इस्लामपूर पालिकेच्या सभेत पाणीपुरवठा, खुल्या जागेवरून गोंधळ 

धर्मवीर पाटील
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

इस्लामपूर - समान दाबाने पाणीपुरवठा आणि शहरातील खुल्या जागा व बाजारभाडे वसुली ठेका पद्धतीने देण्याच्या विषयावरून सभागृह तापले. ठेक्‍याचा विषय स्थगित करून सर्वेनंतर पाईपलाईनचा निर्णय झाला. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीमधील सदस्यांनी दिलेला राजीनामा नामंजूर करण्याचे ठरले. 

इस्लामपूर - समान दाबाने पाणीपुरवठा आणि शहरातील खुल्या जागा व बाजारभाडे वसुली ठेका पद्धतीने देण्याच्या विषयावरून सभागृह तापले. ठेक्‍याचा विषय स्थगित करून सर्वेनंतर पाईपलाईनचा निर्णय झाला. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीमधील सदस्यांनी दिलेला राजीनामा नामंजूर करण्याचे ठरले. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभापती शहाजी पाटील यांना लक्ष्य बनवत शहरात 30 टक्के भागात समान दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे आनंदराव पवार यांनी सांगितले; तर हनुमाननगरात पाणी मिळत नसल्याची तक्रार प्रतिभा शिंदे यांनी केली. जुने पाईप बदलणे व जास्त कनेक्‍शन असणाऱ्या ठिकाणांचा विचार करण्याची सूचना शहाजी पाटील यांनी केली. कागदोपत्री दाखविलेला दाब आणि प्रत्यक्षात मिळणारे पाणी याची चौकशी करण्याची मागणी शकील सय्यद यांनी केली.

पाणीप्रश्नावर प्रशासन बेजबाबदार असल्याचा आरोप विक्रम पाटील यांनी केला. 30 दिवसांत प्रभागनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले. येणाऱ्या उन्हाळ्यात नीट पाणी मिळावे, यासाठी तज्ज्ञ अधिकारी नेमून सर्वे करण्याची सूचना बाबा सूर्यवंशी यांनी केली. शहाजी पाटील आणि शकील सय्यद यांच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाहीचा निर्णय झाला. शहरातील खुल्या जागा व बाजारभाडे वसुली ठेका पद्धतीने देण्यास सूर्यवंशी आणि डांगे, शहाजी पाटील यांनी विरोध केला. यावर आनंदराव पवार-डांगे यांच्यात जुंपली. आजवर हा ठेका का निघाला नाही? ही सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची गोष्ट नाही म्हणत पवार यांनी ठेक्‍याचे समर्थन केले. उत्पन्नवाढीसाठी ठेका आवश्‍यक असल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्षांनी दिले. खोक्‍यांचा सर्वे नव्याने करणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. 

सभेच्या प्रारंभी मागील सभा व त्याच्याशी संबंधित सविस्तर माहिती मागूनही न मिळाल्याने ही सभा तहकूब करण्याची सूचना उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांनी मांडली. त्यावर मागील 18 व 27 नोव्हेंबरच्या सभेचे इतिवृत्त माहिती दिल्यावर कायम करण्याचे ठरले. विषय समित्यांच्या निर्णयांना मंजुरी देण्यास शकील सय्यद यांनी विरोध केला. समिती सभेतील निर्णय अन्य नगरसेवकांनी मान्य करावेत का? तुम्ही ठरवाल त्याला आम्ही होय म्हणायचे का, असे ते म्हणाले. त्यावर निर्णय वाचण्यात आले. परीविक्षाधीन कालावधी संपलेल्या तिघांना सेवेत कायम करण्याचा निर्णय झाला. वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून नाट्यगृह दुरुस्तीची मागणी सर्वानुमते मंजूर झाली. शिवाजी महाराज पुतळ्यास चबुतरा करण्याचे व कापूस खेड रस्ता स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी दुरुस्त करण्याचे ठरले. पेठ-सांगली रस्ता नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडियाकडे वर्ग झाला आहे. त्याला विरोध करण्याचा ठराव शहाजी पाटील यांनी मांडला. विकास आराखड्यातील आंबेडकरनगर ते कामेरी रस्ता त्यात समाविष्ट करण्याचे ठरले. लोकवस्तीत अडथळा ठरणारे पथदीप हलविण्याचे ठरले. 

काही किंमत आहे की नाही? 
पहिल्याच विषयावर तहकुबीचा प्रस्ताव मांडणाऱ्या दादासाहेब पाटील यांनी मागूनही माहिती मिळत नाही, आम्ही कामे करायची की नाहीत? आमच्या मागणीला काही किंमत आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला. 

आपापसात सूचना आणि विरोधही! 
काही मुद्द्यांवर सत्ताधारी विकास आघाडीतच मतभेद जाणवले. वसुली ठेका पद्धती आणि स्वागत कमानीला बाबा सूर्यवंशी यांनी विरोध केला. लोकोपयोगी दिशादर्शक फलकांची सूचना त्यांनी मांडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही एकीकडे कविता कांबळे यांनी कमानी उभारणीसाठीच्या नऊ जागा सुचविल्या असताना विषयाला विरोध नोंदवत 'आधी विकास करू, मग कमानी उभारू' अशी टीका शहाजी पाटील यांनी केली. 
 

Web Title: Sangli News Islampur corporation meeting