जत नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदासाठी अंतर्गत खेळ्या

जत नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदासाठी अंतर्गत खेळ्या

जत -  त्रिशंकू सत्तास्थिती राहिलेल्या नगरपालिका निवडणूक निकालानंतर आता उपनगराध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या फायद्या तोट्याची गणिते अधिक निर्णायक असतील.

काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्‍याच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांना रोखण्यासाठी आमदार विलासराव जगताप यांचे यापुढेही प्रयत्न सुरूच राहतील. त्याचवेळी काँग्रेसमध्ये असताना वाटेत कायम अडसर राहिलेल्या सुरेश शिंदे यांना ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर कसे  हाताळायचे याचे आडाखे सावंत यांच्याकडून आखले जात आहेत.

नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवर विजयी झाल्या आहेत. नगरसेवकांचे संख्याबळ मात्र भाजपचे सात, काँग्रेसचे व बसपा युतीचे सात व राष्ट्रवादीचे सहा असे आहे. आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडी दरम्यानची नवी सत्तासमीकरणे सर्वांनाच जुळवावी लागतील. ती दूरगामी धोरण ठरवून असतील. काँग्रेसचा निर्णय माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या हाती आहे. राष्ट्रवादीचा निर्णय मात्र आमदार जयंत पाटील व सुरेश शिंदे यांच्या हाती असेल. जत शहराच्या राजकारणात सुरेश शिंदे यांना या निवडणुकीत बॅकफूटवर जावे लागले असले तरी सत्तासमतोलात त्यांच्या हाती काही पत्ते अजूनही आहेत. 

आमदार जगताप व जयंत पाटील यांचे सख्य पूर्वापार आहे. मात्र, आता जयंत पाटील यांनी भाजपविरोधात हल्लाबोल सुरू ठेवल्याने त्यांच्यासाठी  इथे भाजपसोबत म्हणजे जगतापांसोबत पूर्वीप्रमाणे सोबत करणे अडचणीचे असेल. त्याचा राज्यव्यापी संदेश  जाणार आहे. तथापि सुरेश शिंदे आणि जगताप यांची मैत्री सर्वज्ञात असल्याने ही आघाडी होऊ शकते.

जगताप विधानसभेची गणिते मांडून इथे राष्ट्रवादीला उपनगराध्यक्षपदाची संधी देऊ शकतात. तसे झाले तर मात्र विक्रम सावंत यांच्यापुढच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. 
आमदार जगताप राष्ट्रवादीला पाठिंबा देतील का घेतील हा प्रश्‍न जितका उत्सुकतेचा आहे तितकाच विक्रम सावंत यांच्याकडून पुढची कोणती चाल असेल हा याची देखील उत्सुकता आहे. दोन्ही बाजूने उघड हालचाली नाहीत;  मात्र अंतर्गत पातळीवर मध्यस्थांमार्फत संवादाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात काही धक्कादायक हालचाली सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com