राजारामबापू बॅंकेत आता वाचनालयही

धर्मवीर पाटील
गुरुवार, 24 मे 2018

इस्लामपूर - ठेवी, व्याज, कर्ज आणि एकूण वित्तीय व्यवहारांच्या पलीकडे जात काही बौद्धिक आणि वैचारिक गरज पेरणारी बँक अशी कल्पना आपण कधी केली आहे का? नक्कीच नसेल ! पण पेठ (ता. वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेने हा नवा आदर्श घालून दिला आहे.

इस्लामपूर - ठेवी, व्याज, कर्ज आणि एकूण वित्तीय व्यवहारांच्या पलीकडे जात काही बौद्धिक आणि वैचारिक गरज पेरणारी बँक अशी कल्पना आपण कधी केली आहे का? नक्कीच नसेल ! पण पेठ (ता. वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेने हा नवा आदर्श घालून दिला आहे. सभासद, खातेदार, ठेवीदारांसाठी पुस्तके उपलब्ध करुन देणारी बँक म्हणून सर्वप्रथम या बँकेचे नाव घेतले जाईल.

माजी मंत्री स्व. लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९८१ साली वाळवा सहकारी बँकेची स्थापना केली. जिला अलीकडेच शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला आहे. १७४३ कोटींच्यावर ठेवी आणि १२६२ कोटींचे कर्जवाटप आहे. बँकेची मुख्य शाखा असलेल्या पेठ येथे सुमारे १५ वर्षांपासून ग्रंथालय आहे. संचालक, कर्मचाऱ्यांसाठी ते सुरू करण्यात आले. येथे सुमारे १२०० पुस्तके आहेत. बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. शामराव पाटील स्वतः विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींशी संबंधित आहेत.

बँकेच्या शिवाजीनगर-पुणे येथील ज्ञानेश्वर पादुका चौकातील शाखेने देखील १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय सुरू केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. खातेदारांनी यावे, आर्थिक व्यवहार करावेत, फावला वेळ असल्यास निवांत वाचनाचा आनंद घ्यावा, अशी साधारण कल्पना आहे. शिक्षण विभागाचे निवृत्त उपसंचालक विष्णू फरांदे यांच्या सूचनेनुसार हे ग्रंथालय सुरू केले आहे.

"सरकारने पुस्तकांचे गाव साकारले तशी बँकेतही पुस्तके असावीत, ही फरांदे यांची संकल्पना पटली. त्यातून ग्राहकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल. आपुलकी आणि जिव्हाळा वाढेल. बँकेच्या ४६ शाखांमध्ये टप्प्याटप्प्याने हा उपक्रम अस्तित्वात येईल."

- प्रा. शामराव पाटील, अध्यक्ष, राजारामबापू बँक

पुणे शाखा व्यवस्थापक संजय भाट यांच्या मते, "सहकारी बँकेतील हा पहिलाच प्रयोग आहे. ग्राहकांच्या आर्थिक गरजांबरोबर त्यांची बौध्दिक श्रीमंती वाढविण्याचा प्रयत्न आहे."

Web Title: Sangli News Library in RajaramBapu Bank