सांगली जिल्ह्यात १२० ग्रामपंचायतींत ‘एलईडी’ घोटाळा

सांगली जिल्ह्यात १२० ग्रामपंचायतींत ‘एलईडी’ घोटाळा

सांगली - जिल्ह्यातील एक दोन नव्हे तर तब्बल १२० ग्रामपंचायतींनी ‘एलईडी’ बल्ब खरेदीत घोटाळा केल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. घोटाळेबहाद्दर ग्रामपंचायतीची संख्या आणखी वाढणार आहे. घोटाळ्याची रक्कम काही कोटींत आहे. फक्त १४ व्या वित्त आयोगातून बल्ब खरेदी केलेल्या ग्रामपंचायतींची ही माहिती आहे. ग्रामनिधीतूनही अनेक ग्रामपंचायतींनी घोटाळा केल्याचे समोर येत आहे. ‘सकाळ’ ने सर्वप्रथम या घोटाळ्यावर प्रकाश  टाकल्यानंतर पाठोपाठ एकेका ग्रामपंचायतीतील घोटाळे उघडकीस येत आहेत.

कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतींनी खरेदी केलेल्या एलईडी बल्ब खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. ‘सकाळ’ ने सर्वप्रथम  घोटाळ्याला वाचा फोडत अन्य ग्रामपंचायतीतही घोटाळा झाल्यावर प्रकाश टाकला. कुंडलापूर ग्रामपंचायतीची चौकशी करून ग्रामसेवक बाळू वगरेला निलंबित केले. वगरे, संबंधित सदस्यांना संपूर्ण रक्कम वसुलीची  नोटीसही दिली. कुंडलापूरनंतर नागठाणे, नागराळे, एरंडोली, मालगाव, कळंबी, कुची अशा पाठोपाठ ग्रामपंचायतीतून घोटाळे उघडकीस आले. जिल्हा परिषदेची स्थायी, अर्थ समिती तसेच तालुकापातळीवर पंचायत समितीच्या सभांत गेले दोन महिने हा विषय गाजत 
आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी घोटाळ्यासंदर्भात विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात ‘लक्षवेधी’ उपस्थित मांडली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व ग्रामपंचायतींच्या ‘एलईडी’ बल्ब खरेदीची चौकशीचे आदेश दिले. सर्व तालुक्‍यातील ‘बीडीओ’ नी माहिती संकलित केली. १४ व्या वित्त आयोगातून २४६ ग्रामपंचायतींनी ‘एलईडी’ बल्ब बसवल्याचा अहवाल प्राप्त झाला. ३५०० रुपये बाजारातील किंमत पकडली आहे. ३५०० पेक्षा अधिक दराने बल्ब खरेदी करणाऱ्या १२० ग्रामपंचायती आहेत. तर ३५०० पेक्षा कमी दराने खरेदी केलेल्या ग्रामपंचायती १२६ आहेत. ३५०० पेक्षा अधिक दराने बल्ब खरेदी केलेल्या ग्रामपंचायतीत  निश्‍चित घोटाळा झाला आहे. संबंधित ग्रामपंचायतींचे मूल्यांकन केले जाणार आहे. तांत्रिक गोष्टी मूल्यांकने तपासली जातील. किती वॉटचा बल्ब? बाजारातील किंमत किती? कोणत्या कंपनीचा बल्ब? आदी गोष्टी विद्युत अभियंत्यांमार्फत तपासल्या जातील. त्यामुळे घोटाळे केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या आणखी वाढणार आहे. प्राथमिक अहवालानुसार घोटाळ्याची रक्कम कोटीच्या आसपास आहे.

शंभरावर ग्रामसेवक अडकणार
१४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी मिळू लागला आहे. तो खर्च करण्याचे अधिकार सरपंच, ग्रामसेवकांना आहेत. बऱ्याच ग्रामपंचायतीत ग्रामसेवक, सरपंच, सदस्य आणि पुरवठादारांनी संगनमताने घोटाळा केला आहे. शंभरावर ग्रामसेवक घोटाळ्यात अडकणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

१२० ग्रामपंचायतींनी ३५०० पेक्षा जादा दराने बल्ब खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित ग्रामपंचायतींचे मूल्यांकन केले जाईल. तांत्रिक बाजू तपासल्या जातील. त्यानंतर बल्ब खरेदीचे चित्र आणखीन स्पष्ट होईल.
- अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी

मिरजेतील २४ गावांत ‘एलईडी’ घोटाळा

मिरज तालुक्‍यातील चोवीस ग्रामपंचायतींची ‘एलईडी’ बल्ब खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पदाधिकाऱ्यांनी घोटाळा करत लाखो रुपयांचा मलिदा खाल्ल्याचे चौकशीत पुढे येत आहे. एकाच दर्जाच्या बल्बसाठी तीन ते पाच हजार रुपये जादा मोजल्याचे स्पष्ट झाले आहे. 

