परप्रांतीय कामगारांना 'मनसे'ने दिला चोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

कुपवाड - स्थानिक युवकांना औद्योगिक वसाहतीत काम मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत परप्रांतीय कामगार हटाओ मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश न आल्याने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुपवाड औद्योगिक वसाहतीत मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना अडवून बेदम चोप दिला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली. 

कुपवाड - स्थानिक युवकांना औद्योगिक वसाहतीत काम मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत परप्रांतीय कामगार हटाओ मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश न आल्याने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुपवाड औद्योगिक वसाहतीत मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना अडवून बेदम चोप दिला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, या प्रकारानंतर मनसेचे कुपवाड शहर प्रमुख विनय देवगोंडा पाटील (वय २०, लिंगायत गल्ली) याच्यासह सागर लक्ष्मण मगदूम (वय २२) आणि अविनाश तुकाराम मासाळ (वय २३, दोघे बजरंगनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. जितेंद्रकुमार रामेश्‍वर साह (वय २५, एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी स्थानिक युवकांनाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांना अधिक नोकऱ्या दिल्याने स्थानिक युवक बेरोजगार आहेत. यासाठी परप्रांतीय हटाओ मोहीम मनसेने सुरू केली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कुपवाड परिसरात आज आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान,  मंगळवारी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सुटी असल्याने परप्रांतीय कामगार मिळाले नाहीत. मुख्य रस्त्यावरून चालत जाणाऱ्या परप्रांतीय युवकांना मारहाण करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली. घाबरलेल्या परप्रांतीय कामगारांनी पळ काढला. त्यानंतर तातडीने कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी शहराध्यक्ष पाटीलसह तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. 

‘‘औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देण्याचा अध्यादेश २००८ मध्ये पारित करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरवा केला. मात्र दखल न घेतल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे  इथून पुढेही परप्रांतीय हटाओ मोहीम सुरूच राहील.’’
- तानाजी सावंत, 

जिल्हाध्यक्ष, मनसे, सांगली  

सोशल साईटवर बातमी व्हायरल
‘मनसे’ स्टाइल आंदोलनाचे वृत्त समजल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. सायंकाळी झालेल्या प्रकारानंतर हा प्रकार वाऱ्यासारखा सोशल साईटवर फिरला. मारहाण सुरू असताना कोणीतरी व्हिडीओ तयार करीत होते. ती व्हिडिओ क्‍लिपही व्हायरल झाली. या प्रकारामुळे औद्योगिक वसाहतीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. तीही व्हायरल झाली.

संतप्त प्रतिक्रिया
‘मनसे’ या पक्षाचा परप्रांतीयांना रोखणे, हा पक्षीय अजेंडा असू शकतो; मात्र भरचौकात युवकांना अडवून बेदम मारहाण करीत त्यांच्या गृहोपयोगी वस्तूंचीही नासधूस करण्यात आली. हे अमानवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.