महापालिकेचे कारभारी सांगलीचे वाटोळेकरी

महापालिकेचे कारभारी सांगलीचे वाटोळेकरी

तेच ठेकेदार, तीच टक्‍केवारी; तेच चिखलाचे शहर
‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीइतकेच त्या पावसाळ्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यात जीव जात असतो हे अंगवळणी पडलेय. महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि त्यावरचे खड्डे यावर होणारा खर्च लक्षात घेतला तर हा सारा पैसा जातो कुठे जातो? यादी काढा. तेच ठेकेदार, तीच टक्‍केवारी आणि दरवर्षी तोच चिखलमय अनुभव... सर्वाधिक बजेट टक्केवारीत मुरते हे उघड सत्य आहे. योग्य नियोजन होत नाही हे मूळ दुखणे आहे. महापालिकेचे कारभारी आणि अधिकारी शहराचे वाटोळेकरी, असे खेदाने म्हणायची  वेळ नागरिकांवर आली आहे. काही कळीचे मुद्दे...

पॅचवर्कचा वार्षिक उरूस
महापालिका क्षेत्रात ६०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यात ४७ किलोमीटरचे राज्यमार्ग आहेत. त्यापैकी ११ किलोमीटरच्या रस्त्यांची जबाबदारी महापालिकेने स्वतःहून घेतली आहे. यासह तीन शहरांतील विविध शंभर आणि ऐंशी फुटी असे प्रमुख रस्ते करायचे म्हटले तर ४०० कोटींचा खर्च येईल, असा प्रस्ताव महाआघाडीच्या सत्ताकाळात बीओटीच्या माध्यमातून पुढे आला होता. आता हे दिवास्वप्न वाटावे अशी आजची स्थिती आहे. महापालिका दरवर्षी रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी प्रत्येक प्रभागासाठी ५०-६० लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करते. हे पॅचवर्क म्हणजे दोन-सव्वादोन कोटींची नगरसेवकांना खिरापतच अशी स्थिती असते. डांबरी रस्त्यावर मुरूम टाकायेच उद्योग केले जातात. दरवर्षी खड्डे पडतात आणि ते बुजवण्याचे दरवर्षीचे नाटक  असते. दरवर्षी पॅचवर्कच्या निविदा प्रक्रियेत मोठा विलंब होतो त्याऐवजी पालिकेने पॅचवर्कचे स्वतःचेच युनिट तयार करून वर्षभर वेळेत पॅचवर्कची कामे होतील याची दक्षता घेतल्यास रस्त्यांचे मोठे नुकसान टळेल. 

गटारे आणि सफाईचा अभाव
वाढत्या लोकसंख्येचा ताण सहन करू शकतील अशा गटारींची कामे नव्याने पालिका क्षेत्रात झालेली नाहीत. सध्याची ड्रेनेज योजना आणि त्यावरचा खर्च आणि उत्पादकता हा सारा चिंतेचा विषय आहे. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा कार्यक्रम होत असतो. यंदाही ७० टक्के नाले साफ झाल्याचा  दावा प्रशासनाने केला आहे. खरी गरज शहरातील गटारे सफाईची आहे. ही गटारे तुंबलेल्या स्थितीत आहेत. नाले सफाई करण्याआधी शहरांतर्गत गटारांची नियमित सफाई हा पावसाळ्यापूर्वीचा प्राधान्यक्रमाचा अजेंडा हवा.

शामरावनगर बनले तळे 
पालिकेच्या नियोजनाअभावी शहराच्या उपनगरातील रस्त्यांची पार वाट लागली आहे. पहाटे झालेल्या संतधार पावसामुळे शहरातील १०० फुटी, शामरावनगर, विनायकनगर, महसूल कॉलनी परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शामरावनगर परिसरात ड्रेनेजचे काम सुरू आहे. ऐन पावसाळ्यात ठेकेदारानेही कामास जोर धरला आहे. ठेकेदाराने रस्ते उकरले आहे. तर काही ठिकाणी मुरमाचे ढीग टाकले आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात शामरावनगर परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्ते चिखलात रुतले आहेत. १०० फुटी, विनायकनगर परिसरात रस्त्यांची चाळण झाल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याने भरलेले मोठमोठे खड्डे पाहावयास मिळत आहेत. 

