायएसपी), राजू मानवर (मिरज ग्रामीण), व्ही. एम. निळे (महात्मा गांधी चौकी, मिरज), सी. टी. कांबळे (इस्लामपूर डीवायएसपी), अरुण पाटील (आष्टा), हिंदुराव पाटील (इस्लामपूर), प्राण माने (जत).  स्वागत कक्ष : जितेंद्र जाधव (एलसीबी), ए. जी. सगर (उमदी). एक खिडकी योजना कक्ष : ए. ए. फकीर (जत डीवायएसपी), एस. एस. बाळीगडे (कवठेमहांकाळ). मोटारवाहन परिवहन विभाग : आर. एम. मुजावर (विटा डीवायएसपी).

Web Title: Sangli News internal transfer of Police