कडेगावला गरीब चिमुकल्यांच्या दारी दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

गरीब, निराधार आहेत, ज्यांना दिवाळी करणे शक्‍य नाही. त्या चिमुकल्यांनाही दिवाळी करता यावी, दिव्यांनी त्यांची झोपडी उजळावी म्हणून संवेदनशील नागरिक व संस्थांनी पुढाकार घेतला. झोपडी राहणाऱ्या गरिबांच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिवाळी केल्याच्या आनंद ओसंडला. 

कडेगाव -  आयुष्यात आनंद, सौख्य, प्रेमाची बरसात करणारा सण अर्थात दिवाळी. फटाक्‍यांची आतषबाजी, फराळाचा आस्वाद, रांगोळीचा सडा, लक्ष दिव्यांनी उजळून निघणारा आसमंत. आनंद, प्रेम आणि सुखाची उधळण करीत येणारा दीपोत्सव नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व कुटुंबातील ऋणानुबंधाची वीण घट्ट करतो. गरीब, निराधार आहेत, ज्यांना दिवाळी करणे शक्‍य नाही. त्या चिमुकल्यांनाही दिवाळी करता यावी, दिव्यांनी त्यांची झोपडी उजळावी म्हणून संवेदनशील नागरिक व संस्थांनी पुढाकार घेतला. झोपडी राहणाऱ्या गरिबांच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिवाळी केल्याच्या आनंद ओसंडला. 

युवकांनी स्वातंत्र्यदिनी ‘कडेगाव स्मार्ट सिटी बनवू’ नावाने सोशल मीडिया ग्रुप सुरू केला. शहर विकासाबाबत विचार मंथन सुरु झाले. लोकसहभागातून विकासकामे सुरु झाली. नागरिक आपल्या समस्या ग्रुपवर मांडतात. कर्तव्यदक्ष प्रतिनिधी त्या सोडवतात. ग्रुपवर ‘माणुसकी धर्म’ जोपासण्याचाही विचार मांडला जातो. व्यक्ती व संस्थांच्या विधायक उपक्रमांचे कौतुक केले जाते. 

सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम समाजात वाढण्यासाठी लोकांना प्रेरणा दिली जाते. त्यातून प्रेरणा घेऊन नगरसेवक राजू जाधव यांनी दिवाळीनिमित्त आठ - दहा गरीब कुटुंबांतील मुलांना नवीन कपड्याचे वाटप केले. सावली फौंडेशनने दहा ते बारा गरीब कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले. प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाणपोई सुरु करुन लोकार्पण झाले. रुद्राक्ष फौंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत गरिबांना दिवाळी फराळ व दैनंदिन गरजेच्या वस्तू झोपडीत जाऊन भेट दिल्या.

महागाईमुळे गरिबांना दैनंदिन गरजा भागवणे शक्‍य नाही. दिवाळी पैसेवाल्यांचा सण असा समज झाला आहे. तो काही अशी खराही आहे. मात्र संवेदनशील नागरिक व संस्थांनी गरीब चिमुकल्यांना दिवाळीचा फराळ, मिठाई, दैनंदिन वस्तू व कपडे भेट दिले. चिमुकल्यांना विशेष अप्रुप वाटले. श्री. जाधव, सावली प्रतिष्ठानचे विठ्ठल खाडे, आसिफ तांबोळी व रुद्राक्ष फौंडेशनच्या काजल हवालदार, पूजा खलीपे, अर्चना माने, चेतन चौगुले, अमोल चौगुले यांचे कौतुक होत आहे.