काँग्रेसचा आक्रोश म्हणजे ढोंगीपणा - मधू चव्हाण

काँग्रेसचा आक्रोश म्हणजे ढोंगीपणा - मधू चव्हाण

सांगली -  गेल्या तीन वर्षात राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने हजारो कोटींची कामे केली. दलाल बंद करुन थेट लाभार्थ्यांना फायदा दिला. नोटबंदीने दोन नंबरचे धंदे बंद पडले, त्यांचे पैसे बुडाले त्यांच्यासाठी काँग्रेसचा आक्रोश सुरु आहे, तो सामान्यांचा आक्रोश नाही. त्यामुळे काँग्रेसचा जन आक्रोश हा ढोंगीपणा असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते मधू चव्हाण यांनी आज केला. 

येत्या आठ नोव्हेंबर रोजी नोटबंदीला एक वर्ष पुर्ण होत आहे. तो दिवस भाजप काळा पैसा विरोधी दिन म्हणून साजरा करणार आहे. तर काँग्रेस यादिवशी जनआक्रोश आंदोलन करणार आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाच्या वतीने बैठका घेऊन सरकारची गेल्या तीन वर्षातील कामगिरी लोकांसमोर मांडण्यात येत आहे. त्यासाठी राज्याचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी आज सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, केदार खाडिलकर उपस्थित होते. 

श्री. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामाची आकडेवारी सादर करत विरोधकांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,"" सरकारने 34 लाख 22 कोटी रुपयांची कर्जमाफी केली. काँग्रेसच्या काळात दिलेल्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधी, बॅंकांना झाला. मात्र आम्ही दिलेल्या कर्जमाफीचा गरजवंत शेतकऱ्यांना फक्त लाभ झाला. कृषी, उद्योग, शिक्षण, सिंचन या सर्व क्षेत्रात सरकारने हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अच्छे दिन म्हणजे शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी पुरवणे ते काम केले आहे.'' 

ते म्हणाले, ""आम्ही आकडेवारीसह केलेली कामे सादर करतो, काँग्रेसने हिंमत असेल तर ती खोडून काढावी. येत्या अधिवेशनात त्यांनी यावर चर्चा करावी असे आव्हान देतो. आमचे लोकप्रतिनिधी मंत्री, पंतप्रधान, यांना भेटून कामे करुन घेतात. फाईली अडवून ठेवत नाहीत. हे अच्छे दिनच आहेत. मात्र तुमच्या काळात मंत्री याच्या टोप्या उडव, त्याच्या टोप्या उडव असली कामे करत होती.'' 

तुमचे मूल आम्ही दत्तक घेऊन वाढवले 
आमच्याच योजना भाजप सरकार राबवत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले,"" होय, तुमचेच मूल आहे. पण तुम्ही ते रस्त्यावर टाकून दिले होते. आम्ही त्याला दत्तक घेतले. वाढवले. जाहीर सभा घेऊन आम्ही बोंबलत सुटत नाही. आम्ही करून दाखवतो. मात्र काँग्रेसवाले जाहीर सभा घेऊन आमच्या नावाने बोंब मारतात. काँग्रेसला आम्ही नियमाला धरुन जशासतसे उत्तर देणार. त्यांनी आक्रोश आंदोलन सुरू केले आहे, तर आम्ही ही आठ तारखेला आंदोलन करणार गेल्या तीन वर्षात आम्ही काय केले ते सांगणार.'' 

मांडीला मांडी लावून का बसलात? 
घोटाळेबाज भाजप नावाची पुस्तिका शिवसेनेने काढल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, संजय राऊतला आम्ही किंमत देत नाही. शिवसेनेकडे हिंमत असेल तर पुस्तकातील नावांचे पुरावे द्यावेत. आम्ही जर एवढे भ्रष्ट आहोत तर मांडीला मांडी लावून का बसलात? 

पतंगरावांचे मेडिकल कॉलेज बंद पडत आले 
सरकार पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करते या पतंगराव कदमांनी केलेल्या आरोपावर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले,"" पतंगराव कदमांचे मेडिकल कॉलेज बंद पडत आले. त्यांना आता पैसे मिळणे कमी झाले. यामुळे ते आरोप करत आहेत.'' 

सरकारचा दावा 
- अमेरिका, जपान, इंग्लंड, ब्राझील, चीन यांच्यापेक्षा भारताचा विकास दर जास्त. 
- राज्यात एक लाख 29,340 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक. 
- जलयुक्त शिवार योजनेत 11494 गावे दुष्काळमुक्त झाली. 
- मागेल त्याला शेततळे योजनेत एक लाख 420 शेततळी दिली. 
- राज्यातील 384 शहरे हागणदारीमुक्त झाली. 
- नोटबंदीने 16000कोटी रुपयांचे काळे धन नष्ट झाले. 
- 56 लाख नवीन करदाते निर्माण झाले 
- 80 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली. 
- राज्याचा कृषी विकास दर 12.5 टक्‍क्‍यापर्यंत वाढला. 
- राज्यात शिक्षेचा दर 56 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com