मिरज-सातारा रेल्वेमार्ग दुहेरीकरण गतीने

मिरज-सातारा रेल्वेमार्ग दुहेरीकरण गतीने

मिरज - पश्‍चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी बहुप्रतिक्षित असणारे पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण सध्या गतीने सुरू आहे. विशेषतः मिरज ते सातारा या सेक्‍शनमध्ये कामे गतीने सुरू आहेत. येत्या चार वर्षांत ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

या कामासाठी केंद्रीय मंत्रीगटाने ३ हजार ६२७ कोटी  ४७ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. पुणे ते लोंढा असे एकूण ४६७ किलोमीटर दुहेरीकरण होणार आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत दरवर्षी पाच टक्के जादा खर्च गृहीत धरला आहे; त्यामुळे याचा अंतिम खर्च ४ हजार २४६ कोटी ८४ लाख रुपयांवर जाईल. सध्या मातीकाम, विद्युतीकरण ही कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. विद्युतीकरणासाठीचे साहित्य मिरज स्थानकात मोठ्या प्रमाणात येऊन पडले आहे. विद्युत विभागाचे स्वतंत्र कार्यालयदेखील काही दिवसांत कार्यान्वित होईल.

अशी आहे स्थिती ः

  •  मिरज-पुणे (३६ स्थानके) - २८० किमी 
  •  मिरज-लोंढा - १८७ किमी
  •  सातारा-पुणे - १३८ किमी
  •  मिरज-पुणेदरम्यान सध्या ११० रेल्वेगेट
  • नव्वद टक्के जागा सध्या रेल्वेच्या ताब्यात, फक्त दहा टक्के संपादनाची गरज
  • नांद्रे-भिलवडीदरम्यान येरळा नदीवर आणि नीरा-लोणंददरम्यान नीरा नदीवर मोठे पूल
  • मिरज-पुणेदरम्यान पाच बोगदे (तीन लहान व दोन मोठे)
  • मिरज-पुणेदरम्यान दररोज धावणाऱ्या प्रवासी गाड्या- २४ (शिवाय मालगाड्या)
  • सध्याची निर्धारित गती नव्वद ते ११० किलोमीटर प्रतीतास, प्रत्यक्षात पन्नास किलोमीटरने धाव

सातारा ते पुणे मार्गावर डोंगराळ भाग असल्याने ते काम किचकट आणि वेळखाऊ असेल. दोनशे कोटींचा खर्च मातीकामासाठीच होणार आहे. यातील सर्वाधिक खर्च सातारा-पुणे टप्प्यात होईल. बोगदे, पूल, डोंगराळ भाग यामुळे या अंतरात अधिक काम करावे लागणार आहे.  मिरज ते कोल्हापूरमध्ये दोन ठिकाणी नदी क्रॉसिंग करावी लागते. तेथे दुहेरीकरणांतर्गत नवे पूल उभारावे लागतील; त्यामुळे या मार्गाचे दुहेरीकरण पुढच्या टप्प्यात होण्याची शक्‍यता आहे.

पुणे ते सातारा विद्युतीकरण लवकरच सुरू होईल. दरवर्षी चाळीस किलोमीटप्रमाणे २०२१ पर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. बंगलुरू-हुबळी आणि होस्पेट-वास्को या मार्गाचे दुहेरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे. लोंढा-पुणे दुहेरीकरणानंतर हे संपूर्ण जाळे अधिक गतिमान होईल.

हुबळी-बेंगळुरू दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुणे-मिरज-हुबळी-बेंगळुरू हा १ हजार ३६ किलोमीटरचा सर्वच टप्पा दुहेरी होणार आहे; यामुळे प्रवास अधिक गतीने आणि कमी वेळात होईल. सध्या पुणे-मिरज प्रवास सहा तासांचा आहे. संपर्कक्रांती एक्‍स्प्रेस विनाथांबा धावत साडेचार तासांचे वेळ घेते. दुहेरीकरण झाल्यास सर्व गाड्या चार तासांत  मिरजेतून पुणे गाठतील.

संपर्क क्रांतीला तर अवघा साडेतीन तासांचा वेळ लागेल. सोलापूरमार्गे दक्षिणेकडे गाड्या मिरज-बेळगावमार्गे वळवण्याचेही नियोजन असून यातून नव्या दुहेरी मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर केला जाईल. मालवाहतूकही पूर्ण क्षमतेने होणार असून त्यातून रेल्वेला चांगला महसूल मिळेल. 

रुंदीकरणाचा एक भाग म्हणून मिरज-पुणे दरम्यानचे वीस रेल्वेगेट काढून भुयारी मार्ग तयार केले आहेत. मिरज ते पुणे मार्गावर गाड्यांची सध्याची निर्धारित गती नव्वद किलोमीटर प्रतीतास आहे; प्रत्यक्षात ती पन्नास किलोमीटरच्या जवळपास रेंगाळते. क्रॉसिंग, थांबे यामुळे मंदावते. दुहेरीकरणानंतर ती ११० किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com