मिरजेच्या कारभाऱ्यांचा पालिका तिजोरीवर दरोडा - महापौर

मिरजेच्या कारभाऱ्यांचा पालिका तिजोरीवर दरोडा - महापौर

सांगली -  एरवी महासभेत रंगणारे नाटक चक्‍क विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या रंगमंचावरच अवतरले. निमित्त होते, मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे. तेच ते ठेकेदार आणि विकासकामांच्या माध्यमातून मिरजेच्या ठराविक कारभाऱ्यांनी २० वर्षे महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचा गंभीर आरोप खुद्द महापौर हारून शिकलगार यांनीच केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा हा आरोप एखाद्या राजकीय वगनाट्याला साजेसा असाच होता.

एकांकिका समितीचे प्रमुख संतोष पाटील यांनी लावून दिलेली माळ आणि पुढे गटनेते किशोर जामदार यांनी रंगविलेली बंधुप्रेमाची संहिता आणि त्यावर महापौरांनी टाकलेला बाँबगोळा यांनी स्पर्धेपूर्वीचा अंक रंगतदार झाला. विशेष म्हणजे नेत्या जयश्री पाटील व जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासमोर हे राजकीय नाट्य रंगले.

एरवी महासभेत सांगली-मिरजेतील कारभाऱ्यांची जुगलबंदी आणि लगोलग होणारी सेटलमेंट नवी नाही. मात्र, तीच संहिता आज एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने अधिक वास्तवदर्शी ठरली. संतोष पाटील म्हणाले, ‘‘इतिहासात डोकावले तर मिरजच सांगलीच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे सारी विकास कामे-निधी तिकडेच जातो.’’ त्यांच्या या भाषणाचा रोख लक्षात घेत गटनेते किशोर जामदार यांनी मिरजेच्या व्यथा मांडताना सांगलीवर नव्हे मिरजेवर खूप मोठा अन्याय झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘खरे तर सर्व थोर नाटककार मिरजेचे आहेत. मिरजच जुने प्राचीन शहर आहे. मात्र, सारे सांगलीला नाट्यपंढरीचा बहुमान देतात. आम्हाला त्याबद्दल आक्षेप नाही. मात्र, मिरजेला पुरेसा विकास निधी मिळत नाही. फक्त आम्हा राजकीय अभिनेत्यांमुळे निधी मिरजेला जात असल्याचा भास निर्माण होतो.’’ 

या दोघांच्याही भाषणाचे संदर्भ पकडत महापौर शिकलगार यांनी आज मिरजेच्या कारभाऱ्यांवर तुफानी हल्लाच केला. ते म्हणाले, ‘‘गेली २० वर्षे मिरजेतील कारभाऱ्यांनी महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकून लूट केली आहे. प्रत्यक्षात मिरजेत दिसत काहीच नाही. केवळ दर्गा परिसरात काही कामे दिसतात. तिथलेच पाच जण कायम निवडून येतात. एवढे करूनही मिरजेची दुरवस्थाच आहे. उलट निधीसाठी गणेश तलाव, शिवाजी स्टेडियम दुरुस्तीच्या नावे कायमची दुकानदारी सुरूच आहे. तेच मिरजेचे कारभारी आहेत. तीच कामे आणि तेच ठेकेदार. सांगलीची करवसुली कायम ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. याउलट मिरजेची करवसुली ४० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाही. आमची निधी द्यायला हरकत नाही, मात्र कामे होत नाहीत, हे दुःख आहे.’’ 

सांगली-मिरज वादाच्या एकांकिकेत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनीही रंग भरत हा वाद विकासासाठी असावा, असा सल्ला देऊन स्पर्धेचे उद्‌घाटन केले. त्यांनी शहरातील सर्व रस्ते पावसाळा संपताच करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत आयुक्तांना आश्‍वस्त केले. 

येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात आयोजित उद्‌घाटन श्री. काळम-पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर हारून शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबुडकर, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, गटनेते किशोर जामदार, स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते, स्वाभिमानी आघाडीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, नगरसेवक राजेश नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. स्पर्धेचे परीक्षक मिलिंद शिंदे, संजय डहाळे, सुनील देवळेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक धनपाल खोत, दिलीप पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब गोंधळे, नगरसेविका रोहिणी पाटील, शेवंता वाघमारे, चेतन पाटील, हेमंत खंडागळे, अरुण दांडेकर, शफी नायकवडी, विलास कुलकर्णी यांच्यासह नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. प्रताप सोनावळे यांनी आभार मानले.

आयुक्तांशी सूर जुळेना 
महापौर शिकलगार यांनी आयुक्तांना जणू गर्भीत इशाराच दिला. ते म्हणाले, ‘‘आयुक्तसाहेब सांगलीत आल्यापासून त्यांचा माझ्याबद्दल काहीतरी गैसमज झाला आहे. मी वारंवार त्यांना समजावून घेतले. मात्र, त्यांचा मला होणारा त्रास काही केल्या संपत नाही. लवकरच आम्ही त्यांच्याबरोबर बैठक घेणार आहोत. त्यात सर्व काही वादावर चर्चा करू. त्यानंतरही सूर काही जुळले नाहीत तर मात्र मला माझ्या पद्धतीने फिल्डिंग लावावी लागेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com