सांगली पालिका महासभेत राडा

सांगली पालिका महासभेत राडा

सांगली -  प्रचंड गोंधळानंतर अखेर आजची महासभा रद्द झाली. तिच्या कायदेशीरपणाबद्दल आठवडाभर उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी संशयाचे वातावरण निर्माण केले होते. आज महासभा सुरू झाली खरी; मात्र नमनालाच घडाभर तेल जाळल्यानंतर ती रद्द करण्याची नामुष्की महापौर हारुण शिकलगार आणि त्यांच्या सत्ताधारी गटावर आली. तत्पूर्वी राजदंड पळवणे, एकमेकांची उणीदुणी काढणे, अंगावर धावून जाणे, एकमेकांची पात्रता काढणे असे सर्व असंसदीय प्रकार घडले. काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध उपमहापौर गट व स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांत खेचाखेची - घोषणाबाजीचा पार धुरळा उडाला.

कायद्यात महासभा २० तारखेपूर्वी घ्यावी, असे म्हटले आहे, असे सांगत माने यांनी प्रसंगी सभा रद्द करा  अन्यथा न्यायालयात जायचा इशारा दिला होता. त्यावर सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने हा  मुद्दा प्रतिष्ठेचा करीत सभा घेणार, असा पवित्रा घेतला. आज तडीसही नेला. त्याच वेळी संतोष पाटील आणि विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी प्रसिद्धीस देऊन माने यांना अडचणीचा ठरेल, असा माळ बंगला जागेच्या भूमी संपादनाच्या प्रकरणाचा अहवाल महासभेसमोर मांडा, अशी मागणी केली होती. 

दोघांचे डाव - प्रतिडावाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी महासभा सुरू झाली. उपमहापौर विजय घाडगे यांनी व्यासपीठाऐवजी सभागृहात बैठक मारली होती. त्यांनी नेते माने यांच्यासह प्रारंभीच माईकचा ताबा घेतला. सभेच्या कायदेशीरपणाबाबत खुलासा करावा, असा आग्रह धरला. त्याचवेळी संतोष पाटील यांनी माळ बंगला जागेचा अहवाल वाचा आणि मगच सभा सुरू करा, असा आग्रह धरला.

त्यातून वादाची घोषणा-प्रतिघोषणेची फोडणी मिळाली. गोंधळ वाढतच गेला. राष्ट्रवादीचे विष्णू माने, संजय बजाज,  ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांनी सभा झालीच  पाहिजे, असा आग्रह धरला. महापौरांना सर्वांनीच वेढले. महापौरांनी घाडगे व माने यांचे निलंबन केल्याचे जाहीर केले. एकमेकांची  शेलक्‍या शब्दात उणीदुणी काढली जात होती. बघून घेण्याची भाषा झाली. अनेकांचा रक्तदाब वाढला. आयुक्त शांतपणे या साऱ्या वादाकडे पाहत  होते. 

माने यांचा हेका महापौर किंवा आयुक्तांनी खुलासा करावा, असा होता. नगरसचिव के. सी. हळींगळे यांनी सभा कायदेशीर असल्याचे उभे राहून सांगितले. मात्र माने यांनी आयुक्तांनी जाहीर करावे, असा आग्रह धरला. अधिकारी सभेला उपस्थित रहात असतील तर वेगळा खुलासा का ? असा तांत्रिक मुद्दा श्री. बजाज यांनी माईकवरून ओरडत सांगितला. सुरेश आवटी यांनी माने यांच्या गैरवर्तनावर कारवाईचा आग्रह 
शेलक्‍या शब्दात उणीदुणी काढली जात होती. बघून घेण्याची भाषा झाली. अनेकांचा रक्तदाब वाढला. आयुक्त शांतपणे या साऱ्या वादाकडे पाहत  होते. 

माने यांचा हेका महापौर किंवा आयुक्तांनी खुलासा करावा, असा होता. नगरसचिव के. सी. हळींगळे यांनी सभा कायदेशीर असल्याचे उभे राहून सांगितले. मात्र माने यांनी आयुक्तांनी जाहीर करावे, असा आग्रह धरला. अधिकारी सभेला उपस्थित रहात असतील तर वेगळा खुलासा का ? असा तांत्रिक मुद्दा श्री. बजाज यांनी माईकवरून ओरडत सांगितला. सुरेश आवटी यांनी माने यांच्या गैरवर्तनावर कारवाईचा आग्रह धरला.

या वादात माने व आवटी यांच्यात एकमेकांचे धंदे काय आहेत  याची उजळणी करण्यात आली. माने यांनी सर्वोच्च न्यायालयाने सभेत बोलायची मनाई केलेले सदस्य बोलतातच कसे ? असा टोमणा मारताच आवटी यांचा पारा चढला. हा सारा गोंधळ सुरू असताना महापौर भूमिका घेणार नसतील आम्ही सभागृहच सोडून जातो, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनीच घेतली. काही काळ या सर्व सदस्यांनी महापौरांसमोर ठिय्या मारला. हा गोंधळ सुरू असताना अचानकपणे नगरसेवक शेखर माने यांनी राजदंडाला घात घालत तो पळवला आणि सभागृह  सोडले. त्यानंतर महापौरांनी आजची सभा रद्दचा निर्णय जाहीर करीत सभानाट्यावर पडदा टाकला.

शेखर माने स्वतःला कायदेपंडित समजतात. त्यांना महासभा कायदेशीर कचाट्यात अडकवून लोकहिताच्या कामांच्या मंजुरीला खो घालायचा होता. आम्ही तो डाव ओळखून सभा रद्द केली आहे. हा अजेंडा पुढील सभेत जसाच्या तसा मंजूर करू. माळ बंगला जागेच्या मोजणीचा अहवालही आता सभागृहासमोर मांडू. माने यांच्या गुंडगिरीला जशास तसे उत्तर देऊ.
- हारुण शिकलगार, महापौर

महासभा बेकायदा असल्याने ती रद्द करा हेच आमचे म्हणणे होते. मात्र गोंधळातून आपल्या करणीवर पांघरुण घालायचा महापौरांचा डाव होता. माळ बंगला जागेच्या चौकशीसाठी आम्ही यापूर्वीच पत्र दिले होते. त्यामुळे तो अहवाल मांडायला ना कुणाची आहे? बेकायदा विषयांना पायबंद घातल्याने पित्त खवळलेल्या कारभाऱ्यांनी लक्षात ठेवावे की गाठ माझ्याशी आहे.
- शेखर माने,  नेते, उपमहापौर गट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com