लिहिण्याने वेदना कमी होतात यासाठी लिहीत राहीन - नवनाथ गोरे

लिहिण्याने वेदना कमी होतात यासाठी लिहीत राहीन - नवनाथ गोरे

इस्लामपूर - लिहिण्याने वेदना कमी होतात, यापुढेही लिहितच राहीन, असे प्रतिपादन युवा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते लेखक नवनाथ गोरे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूरच्यावतीने साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल नवनाथ गोरे यांचा अॅड. बी. एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. वैजनाथ महाजन अध्यक्षस्थानी होते. प्रा. शामराव पाटील, दि. बा. पाटील, प्रा. प्रदीप पाटील प्रमुख उपस्थित होते.

गोरे म्हणाले, "शिवाजी विद्यापीठात शिकताना विष्णू पावले या मित्राने लिहिते केले. दुष्काळावर काळ नावाची पहिली कथा लिहिली आणि लेखनाचा प्रवास सुरू झाला. गावाकडचे जिवंत अनुभव मांडले. दिवसा काम आणि रात्री लेखन केले. दोन वर्षे लेखन पडून होते. नंतर एका अनुदान योजनेत संधी मिळाली आणि आज हे दिवस आले. आता चौथी कादंबरी लिहीत आहे. लिहीत राहणार आहे. भोगलेले मांडणे त्रासदायक असते पण त्यानंतर त्यातून मुक्ती मिळाल्याचा आनंद होतो."

बी. एस. पाटील म्हणाले, "परिस्थिती ही सर्वात मोठी गुरू असते. दारिद्र्याचे कंगोरे आत्मभान देतात."

वैजनाथ महाजन म्हणाले, "चारुता सागरांच्या लेखनाशी धागा जोडणारे लेखन नवनाथनी केले. पुस्तकांना चांगले दिवस येत आहेत. नव्या पिढीत वाचक वाढतील. माध्यमे बदलतील पण लेखन राहील. लेखनाला पर्याय नाही. आज काय झाले हे सांगण्याची तृष्णा जिवंत असेपर्यंत साहित्याला मरण नाही."

माझी उमेद वाढली असल्याचे सांगून नवनाथ गोरे म्हणाले, "मी धडधाकट आहे. सचिन पाटील सारखा लेखक झोपून लिहितो, ही खूप मोठी प्रेरणा आहे. रणधीर शिंदेनी मला खरा धीर दिला आहे. माझ्या घरच्यांना अजूनही माहीत नाही की मी काय करतोय. पोराचे कौतुक होतेय, पोराने नाव काढले यातच त्यांना आनंद आहे. आई आजही रानात कामाला जाते. आईच्या डोळ्यांतील चमक मला प्रेरणा देते. मला ताकद मिळते."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com