सदाभाऊ हा मुद्दा गौण; आमचं बरं चाललंय- राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

खासदार शेट्टी म्हणाले, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर शेतकऱ्यांनी जो संप केला त्याची धास्ती सरकारने घेऊन सुकाणू समितीबरोबर यशस्वी चर्चा केली.

इस्लामपूर : सदाभाऊ हा मुद्दा आता आपल्यासाठी गौण आहे. घात बघून पेरणी करणाऱ्यांचे बियाणे चांगले असेल तरच उगवेल. बियाणे चांगले नसेल तर त्याचं आपण काय करायचं? आता संघटनेचं बरं चाललं आहे, संघटना मजबूत आहे, संघटनेच्या प्रवाहाबरोबर जे चालतील ते चालतील, अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर आज दिली. 

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा घेऊन मुंबईवरुन आज खासदार राजू शेट्टी वाळवा तालुक्‍यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. इस्लामपूर शहरात जल्लोषी मिरवणूक काढल्यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, प्रवक्‍ते भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, भास्कर कदम, शहाजी पाटील प्रमुख उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर शेतकऱ्यांनी जो संप केला त्याची धास्ती सरकारने घेऊन सुकाणू समितीबरोबर यशस्वी चर्चा केली. सरसकट कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर आम्ही ठाम होतो; मात्र अनेक बडे उद्योजक, राजकीय नेते, बिल्डर, ठेकेदार, मोठ्या पगाराचे नोकरदार यांच्या नावे मोठी कर्जे आहेत. जो खरा शेतकरी आहे, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी तत्त्वतः कर्जमाफी असा उल्लेख आहे. कारण बड्या लोकांना कर्जमाफीचा लाभ होऊ नये अशी भूमिका त्यामागे सरकारची आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही भुमिका योग्य आहे. जो शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहे त्याला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. 25 जुलैच्या आत कर्जमाफीचा निर्णय झाला पाहिजे याची मुदत सरकारला दिली आहे. अन्यथा 26 जुलैपासून आम्ही आंदोलन सुरु करु. 24 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. म्हणून आम्ही सरकारला 25 जुलैची मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही सरकारला सभागृहात व सभागृहाच्या बाहेर अडवू.'' 

ते म्हणाले, "स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ करु. ते शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या वतीने पंतप्रधानांना भेटायला जाईल. पंतप्रधानांना सांगू महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. या राज्यातील शेतकऱ्यांना सातत्याने सरकारपुढे हात पसरायला लागू नये. शेतकऱ्यांची शेती शाश्‍वत करायची असेल तर धोरणात्मक दृष्टीने कृषीमुल्य आयोगाला काही अधिकार द्यावे लागतील. हमीभाव ठरवण्यासाठी स्वामिनाथन यांच्या कृषीमुल्य आयोगाची अंमलबजावणी करावी लागेल. ती अंमलबाजवणी केंद्राने करावी. कारण तसे आश्‍वासन पंतप्रधानांना तीन वर्षापुर्वीच दिले आहे. आणि ते नाही केले तर पुन्हा पुन्हा अशा घटना महाराष्ट्रात घडणार, पुन्हा पुन्हा शेतकरी अडचणीत येणार. हे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सर्व शिष्टमंडळ घेऊन ठासून पंतप्रधानांना सांगणार आहे. हा कालच्या बैठकीत ठरलेला मसुदा आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 16 जूनला दिल्लीतील गांधी भवन मध्ये देशातील प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. स्वामिनाथनची लढाई आम्ही आता देशव्यापी करणार आहोत. कारण एका राज्यात आंदोलन करुन केंद्र सरकारवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. सुदैवाने महाराष्ट्रातील आंदोलनाची धग मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणापर्यंत पोहचली आहे. कर्नाटक, आंध्र व तेलंगणा या राज्यातील लोक माझ्या संपर्कात आहेत. या सर्वांचा दबावगट केला तर महाराष्ट्र सरकारप्रमाणे केंद्राला सुध्दा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीचा निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडू. आमची तोट्यातील शेती एकदाच बाहेर काढा. आम्हाला पुन्हा पुन्हा सरकारकडे हात पसरायची वेळ येवू नये. निसर्ग आमच्या मागे लागला आहे. दुसरीकडे सरकारची धोरणे आमच्या विरोधात आहेत. त्यामुळे " सौ का साठ करना और बाप का नाम चलाना ' अशी आमची अवस्था आहे.'' 

तत्त्वतः कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी समिती दोनच दिवसात नियुक्त होईल. निकष ठरल्यानंतर लाभार्थी निश्‍चित होतील. साधारण कर्जमाफीसाठी 25 ते 30 हजार कोटी रुपयांची तरतुद करण्याची राज्य शासनाची मानसिकता असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. 

आता उसाचा दुसरा हप्ता 
शेतकरी संप, आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या उसाचा दुसरा हप्ता मागणीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. मात्र आता या विषयाकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. काही कारखानदारांनी मनासारखा दर दिला आहे; ज्यांनी नाही त्यांची साखर कशी अडवायची ते बघू असा इशारा शेट्टी यांनी दिला.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
कुणब्याच्या पोरा असंच लढत जा, सरकारला वाकवत जा !
पाक सैन्याकडून 1 जूनपासून नवव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन
विजय मल्ल्यांची 'चोर, चोर' म्हणत उडविली हुर्यो​
बीड: बिंदुसरेवरील पर्यायी रस्ताही गेला वाहून
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता
#स्पर्धापरीक्षा - 'उडान योजना'​
पुण्यातील ‘ग्रॅंड’ गणेशोत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ व्हावा!​
‘राहुल चमू’समोर मोठे आव्हान​
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी​