सांगली पालिका प्रसूतिगृहाचा जीवघेणा हलगर्जीपणा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

सांगली -  महापालिकेतील प्रसूतिगृहातील डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. तीन आठवड्यांपूर्वीच भ्रूण मृत झालेले असताना गर्भातील बाळाची वाढ व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट देऊन महिलेच्या जीवाशीच खेळ केला आहे. संबंधित महिलेच्या पोटात दुखत असल्याने खासगी रुग्णालयात केलेल्या तपासणीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यामुळे  महिलेवर गर्भपाताची वेळ आली.

सांगली -  महापालिकेतील प्रसूतिगृहातील डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. तीन आठवड्यांपूर्वीच भ्रूण मृत झालेले असताना गर्भातील बाळाची वाढ व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट देऊन महिलेच्या जीवाशीच खेळ केला आहे. संबंधित महिलेच्या पोटात दुखत असल्याने खासगी रुग्णालयात केलेल्या तपासणीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यामुळे  महिलेवर गर्भपाताची वेळ आली.

याबाबत महिलेचे सासरे महादेव कुंभार (रा. गव्हर्न्मेंट कॉलनी) यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत नगरसेवक युवराज गायकवाड यांनी संबंधित डॉक्‍टरांवर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबतच्या निवेदनातील आशय असा - या महिलेची प्रारंभीपासून महापालिकेच्या प्रसूतिगृहाकडे रितसर नोंदणीनंतर नियमित तपासणी होत होती. सहा महिन्यांच्या गर्भाची वाढ तपासण्यासाठी संबंधित महिला पालिकेच्या प्रसूतीगृहात आली होती. त्या वेळी डॉ. सचिन पाटील यांनी २ जुलैला सोनोग्राफी केली. सर्व काही व्यवस्थित असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर अचानकपणे पोटदुखीचा त्रास सुरू झाला. १७ सप्टेंबरला पोटदुखी वाढली.

त्यादिवशी महापालिकेत संबंधित डॉक्‍टर उपस्थित नव्हते, त्यामुळे तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथे तपासणी केली असता भ्रूण मृत असल्याचे आढळून आले. तसेच महिलेला वाचविण्यासाठी तातडीने गर्भपात करावा  लागेल, असे सांगितले. कारण महापालिकेच्या डॉक्‍टरांनी अंधारात ठेवून हलगर्जीपणे उपचार केले असल्याचे त्या डॉक्‍टरांचे मत होते. सुनेच्या जीवितास धोका टळला तरी मोठा मनस्ताप व आर्थिक झळ सोसावी लागली.

याबाबत युवराज गायकवाड यांनी महासभेत प्रश्‍न  उपस्थित करून तातडीने दोषींवर कारवाईची मागणी  केली. आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आश्‍वासन दिले.

डॉक्‍टरांवर कारवाई करा; महिलेलेला भरपाई द्या
महापालिकेच्या आरोग्य विभागावर लाखो रुपये खर्च होतात. मात्र येथे आजही नेटका आरोग्य अधिकारीच नाही. कारभाऱ्यांनीही प्रसुतीगृह कसे निरुपयोगी होईल आणि त्या जागेचा बाजार कसा करता येईल यावरच डोळा आहे. अर्थात या ढिसाळ कारभाराचे फटके नागरिकांना बसत आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून डॉक्‍टर निलंबित करावेत व संबंधित महिलेस नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केली आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत व विभागीय आयुक्‍त यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.

स्थायीत अंडरस्टॅंडिंग नको...
महापालिकेतील अधिकाऱ्यांना निलंबनाचे भयच उरलेले नाही. त्याचे कारणही तसेच आहे. महापालिकेत आतापर्यंत कामचुकार निलंबित होतात; पण स्थायीच्या अंडरस्टॅंडिंगमधून ते पुन्हा सेवेत येतात. निलंबित होणे म्हणजे येथे जणू काही स्टारच लागल्यासारखे समजले जाते. महापालिकेचे प्रसूतिगृह गोरगरिबांचा आधार आहे. किमान येथे महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांसोबत अंडरस्टॅंडिंग करू नका, अशी लोकभावना आहे.