कऱ्हाड-पंढरपूर रेल्वेमार्ग कधी होणार?

संतोष कणसे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कऱ्हाड-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी काँग्रेस केंद्रात सत्तेत होता, त्या वेळी पाठपुरावा केला. काँग्रेसच्या काळातच सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली. आता सत्ताबदल झाला आहे. पुढे कार्यवाही झाली नाही. हा रेल्वेमार्ग दुष्काळी  पट्ट्यातून जाणार आहे. विकासाला चालना मिळणार आहे. रेल्वेमार्ग मंजुरीसाठी दुष्काळी भागातील नेत्यांना एकत्र करून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू.
- पतंगराव कदम, आमदार, काँग्रेस.

कडेगाव -  कऱ्हाड-पंढरपूर रेल्वेमार्गाची मागणी दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. हा रेल्वेमार्ग झाला, तर कडेगावसह दुष्काळी पट्ट्यातील तालुक्‍याच्या विकासाला चालना तर मिळेलच, शिवाय द्राक्ष, डाळिंब आदी शेतमाल कोकणसह पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठवण्याची चांगली व्यवस्था होणार आहे. दुष्काळी टापूतील मातब्बर तगड्या नेत्यांनी या मार्गासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राजकीय ताकद पणाला लावण्याची गरज आहे. तशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

कऱ्हाड-पंढरपूर १४० किलोमीटरचा रेल्वेमार्ग व्हावा, अशी दहा वर्षांपासूनची मागणी आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने कोकण, कऱ्हाड, कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्‍यांतील वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यास रेल्वेमार्ग सोयीचा होणार आहे.

मालवाहतुकीसह अन्य विकासात्मक बाबींना चांगला उपयोग होणार आहे. दुष्काळी पट्ट्यातील डाळिंब, द्राक्षांसह शेतमालाला कोकणसह पुणे-मुंबईला पाठवण्याची व्यवस्था होणार आहे. रेल्वेमार्गामुळे छोटे-मोठे व्यवसाय वाढून नव्या बाजारपेठा विकसित होण्यास मदत होणार आहे. आर्थिक उलाढाल, रोजगार वाढीलाही चालना मिळणार आहे. रेल्वेमार्गावर होणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात जागांचा व्यावसायिक विकास होईल. त्यांच्या किमती वाढून थेट फायदा होईल. साहजिकच दुष्काळी पट्ट्यात विकासाला मदत होऊ शकते.

मागणीच्या अनुषंगाने तत्कालीन केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी कऱ्हाड-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केला. रेल्वे मंत्रालयाने कऱ्हाड-पंढरपूर मार्गाच्या सर्वेक्षणाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी दिली. सर्वेक्षण अजून का झाले नाही, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. केंद्रात सत्ताबदल होऊन भाजपची निर्विवाद सत्ता आली. त्यानंतर रेल्वेमंत्रिपदी राज्यातील सुरेश प्रभू यांची वर्णी लागली. 

नागरिकांना वाटले, आता कऱ्हाड-पंढरपूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळून दुष्काळी भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. श्री. प्रभू यांनी कऱ्हाड-पंढरपूर ऐवजी कऱ्हाड-चिपळूण मार्गासाठी मोठा निधीही मंजूर केला. या मार्गाचे भूमिपूजन झाले. कामही सुरू होईल; परंतु अजून कऱ्हाड-पंढरपूर मार्गाला मंजुरी दिली गेलेली नाही. त्यामुळे दुष्काळी भागावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

यांनी लावावी ताकद
ज्या पट्ट्यातून कऱ्हाड-पंढरपूर रेल्वे मार्ग जाणार आहे, त्या पट्ट्यात अनेक दिग्गज नेते आहेत; मात्र कऱ्हाड-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी कोणी प्रयत्न केल्याचे दिसत व ऐकावयासही मिळत नाही. खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार पतंगराव कदम, अनिल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सदाशिवराव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर आदी नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून कऱ्हाड-पंढरपूर मार्गासाठी ताकद खर्च करायला हवी, अशी या भागातील लोकांची अपेक्षा आहे.

Web Title: sangli news karad pandharpur railway