सात खुनांचे गूढ आजही कायम 

सात खुनांचे गूढ आजही कायम 

सांगली - सलगरे (ता. मिरज) तील डबल मर्डर...येळावीतील अनोळखी गर्भवती...जतचा पिग्मी एजंट...मुचंडीतील अनोळखी महिला...सांगलीतील शशिकांत पावसकर...इस्लामपुरातील एक खून...आणि नुकताच व्हसपेठ येथील अनोळखी महिलेचा खून अशा सात खुनांचा तपास पोलिस दफ्तरी प्रलंबित आहे. नुकताच झालेला खून वगळता इतर सहा खुनांचा तपास फाईलबंद झाला आहे. स्थानिक पोलिसांसह "एलसीबी' या खुनांचा छडा लावता आला नाही. त्यामुळे संबंधित परिसरात आज खुनाबाबतचे गूढ कायम आहे. 

खून झाल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. तपास सुरू होतो. खुनानंतर "एलसीबी' कडूनही त्याची माहिती घेतली जाते. स्थानिक पोलिसांना अपयश आले, तर "एलसीबी' कडील तंत्रज्ञान आणि खबऱ्यांचा वापर करून आरोपींना पकडले जाते. तसेच बऱ्याचदा खुनाचा छडा लावला जातो. प्रलंबित गुन्ह्याचा तपास, फरारी आरोपींना पकडण्याची जबाबदारी "एलसीबी' कडे असते. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांचा छडा "एलसीबी' ने लावला आहे. परंतु जिल्ह्यात घडलेल्या सातपैकी सहा फाईलबंद खुनाचा तपास आणि नुकताच व्हसपेठ येथील महिलेच्या खुनाचा छडा लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

सलगरे येथे म्हैसाळ पाणी योजनेच्या कालव्यात तीन वर्षांपूर्वी एका जोडप्याचा खून करून मृतदेह पोत्यात टाकल्याचे आढळले. दोन्ही मृतदेह कुजलेले आढळले होते. कवठेमहांकाळ पोलिस आणि एलसीबीने जिल्ह्यासह कर्नाटकातही शोध मोहीम राबवली. पोस्टर लावले तरीही मृतदेहाची ओळखच पटली नाही. त्यामुळे तपास फाईलबंद झाला आहे. सांगलीतील शशिकांत पावसकर या तरुणाचा हातपाय बांधून कृष्णा नदीत मृतदेह टाकल्याच्या प्रकरणाला तीन वर्षे झाली. पोलिसांनी खुनाचे कारण स्पष्ट केले. परंतु आरोपींना पकडता आले नाही. सांगली शहर, एलसीबी, गुंडाविरोधी पथकाने तपासाला हात घालूनही यश आले नाही. कवठेमहांकाळच्या पिग्मी एजंटाचा जत येथे झालेला खून अजूनही उघडकीस आणता आला नाही. 

येळावीत अडीच वर्षांपूर्वी एका गर्भवती महिलेचा हातपाय कापून निर्घृण खून केला. त्याचा छडा लावण्यास सर्वाधिक खोलवर प्रयत्न केले गेले. परंतु ओळख पटलीच नाही. मुचंडी येथील महिलेच्या खुनाचा तपास आणि इस्लामपुरातील खुनाचा तपास थांबला आहे. व्हसपेठ (ता. जत) येथे नुकताच एका महिलेचा अतिशय निर्घृणपणे खून करून मृतदेह पुरल्याचा प्रकार उघडकीस आला. या महिलेची देखील ओळख पटलेली नाही. त्यामुळे या खुनांचे गूढ आजही कायमच आहे. 

फाईल उघडली पण... 
वर्षापूर्वी "एलसीबी' ने प्रलंबित सहा खुनांच्या तपासाची फाईल पुन्हा उघडली. काही दिवस तपास केला. परंतु तपास पुन्हा फाईलबंद झाला आहे. त्यात आता आणखी एका खुनाची भर पडली आहे. त्यामुळे या खुनांचा तपास केव्हा लागणार? याची उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com