भाजपला कॉंग्रेसचा जत पालिका निवडणूकीत दे धक्‍का... 

भाजपला कॉंग्रेसचा जत पालिका निवडणूकीत दे धक्‍का... 

जत : जत नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीत शुभांगी अशोक बन्नेनवर यांनी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. रेणुका आरळी यांचा पराभव केला. 7 नगरसेवक निवडूण आल्याने भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असल्याचे चित्र स्पष्ट झाले. नगरसेवक निवडीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबरीत राहिली. तर बहुजन समाज पक्षाने आपले खाते खोलले. विजयानंतर विजयी उमेदवारांनी फटाक्‍याची आतीषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. 

भारतीय जनता पक्षाने, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने 75 टक्‍के मतदान झाले होते. आज सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयाच्या गोडावूनमध्ये मतमोजणीस सुरवात झाली. दहा टेबलवर तीन फेऱ्यात, तर कांही प्रभागातील चार फेऱ्यात मतमोजणी करण्यात आली. नगराध्यक्ष पदाचा निकाल मात्र धक्‍कादायक लागला. भाजपची हवा असतानाही कॉंग्रेसने बाजी मारली. फेरीपासून कमी फरकाने का होईना शुभांगी बन्नेनवर यांनी आघाडी घेतली. ती शेवटच्या फेरीपर्यंत टिकून राहिली. अखेर 178 मतांनी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. रेणुका आरळी यांचा पराभव केला. त्यांना 7 हजार 219 मते मिळाली तर डॉ. आरळी यांना 7 हजार 41 मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार शबाना इनामदार यांनी 3 हजार 861 मते मिळाली. 

नगरसेवकांच्या निवडीत प्रभाग क्रमांक आठमध्ये चुरस झाली. येथे भारतीय जनता पक्षाचे प्रकाश माने यांनी कॉंग्रेसच्या फिरोज नदाफ यांचा केवळ 9 मतांनी पराभव केला. प्रभाग तीनची लढत लक्षवेधी होती. येथे माजी उपनराध्यक्ष उमेश सावंत यांच्या भारतीय जनता पक्षाकडून लढत होत्या. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते विक्रम सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विक्रम सावंत कुटूंबिय प्रचारात उतरल्याने शहराचे लक्ष या लढतीकडे लागले होते. येथे भाजपच्या दीप्ती सावंत यांनी ऐतिहासिक विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेसच्या मंदाकिनी बेळुंखी यांचा मोठया फरकाने पराभव केला. 

कायम पराभवाला सामोरे जाणाऱ्या अप्पा पवार यांनी प्रभाग क्रमांक एक मध्ये कॉंग्रेसच्या परशुराम मोरे यांचा पराभव करीत बाजी मारली. प्रभाग क्रमांक चार मधील महिलांची लढतही चुरशीची ठरली. येथे भाजपचे उमेदवार श्रीदेवी सगरे पहिल्या तीन फेरीत मागे होत्या. मात्र शेवटच्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार अनिता शिंदे यांना मागे टाकत 65 मतांनी विजय मिळविला.

प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे याचा मुलगा स्वप्नील शिंदे रिगंणात होते. त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार युवराज निकम यांना धोबीपछाड केले. लक्षवेधी ठरलेली प्रभाग क्रमांक नऊची लढत कॉंग्रेसने हरली. येथे राष्ट्रवादीच्या टिमू एडके यांनी मोहन कुलकर्णी यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक दोनमध्ये अपेक्षित रित्या कॉंग्रेसच्या साहेबराव कोळी व गायत्रीदेवी शिंदे यांचा विजय झाला. तसेच प्रभाग पाचमध्ये कॉंग्रेसने विद्यमान नगरसेवक इकबाल गवंडी यांना निवडूण आणले. 

प्रमुख विजयी : अप्पा पवार, लक्ष्मण ऐडके, स्वप्नील शिंदे (राष्ट्रवादी), दीप्ती सावंत, विजय ताड, प्रकाश माने (भाजप), गायत्रीदेवी शिंदे, इकबाल गवंडी, कोमल शिंदे (कॉंग्रेस) 

पराभूत दिग्गज : महादेव कोळी, मोहन कुलकर्णी, परशुराम मोरे, युवराज निकम, बेबीताई चव्हाण, मंदाकिनी बेळुंखी (कॉंग्रेस) विजयालक्ष्मी गुडोडगी, राजू यादव, बसवराज चव्हाण (भाजप) अप्पासाहेब कोळी, अभिजित कणसे, आनंद कांबळे (राष्ट्रवादी) 

पक्षीय बलाबल 

  • कॉंग्रेस : नगराध्यक्ष व 6 नगरसेवक 

  • भाजप : 7 नगरसेवक 

  • राष्ट्रवादी : 6 नगरसेवक 

  • बसपा : 1 नगरसेवक 

नगरपालिकेची निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय हा जनशक्‍तीचा आहे. नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळाल्याने सर्वसामान्य शहरातील जनता आमच्या पाठशी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. जनतेनी आमच्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ करु. सर्वांना घेवून शहराच्या विकासावर भर देवू. 
विक्रम सावंत 

जिल्हा बॅंकेचे संचालक 

भारतीय जनता पक्षाने पालिकेची निवडणूक ताकदीने लढविली. नगराध्यक्ष उमेदवाराचा थोडया मताने पराभव झाला असला तरी आमचे सात नगरसेवक असल्याने आम्ही नंबर वन आहोत. शहरात आमची ताकद वाढली आहे. कॉंग्रेसने पैशाच्या बळावर भ्रष्ट नगरसेवकांना निवडूण आणले आहे. त्यांच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवून कारभार करणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारचा निधी आणून शहराचा विकास करु. 
विलासराव जगताप 

आमदार 


कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या धनशक्‍तीपुढे आमचे सर्वसामान्य उमेदवार टिकाव धरु शकले नाहीत. जनतेनी दिलेला कौल मान्य आहे. आमचे निवडूण आलेले नगरसेवक पालिकेतील भ्रष्टाचारावर नजर ठेवून स्वच्छ कारभारावर भर देतील. गटा तटाच्या राजकारण न करता शहराच्या विकास करण्यासाठी सहकार्य करु 
सुरेश शिंदे, 

नेते राष्ट्रवादी 

सर्वसामान्य जनतेनी मला सेवा करण्याची संधी दिली आहे. यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. आमचे नेते डॉ. पतंगराव कदम व विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शी कारभार करणार आहे. सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेवून शहराचे मुलभूत प्रश्‍न तर सोडवणार आहेच तसेच शहराचा सर्वांगिण विकासाकरण्याचा मानस आहे. 
शुभांगी बन्नेनवर 

नगराध्यक्षा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com