सांगली पालिकेत माळबंगला जागेवरून हंगामा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

सांगली - माळ बंगला जागेच्या अहवालावरून महासभेत हंगामाच झाला. नगरसेवक संतोष पाटील यांनी या विषयावरून प्रशासन नगरसेवक शेखर मानेंना मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप केला. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी मात्र याप्रकरणी जागेच्या मालकीपासूनच्या अनेक मुद्यांबाबत सक्षम महसूल अधिकाऱ्यांच्या सहभागाने चौकशीची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

सांगली - माळ बंगला जागेच्या अहवालावरून महासभेत हंगामाच झाला. नगरसेवक संतोष पाटील यांनी या विषयावरून प्रशासन नगरसेवक शेखर मानेंना मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप केला. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी मात्र याप्रकरणी जागेच्या मालकीपासूनच्या अनेक मुद्यांबाबत सक्षम महसूल अधिकाऱ्यांच्या सहभागाने चौकशीची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सोमवारी अहवाल येईपर्यंत महासभा तहकूब ठेवण्याचा आदेश महापौर हारुण शिकलगार यांनी दिला. मात्र, यानिमित्ताने माळ बंगला अहवाल विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. 

महाआघाडीच्या सत्ताकाळात माळबंगला जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ७ कोटी २० लाख रुपये भरपाई देऊन भूमीसंपादन झाले होते. विजयसिंहराजे पटवर्धन यांना ही भरपाई देण्यात आली. संतोष पाटील यांनी हा विषय आठ महिने लावून धरला आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीचीच आहे, दिलेली भरपाई बेकायदेशीर आहे, भरपाईचे धनादेश तत्कालीन आयुक्तांनी अनाधिकाराने दिलेत. घेतलेली जागाही प्रत्यक्षात जागेवर नाही, असे आक्षेप आहेत. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘हा खूप मोठा आर्थिक घोटाळा आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. माने यांचा प्रशासनावर दबाव आहे. त्यामुळेच चौकशी गतीने होत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही त्यांच्याविरोधात तक्रार गेली होती. मात्र तीही गुंडाळली गेली. जिथे राज्य सरकारच माघार घेते तिथे आयुक्त काय टिकणार?’’ 
श्री. पाटील यांच्या आक्षेपावर प्रशासनाच्या वतीने नगररचनाचे सहाय्यक संचालक पेंडसे म्हणाले, ‘‘शासकीय मोजणीनंतरचा नकाशा दोन दिवसांपूर्वी मिळाला. आयुक्तांनी कार्यालयीन टिपणीवर काही मुद्दे उपस्थित करून चर्चा करण्यास सांगितले आहे. लवकरच सविस्तर अंतिम अहवाल सादर करू.’’  

आयुक्तांनी खुलासा करताना संपूर्ण प्रकरणावर आपले काटेकोर लक्ष असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘जागेची मोजणी झाली आहे. नकाशा मी पाहिलेला नाही. या जागेची मालकी कुणाची हे महसूल अधिकारीच सांगू शकतात. त्यामुळे त्यांच्या सहभागाने उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. ’’ 

गौतम पवार यांनी महापालिकेच्या एकाच नव्हे तर अनेक जागांचा प्रशासनाकडून बाजार झाला आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. एका नगरसेवक पुत्राला डीपी रस्त्याची भरपाई देताना झालेला गैरव्यवहारही उघड झाला. एसएफसी मॉलसह अनेक जागांचे व्यवहार बेकायदेशीर आहेत. त्याविरोधात माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे.’’

विष्णू माने, संजय बजाज, शेडजी मोहिते, सुरेश आवटी, विवेक कांबळे यांनी माळ बंगला जागेच्या अहवालावरून प्रशासनाला लक्ष्य केले. सभेस श्री. माने उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्यावर आज चोहोबाजूनी शाब्दिक हल्ले झाले. दोन दिवसांपूर्वी माने यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माळ बंगला जागेवरून संशय निर्माण करणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप केला. त्या आरोपाचे आज सदस्यांनी मानेंच्या अनुपस्थितीत सभागृहात उट्टे काढले.