पावणेदोन लाख लिटरनी दूध संकलन घटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

सांगली - शेतकरी संपाचा परिणाम काय होऊ शकतो, याचा बोलका आकडा दूध संकलनातून समोर आला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी सांगली जिल्ह्यात तब्बल एक लाख 75 हजार 298 लिटर दूध संकलनात घट झाल्याची नोंद आज मिरजेतील शासकीय दूध डेअरीकडे झाली. ही घट सरासरी 12 टक्के इतकी आहे. या दुधाची किंमत सुमारे एक कोटी रुपये इतकी होते. आज त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्‍यता असून, संकलनातील घट 25 ते 30 टक्के असू शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. ही आकडेवारी उद्या (ता. 3) समोर येईल.

जिल्ह्यातील दूध संकलनावर आज सुमारे 30 टक्‍क्‍यांपर्यंत परिणाम झाल्याचे जाणकारांनी सांगितले. जिल्ह्यात दररोज सुमारे 10 लाख लिटर दूध संकलन होते. एक जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. त्यात काल टॅंकर फोडणे, अडवून दूध ओतणे अशा पद्धतीने आंदोलन झाले. आक्रमक आंदोलनाची धास्ती खासगी व सहकारी दूध संघांनी घेतली आहे. त्यामुळे अनेक संघांनी आज पोलिस बंदोबस्तात टॅंकर मुंबई, पुण्याच्या दिशेने रवाना केले.