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर हवा
पावसाळ्यातही पॅचवर्क होऊ शकेल, असे केमिकलमिश्रित डांबर आता उपलब्ध आहे. मैग्नफिक्‍स हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व स्वामित्व हक्क असलेले रोड सरफेससाठी बॅक्‍टेरिया व फंगस विरोधक आहे. सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कने ते विकसित केले आहे. महापालिकेने अशा तंत्रज्ञानाबाबत काही प्रयोग केले पाहिजेत. 

चौकांचे काँक्रिटीकरण हवे
शहरातील प्रमुख चौक आणि परिसराचे दरवर्षी हमखास पावसाळ्यात तलावात रूपांतर होते. उदाहरणात स्टेशन चौक, पटेल चौक, मारुती रस्ता, झुलेलाल चौक तसेच मिरजेत एसटी स्थानक परिसर, पुजारी हॉस्पिटल चौक या भागात पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी यथावकाश नियोजन होईलच; मात्र त्याआधी हे प्रमुख चौकांतील रस्ते व परिसराचे काँक्रिटीकरण केल्यास येथे होणारा पॅचवर्कचा खर्च वाचू शकतो.

भुयारी गटारींकडे दुर्लक्ष
महापालिका क्षेत्रात पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी सांगली-मिरजेतील गावठाण क्षेत्रात भुयारी गटारी होत्या. त्या गटारांमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा व्हायचा.  गेल्या कैक वर्षांत या गटारांची देखभालच झालेली नाही. सांगलीत मारुती चौक ते वैरण बाजार अड्डा किंवा मिरजेत लक्ष्मी मार्केटपासून कमानवेस परिसरात आजही अशा गटारी बुजलेल्या अवस्थेत आहेत. या गटारांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे. सध्या पावसाच्या पाण्याची सारी भिस्त उघड्या गटारींवरच असल्याने तोच तो परिसर पाण्याखाली जात असतो. त्यामुळे रस्ते खराब होतात.  

नालेसफाईचा फज्जा
हायस्कूल रस्त्यावर दुकानासमोर पाणी साचल्यामुळे आज पार्किंगचा प्रश्‍न उद्‌भवला. गटारीची सफाई न झाल्यामुळे या रस्त्यावर पाणी साचले होते. बराच काळ पाण्याचा निचरा झाला नव्हता. पटेल चौक, महावीरनगर, जामवाडी, त्रिमूर्ती टॉकीज परिसर, वाहन तळ येथे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. आमराई कॉर्नरला नेहमीप्रमाणे खड्डे पाण्याने भरले गेले. कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर, काकानगर या गुंठेवारी भागात तर नागरिकांची दैना उडाली. जुना बुधगाव रस्त्यावरील अनेक उपनगरे, रेपे प्लॉट, शिंदे मळा येथेही हीच परिस्थिती अनुभवली. माधवनगर रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्यांना चिखलातूनच जावे लागले. संजयनगर पोलिस ठाण्यासमोरील रस्ता तीन वर्षांनंतरही पूर्ण न झाल्यामुळे परिसरातील सर्वांना आजही थोड्याशा पावसाने चिखलातूनच जावे लागते. 

मारुती, स्टेशन चौकात पाणी
शहरातील मारुती चौक व स्टेशन चौकात ६ महिन्यांपूर्वीच रस्ते पॅचवर्क केले होते. मात्र पहाटे झालेल्या पावसात पुन्हा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. स्टेशन चौकात पाण्याची डबकी झालेली पाहावयास मिळत आहे. तर नेहमीप्रमाणे मारुती चौक पाण्याने भरला आहे. शिवाजी मंडईमध्ये पाणी घुसल्याने भाजी विक्रेत्यांची तारंबळा उडाली. पहिल्याच पावसात स्टेशन रस्ता खराब झाल्याने केलेल्या कामाबाबत नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे.

जुना बुधगाव रस्त्यावर पाणीच पाणी
पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसानंतर वखारभाग, हायस्कूल रस्ता, पटेल चौक, महावीर नगर, आमराई परिसरात पाणीच पाणी झाले. जुना बुधगाव परिसरातील शेरीनाल्याची सफाई केल्यानंतर गाळ रस्त्याकडेलाच टाकला गेला आहे. त्याचा उठाव न झाल्यामुळे  पावसानंतर माती रस्त्यावर वाहून आली. म्हसोबा मंदिर परिसरातून वाल्मिकी आवास घरकुलपर्यंत डांबरी रस्ता काळ्या मातीने बरबटला गेला आहे. त्यामुळे वाहनधारक आणि पादचारी यांना चिखलातूनच प्रवास करावा लागत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे चिखलातून प्रवास करण्याचे दुर्भाग्य परिसरातील नागरिकांना आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com