दीड हजार किलो खवा, बर्फी एसटी पार्सलमधून जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सांगलीः दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात एसटी बसमधून पार्सलने पाठवण्यात आलेला खवा आणि बर्फीचा तब्बल 1 हजार 690 किलोचा साठा अन्न प्रशासनाने आज (शुक्रवार) जप्त केला. खाद्यपदार्थांची वाहतूक व साठवणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या खवा व बर्फीत भेसळ आहे का, याची तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. केवळ खव्याची किंमत 4 लाख रुपये असून सुमारे 2 लाखांहून अधिक किंमतीची मिठाई जप्त करण्यात आली आहे.

अन्न प्रशासाने सहायक आयुक्त एस. पी. कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. खव्याचे पार्सल एसटीने येणार असल्याची माहिती मिळाल्याने या विभागाचे एक पथक सांगली शहर एसटी स्थानकावर थांबले होते. येरमाळा-कोल्हापूर एसटीतून सुमारे 200 किलो खवा आला. तो जप्त करण्यात आल्यानंतर पार्सल कार्यालयातही छापा टाकला. तेथे सुमारे 1490 किलो खवा आणि बर्फी मिळाली. या पदार्थांवर "इंडियन मिल्क स्वीट' असा ब्रॅंड आहे. शिवाय, बर्फीला "गायत्री बर्फी' आणि राधे बर्फी' अशी नावे आहेत. त्याचे नमुने घेण्यात आल्याचे श्री. कोडगिरे यांनी सांगितले.

दरम्यान, हा खवा आणि बर्फी सांगलीतीलच व्यापाऱ्यांसाठी आली होती, हेही स्पष्ट झाले आहे. प्रज्वल जाधवर आणि संजय तोरडमल यांच्या नावे हे पार्सल होते. दोघांनाही बोलावून त्यांच्या समोर नमुने घेतले गेले. अमोल जैनावर आणि बागेला यांच्याकडून हे पदार्थ बनवले जातात, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. खवा किंवा अन्य खाद्यपदार्थ तयार केल्यानंतर ते अतिशय सुरक्षित आणि स्वच्छ वाहनातून न्यावेत, असा नियम आहे. एसटी पार्सलमधून आलेले हे पदार्थ अतिशय अस्वच्छ पद्धतीने आले होते. पार्सल कार्यालयातही ते तसेच पडलेले होते. त्यामुळे अन्नातून विषबाधेचा संभव असतो, त्यामुळे त्याचे नमुने घेण्यात आले आहेत. हा खवा आणि बर्फी भेसळयुक्त आहे का, हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होईल.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :