सांगली जिल्ह्यातील कुचीमधील घोटाळ्याची ‘सीईओं’कडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सांगली - कुची (ता. कवठेमहांकाळ) येथेही एलईडी बल्ब घोटाळा झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. २८ वॉटचा बल्ब तीन हजार ८०० रुपयांना आणि ४० वॉटचा बल्ब पाच हजार ५०० रुपयांना बसवून भ्रष्टाचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

सांगली - कुची (ता. कवठेमहांकाळ) येथेही एलईडी बल्ब घोटाळा झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. २८ वॉटचा बल्ब तीन हजार ८०० रुपयांना आणि ४० वॉटचा बल्ब पाच हजार ५०० रुपयांना बसवून भ्रष्टाचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील एलईडी बल्ब घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी झाली. ग्रामपंचायतीने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता नसताना बल्ब खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे संपूर्ण रकमेची वसुली करण्याबाबत नोटीस बजावली गेली. त्यानंतर ग्रामसेवक बाळू वगरे यांना निलंबितही केले.

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील कुची गावातही एलईडी बल्ब घोटाळा झाल्याची तक्रार शरद मारुती पाटील यांनी ‘सीईओ’ राऊत यांच्याकडे नुकतीच केली. त्यात म्हटले आहे, की ग्रामपंचायतीचे जुने बल्ब असतानाही एलईडी बल्ब खरेदी केले आहेत. बाजारात २८ वॉटच्या बल्बची किंमत एक हजार ५० रुपये असतानाही तीन हजार ८०० रुपये दराने २० बल्ब बसविले आहेत; तर ४० वॉटच्या बल्बची किंमत बाजारात एक हजार ८०० रुपये असताना पाच हजार ५०० रुपयांना पाच बल्ब खरेदी केले. २०१३ ते २०१५ पर्यंतची ही माहिती आहे. मात्र, २०१६ ते २०१७ मध्ये आणखी ३० बल्ब बसविले आहेत. या प्रकरणी सरपंच आणि ग्रामसेवक यांची चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार श्री. पाटील यांनी केली आहे.

श्री. पाटील यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत ग्रामसेवकांनी जानेवारी २०१३ ते ३० जून २०१५ पर्यंतची माहिती दिली आहे. या काळात एक लाख १९ हजार ४५० रुपयांचे बल्ब खरेदी केल्याचे नमूद आहे. खरेदीसाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण दाखवून जून २०१५ नंतर खरेदी केलेल्या बल्बची माहिती दिली गेली नाही. दरम्यान, तक्रार आल्यानंतर ‘सीईओ’ राऊत यांनी तक्रारीची चौकशी केली जाईल, असे श्री. पाटील यांना सांगितले.

बोगस कंपन्यांचे कोटेशन
एलईडी बल्ब खरेदीसाठी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झालेल्या कोटेशनपैकी काही कंपन्या अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही बोगस कंपन्यांच्या नावाने कोटेशन देऊन भ्रष्टाचार करण्याचा फंडा येथेही वापरण्यात आला. त्यामुळे बोगस कोटेशन देणाऱ्यांवरही कारवाई होईल.