अंकलगीत ‘मनरेगा’त लाखोंचा घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सांगली - अंकलगी (ता. जत) येथे ‘मनरेगा’अंतर्गत केलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. घोटाळ्याची चौकशी करून रोजगार सेवक, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली.

सांगली - अंकलगी (ता. जत) येथे ‘मनरेगा’अंतर्गत केलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. घोटाळ्याची चौकशी करून रोजगार सेवक, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली.

श्री. राऊत यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,  अंकलगी येथील ग्रामपंचायत कर्मचारी आणि काही सदस्यांनी संगनमताने घरातील व्यक्तींच्या नावाने घरकुले, मातीनाला बांध आणि जनावरांचे गोठे मंजूर करून घेतले आहेत. अंकलगी ते गोंधळेवाडी हा रस्ता आजपर्यंत कधीही झाला नाही. परंतु २०१३ ते २०१४ या काळात रस्त्यासाठी ६ लाख ६६ हजार  ४४९ रुपये खर्च दाखवला आहे. या रस्त्याची पाहणी करावी. 

अंकलगी ते भिवर्गी आणि अंकलगी ते आसंगी जत या रस्त्यासाठी १५ पाईप दाखवून ८ पाईपच वापरल्या आहेत. रोड रोलरचा वापर न करता बनावट पावत्यांच्या आधारे बनावट बिले काढली गेली आहेत.

राजाराम कोंडीबा गुळदगड आणि रामू लक्ष्मण माने या दोघांच्या जमिनीत कोणताही मातीनाला बांध नाही. परंतु गुळदगड यांच्या नावे १ लाख ९३ हजार रुपये आणि माने यांचे मृत वडील लक्ष्मण माने यांच्या नावे ६ लाख १३ हजार रुपये काढले आहेत. वॉटर कन्झर्व्हेशन आणि हार्वेस्टिंगअंतर्गत सुंदराबाई करडी यांच्या जागेत ७ लाख १४ हजार, चंद्रशेखर बागेळी यांच्या नावे ८ लाख ८० हजार रुपये, सुभाष हाक्के यांच्या कामावर १ लाख ९१ हजार रुपये, सर्व्हे नं. १००/२ मध्ये १३ लाख २७ हजार रुपये, बसलिंग माळी (मृत) यांच्या कामावर ७  लाख ७१ हजार रुपये, चंद्रशेखर वाघोली यांच्या कामावर २ लाख २३ हजार रुपये, सिद्धाप्पा कोळी यांच्या कामावर  ५ लाख ७७ हजार रुपये, रेवाप्पा हनमाने यांच्या कामावर १ लाख ६६ हजार रुपये खर्च दाखवला आहे.

ग्रामसेवक, रोजगार सेवक आणि संबंधित अधिकारी यांनी मनमानी कारभार करून लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यामुळे याची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी  सावित्री पट्टणशेट्टी, बुजरूक मुल्ला, राजाराम गुळदगड, रामू माने, सर्जेराव गुळदगड आदींनी केली आहे.

Web Title: sangli news manrega scam in ankalagi