या प्रक्रियेत सरपंच, ग्रामसेवक, ‘एमबी’ बनवणारे अधिकारी आणि पुरवठादार कंपन्यांनी साखळी केल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

पंचायत समितीत सुरुवातीला कळंबी, एरंडोली, मालगाव या ग्रामपंचायतींतील कथित घोटाळ्यांवर चर्चा झाली. काही सदस्यांनी सर्वच ग्रामपंचायतींची माहिती मागवली असता अपहाराची व्याप्ती बरीच मोठी असल्याचे लक्षात आले. एकाच पुरवठादार कंपनीने एकाच दर्जाचा बल्ब वेगवेगळ्या किमतींना पुरवला आहे. ढवळी ग्रामपंचायतीने तीस 

वॉटच्या बल्बसाठी ३ हजार सहाशे रुपये दिले आहेत. तोच बल्ब इनामधामणी ग्रामपंचायतीने १ हजार ९५० रुपयांना खरेदी केला आहे. हरिपूर ग्रामपंचायतीने ३ हजार ८३३ रुपयांत चाळीस वॉटचा बल्ब खरेदी केला. त्याच बल्बसाठी बिसूर ग्रामपंचायतीने ५ हजार २०९ रुपये मोजले आहेत. एरंडोली ग्रामपंचायतीने ५ हजार २०० रुपयांचा खर्च केला आहे. 

काही ग्रामपंचायतींच्या खरेदीचा तपशील असा -
ग्रामपंचायत        बल्बचे वॅटेज          किंमत

  • ढवळी                 ३०                ३ हजार ६००

  • खंडेराजुरी             ३०                ६ हजार

  • इनामधामणी           ३०                १ हजार ९५०

  • कळंबी                ३०                ४ हजार ६७९

  • वड्डी                   ३०                ५ हजार ५३०  

  • एरंडोली               ३०               ६ हजार

  • बोलवाड              ३०               ३ हजार

  • मालगाव               ३०              ४ हजार ६७९ 


यांतील बहुतांश बल्ब एका विशिष्ट कंपनीनेच पुरवले आहेत. 
म्हैसाळ ग्रामपंचायतीने तब्बल २३ लाख २२ हजार ४९९ रुपयांची एलईडी बल्ब खरेदी केली आहे. हरिपूर ग्रामपंचायतीने २ लाख तीस हजार, इनामधामणीने २ लाख ४६ हजार ४५०, बिसूरने ५ लाख ९७ हजार ५२९, लिंगनूरने २ लाख ४१ हजार १८६, तुंगने १ लाख ४६ हजार, नांद्रेने २ लाख ९९ हजार ६४५, कर्नाळने ५ लाख ९८ हजार ५०० रुपयांची खरेदी केली आहे. सर्वच ग्रामपंचायतींच्या किमतीत बराच फरक आहे. 

डिग्रज, हरिपूर, इनामधामणीत दमदाटी
या खरेदीची चौकशी पंचायत समितीने सुरू केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत विस्ताराधिकारी माहिती घेत आहेत. त्यावेळी त्यांना विचित्र अशा अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. पंचायत समितीच्या सभेत विस्ताराधिकारी गुरव यांनी सांगितले की, डिग्रज ग्रामपंचायतीत माहिती घेताना सरपंच अंगावर धावून आले. हरिपूरला नेत्याने सांगितले की, आम्ही एकमताने खरेदी केली आहे. तुम्हाला कशासाठी चौकशी पाहिजे, अशी विचारणा केली. इनामधामणी, तुंग ग्रामपंचायतींतही असाच अनुभव आला. 

खरेदी थांबली
तालुक्‍यातील उर्वरित ग्रामपंचायतींनीही एलईडी बल्ब खरेदीची तयारी चालवली होती; मात्र सध्या बराच गवगवा होऊ लागल्याने त्यांनी खरेदी स्थगित केली. कळंबी ग्रामपंचायतीच्या पुरवठादाराला बिल आदा करण्यास गटविकास अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com