नागपंचमीसाठी कायद्यात बदल करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सांगली - शिराळा येथील नागपंचमी सण ही मोठी परंपरा आहे. ती जिवंत राहण्यासाठी कायद्यात बदल करून त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी कलम ३७७ नुसार लोकसभेत केली. 

शिराळ्यातील उत्सवावर न्यायालयाने बंदी घातली आहे. लोकसभेत श्री. शेट्टी म्हणाले,‘‘आपल्या देशात सगळ्या राज्यांत पारंपरिक सण, उत्सवांना, धार्मिक समारंभांना चालना दिली जाते. यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. ती आवश्‍यकच आहे. देशात नागपंचमी सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. प्राणिमित्र संघटनेने न्यायालयात दावा दाखल केल्याने या धार्मिक सणावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे हा सण साजरा करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

शिराळ्यात हजारो वर्षांपासून नागपंचमी साजरी केली जाते. भक्तिभावाने जिवंत नागाची पूजा  केली जाते. जगभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे रोजगार उपलब्ध होत होता. बंदीमुळे त्या साऱ्यावर संक्रांत आली आहे.  या पार्श्‍वभूमीवर नागपंचमी सण साजरा करण्यासाठी कायद्यात आवश्‍यक ते बदल करावेत. या सणाने कायदेशीर परवानगी द्यावे. असा निर्णय घेतल्यास शिराळा ग्रामस्थांसाठी हे मोठे पाऊल ठरेल, अशी मागणी त्यांनी केली.