वॉन्लेसवाडीत युवकाचा धारदार शस्त्राने खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

सांगली -  मिरज रोडवरील वॉन्लेसवाडी येथील वॉन्लेस चेस्ट हॉस्पिटलच्या जुन्या ओपीडीमध्ये राहुल जयेंद्र लोंढे (वय 22) याचा डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करून भीषण खून करण्यात आला. काल (मंगळवारी) मध्यरात्रीच्या सुमारास झालेला हा खून उघडकीस आल्यानंतर या परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सांगली -  मिरज रोडवरील वॉन्लेसवाडी येथील वॉन्लेस चेस्ट हॉस्पिटलच्या जुन्या ओपीडीमध्ये राहुल जयेंद्र लोंढे (वय 22) याचा डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करून भीषण खून करण्यात आला. काल (मंगळवारी) मध्यरात्रीच्या सुमारास झालेला हा खून उघडकीस आल्यानंतर या परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, वॉन्लेसवाडी चेस्ट हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये राहुल लोंढे आपल्या कुटुंबीयांसह रहात होता. त्याच्या घरी आई, वडील आणि भाऊ असे होते. भाऊ बेळगावला असतो. काल (मंगळवारी) रात्री राहुल कुपवाडला एका भजनाच्या कार्यक्रमाला गेला होता. तेथून तो मित्राच्या वाढदिवसासाठी परत आला. मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी झाल्यानंतर तो घरी झोपण्यासाठी गेला.

मध्यरात्रीनंतर कुणीतरी त्याला हाक मारली. त्यामुळे तो उठून बाहेर आला. घरी आई एकटीच होती. वडील भारती हॉस्पिटलमध्ये नोकरीस असल्याने ते तिकडे गेले होते. 
राहुलची आई सकाळी उठल्यानंतर घरी राहुल दिसला नाही. त्यांनी नऊच्या सुमारास राहुल मित्रांसोबत बसतो तेथे जाऊन त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता, त्यांनी राहुल रात्रीच घरी गेल्याचे सांगितले. तेथून परत येताना वॉन्लेस चेस्ट हॉस्पिटलच्या जुन्या ओपीडीच्या बाहेर राहुलची चप्पल दिसले. त्यामुळे त्यांनी दार उघडून आत पाहिले असता राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यामुळे राहुलचा खून झाल्याचे उघडकीस आले. 

आणखी काहींनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलची जुनी ओपीडी बंदच असते. तेथे राहुल झोपत असे. काल रात्रीही मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करुन आल्यावर तो तेथे झोपण्यास गेला होता. मध्यरात्रीनंतर हल्लेखोर तेथे आले असावेत आणि त्यांनी राहुलच्या डोक्‍यात शस्त्राने वार करुन त्याचा खून केला असावा. तो झोपेत असताना त्याच्यावर हल्ला झाल्याने ही घटना सकाळपर्यंत समजू शकली नाही. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. खुनाचे कारण स्पष्ट नसल्याबद्दल याचे गुढ वाढले आहे. 

राहुलच्या खुनाचे वृत्त परिसरात पसरताच तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांना खुनाचे वृत्त कळताच तातडीने पोलिस तेथे पोहोचले. उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष डोके यांनीही घटनास्थळी थांबून तपास केला. 

खून खून आणि खून मालिकाच सुरू.... 
सांगली व परिसरात गेले काही दिवस खून, खून आणि खून अशी मालिकाच सुरू आहे. शहरात गेल्या महिन्याभरात झालेला हा दुसरा खून आहे. नुकत्याच झालेल्या गॅंगवॉरचं रक्‍त अजून सुकलंही नसेल तोवर आणखी एक... कोवळी मुलेही गुन्हेगारीकडे सहजपणे वळताना दिसत आहेत. राहुलचा खून हे त्याचेच द्योतक आहे. तो ब्रदर म्हणून काम करत होता. आठ दिवसांपूर्वीच त्याने एका मोठ्या हॉस्पिटलमधील नोकरी सोडली होती.