नेमका किती निधी आणला? - जयंत पाटील

नेमका किती निधी आणला?  - जयंत पाटील

सांगली - महापालिका क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाला राज्य आणि केंद्राच्या सत्तेसाठी दोन आमदार आणि एक खासदार दिला. मात्र, त्याचे उत्तरदायित्व त्यांना पाळता आले नाही. लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर जाण्याआधी महापालिकेच्या विकासासाठी किती निधी आणला, याचा हिशेब द्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ हरिपूर (ता. मिरज) येथील बागेतील गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून झाला. त्यानंतर काँग्रेस भवनसमोरील चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. 

या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्री पाटील, महापौर हारून शिकलगार, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष संजय बजाज व काँग्रेसचे शहाराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, की देशात नोटबंदीनंतर नोटा कोणाकडे शिल्लक राहिल्या, हे सर्वांनाच माहीत आहे. भाजपचे मंत्री बॅगा भरून पैसे असल्याची भाषा करतात. कोणी कसलेही आव्हान दिले तरी ते परतविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ही वेळ विकासाचे कारभारी निवडण्याची आहे. काही नाराज झाले तरी मतदारांचा आम्हालाच प्रतिसाद आहे. आम्ही एकत्र आल्याने भाजपचा पराभव ठरला आहे. राज्यात, केंद्रात सत्ता मिळाली. मग किती निधी या शहरासाठी दिला? सांगली-मिरजेचे आमदार भाजपचे आहेत, त्यांचे काही उत्तरदायित्व नाही का?

मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत साडेसहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, दीड वर्षात त्यांनी त्यातला रुपयाही दिला नाही. ते आश्‍वासने देतात. त्यातले दहा टक्के शब्द अमलात आणत नाहीत. तेच इथेही होईल.’’

हर्षवर्धन पाटील म्हणाले, की आम्हालाच निर्विवाद बहुमत मिळेल. तुम्ही भले लोकसभेत विश्‍वास संपादन केला असेल. मात्र, इथे तुमच्यावरचा विश्‍वास उडाल्याचे ३ ऑगस्टला दिसेल. हे सरकार प्रश्‍न भिजत ठेवणारे आहे. त्यामुळे पंढरीच्या पांडुरंगालाही त्यांची पूजा नकोशी झालीय. शिवसेनेसारखा मित्रही भाजपला सांभाळता आला नाही. भाजपच्या अपप्रचाराला बळी पडू नका. वातावरण चांगले आहे म्हणून गाफीलही राहू नका.

माजी मंत्री प्रतीक पाटील म्हणाले, ‘‘आम्ही चुकलो म्हणून भोगतोय. पुन्हा तुम्ही ६० वर्षांत काय केलंय म्हणून आम्हालाच विचारता? कधी तरी या चार वर्षांत काय केले हे सांगा. आमच्यावर मतदार नाराज झाले म्हणून तुम्हाला संधी दिली. हे विसरू नका.’’

जयश्री पाटील म्हणाल्या, ‘‘वसंतदादा, मदनभाऊ, पतंगराव, आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात काँग्रेसला बळ देण्यासाठी भेद विसरून एकत्र या. पुन्हा सत्ता, हीच नेत्यांना श्रद्धांजली ठरेल.’’
या वेळी सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, करिम मेस्त्री, कमलाकर पाटील, काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश सातपुते, विशाल पाटील प्रमुख उपस्थित होते. बिपीन कदम यांनी आभार मानले.

ट्रकांनी पैसे आणले तरी तुमचा पराभवच
आमदार विश्‍वजित कदम म्हणाले, ‘२०१४ मधील मोठ्या आश्‍वासनांना आपण भुललो. आता सर्वांनाच त्याचा पश्‍चाताप होतोय. आता आश्‍वासनांबरोबर भाजपचे मंत्री बॅगा भरून पैशांची भाषा करीत आहेत. पण, ट्रकांनी पैसा आणला तरी तुमचाच पराभव ठरलेला आहे.’

शोधून हद्दपारी करू...
जयंत पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत हिशेब करण्याची भाषा केली. ते म्हणाले, की प्रशासनाकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. प्रचार परवानगीसाठी अडवणूक होते. लक्षात ठेवा, आम्ही पुन्हा सत्तेत येणार आहोत. त्या वेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शोधून तुमची इथे हद्दपारी करू की त्यावेळी हद्दपारीचा अर्थ खऱ्या अर्थाने समजेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com