नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसमधील डझनभर प्रवासी कापले गेले

नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसमधील डझनभर प्रवासी कापले गेले
नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसमधील डझनभर प्रवासी कापले गेले

मिरज (सांगली): नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसमधील सुमारे डझनभर प्रवासी तुटलेल्या पत्र्यामुळे कापले गेले. आज (बुधवार) सकाळी साडेआकराच्या सुमारास पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर आरग ते मिरज स्थानकांदरम्यान विचित्र दुर्घटना घडली.

सर्व जखमी प्रवाशांना मिरजेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी प्रवासी नागपूर, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर, कवठेमहांकाळ भागातील आहेत. मिरज स्थानकात एक्सप्रेस येताच एकच हल्लकल्लोळ माजला. रक्तबंबाळ झालेले आणि वेदनेने किंचाळणारे प्रवासी गाडीतून बाहेर पडू लागल्याने कोणालाच काही कळत नव्हते. अपघाताचा भोंगाही वाजला नसल्याने तशीही शक्यता दिसत नव्हती. अखेर काही जखमी प्रवाशांनी स्वतःच माहीती दिल्यानंतर प्रकार स्पष्ट झाला.

आरग स्थानकाजवळ रेल्वेमार्गाला खेटून असणारा एखादा मार्गदर्शक फलक किंवा खांब याचा पत्रा तुटून लटकत होता. भरधाव निघालेल्या नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसला तो घासत गेला. रेल्वेच्या डब्यात खिडकीला टेकून बसलेल्या प्रवाशांचे हात क्षणात कापत गेले. अवघ्या मिनिटभरात डझनभर प्रवासी रक्तबंबाळ झाले. स्लिपर आणि जनरल डब्यातील प्रवासी प्रामुख्याने जखमी झाले. गाडीत एकच दंगा सुरु झाला. यादरम्यान उपचारांसाठी वैद्यकिय मदतही उपलब्ध नव्हती. तोपर्यत गाडी मिरजेपर्यंत आली होती. घटनेची माहीती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस व सुरक्षा दल, रेल्वेचे वैद्यकीय पथक मदतीला धावले. रेल्वे प्रवासी सेनेच्या महेश म्हेत्रे, संदीप शिंदे, स्थानकाबाहेरील रिक्षा चालक यांनी जखमींना पटपट रिक्षांत बसवले. मिरज शासकीय रुग्णालयात पोहोचवले. स्वच्छता निरिक्षक जीवनकुमार यांनीही रुग्णवाहीका उपलब्ध केली.

एक्सप्रेसच्या अनेक डब्यांतील आसने रक्ताने न्हाऊन निघाली होती. रेल्वे पोलिस व सुरक्षा दल घटनेची नेमकी माहीती घेत होती. या विचित्र दुर्घटनेमुळे एक्सप्रेस बराच वेळ मिरज स्थानकात थांबवून ठेवण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com