सांगली महापालिकेच्या सात शाळांची ‘आयएसओ’ झेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

सांगली - चोहोबाजूंनी होणारी कोंडी फोडण्यासाठी महापालिका शाळांमधील शिक्षकांनीच पुढाकार घेत गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या सात शाळांनी ‘आयएसओ ९००१ ः २०१५’ प्रमाणपत्र मिळविले आहे.

सांगली - चोहोबाजूंनी होणारी कोंडी फोडण्यासाठी महापालिका शाळांमधील शिक्षकांनीच पुढाकार घेत गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या सात शाळांनी ‘आयएसओ ९००१ ः २०१५’ प्रमाणपत्र मिळविले आहे. भौतिक साधन सुविधा उभ्या करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठी माध्यमांबद्दल पालकांच्या मनात आत्मविश्‍वास निर्माण करणे ही पालिका शाळांसमोरची आव्हाने आहेत. या पार्श्‍वभूमीवर काही शाळा आणि तिथल्या शिक्षकांची ही कामगिरी कौतुकपात्र आहे.

इंटरनॅशनल स्टॅण्डर्डायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच ‘आयएसओ’ या जगातील १६५ देश सभासद असलेल्या संस्थेचे बोधचिन्ह आहे. ही संस्था सर्व क्षेत्रांसाठी गुणवत्तेची मानके बनविते. एखाद्या संस्थेच्या कामकाजाचे मानांकन निश्‍चित करणे, त्यात सुधारणा करून गुणात्मक दर्जा उंचावणे या उद्देशाने हे मानांकन घेतले जाते. या शाळांसाठी सरकारी धोरणानुसार रेकॉर्ड भरलेले असावेत, शाळांचा परिसर स्वच्छ व दुर्गंधीमुक्त असावा, शाळेत आनंदी असे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी शैक्षणिक अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या विविध उपक्रमांत शाळांनी नियमितपणे भाग घ्यावा, अशा कमीत कमी तीन अपेक्षा ठेवून सात शाळांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गेले सहा महिने प्रयत्न सुरू ठेवले होते. 

आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी या शाळांना पालक अधिकारी नियुक्त करून त्यांच्या करवी सुमारे १५ लाख रुपयांच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्‍यक ते बळ दिले. त्यातून या अधिकाऱ्यांनी अनेक शाळांची दुरुस्ती, स्वच्छता, वृक्षारोपण, संरक्षण आदींसाठी भरीव सहकार्य दिले. विद्यार्थी संख्येअभावी अडचणीत आलेल्या पालिका शाळांना अस्तित्वासाठीच झगडावे लागत आहे. अशा वेळी ‘आयएसओ’ प्रमाणपत्र प्राप्तीच्या निमित्ताने शाळांमध्ये गुणात्मक दर्जावाढीसाठी चांगले प्रयत्न झाले. प्रशासकीय अधिकारी हणमंतराव बिराजदार व महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना याकामी प्रोत्साहन दिले. त्यातून हे यश प्राप्त झाले. यासाठी शाळांना सहकार्य करणारे रणधीर पटवर्धन यांनी नोंदवलेली निरीक्षणे महत्त्वाची आहेत. ती सर्वच शाळांना लागू पडणारी आहेत.

ते म्हणाले, ‘‘शासकीय दप्तर वेळच्या वेळी भरण्यासाठी शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुख्याध्यापकांमध्ये प्रशासकीय दृष्टिकोन घडविण्यासाठी त्यांना काही कौशल्ये शिकविण्याची गरज आहे. शाळा व्यवस्थापनासाठी निधी आणि साधनांची कमतरता जाणवली.  यानिमित्ताने अधोरेखित करावी, अशी गोष्ट म्हणजे मराठी शाळांच्या अस्तित्वापुढेच निर्माण झालेल्या आव्हानाची जाणीव सर्वच शिक्षकांना झाली असून, त्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांना शासन आणि समाजाच्या सकारात्मक मदतीची गरज आहे. शाळांनी प्रमाणपत्र प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यापुढेही निरंतर सुरू राहावेत, यासाठी आम्ही दर महिन्याला या शाळांचा आढावा घेणार आहोत. या शाळांनी अन्य शाळांसाठी मार्गदर्शक व्हावे. महापालिका शाळांचे अस्तित्व समाजातील मोठ्या वंचित वर्गासाठी गरजेचे आहे.’’

महापालिकेच्या या शाळांनी मिळविले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र -

 स्मृती चौकाजवळ, धामणी रस्ता, विश्रामबाग (शाळा क्रमांक ७), कृष्णाघाट शाळा, मिरज (२०), जिजामाता शाळा, मिरज (४), अल्लमा इकबाल ऊर्दू शाळा (४५), वाघमोडेनगर, कुपवाड (२६), बीबी आपाजान नायकवडी ऊर्दू शाळा, मिरज (१६), पुण्यश्‍लोक अहल्यादेवी शाळा, पत्र्याची चाळ, संजयनगर (शाळा क्रमांक ४२).
.............