‘शिराळा जाडा’, ‘जोंधळा’साठी व्हावा तांदूळ महोत्सव

‘शिराळा जाडा’, ‘जोंधळा’साठी व्हावा तांदूळ महोत्सव

शिराळा - शिराळा तालुक्‍याची आगळी-वेगळी ओळख जगप्रसिद्ध नागपंचमी, गोरक्षनाथ, समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ पैकी एक मारुती मंदिर, मातीचे वारणा धरण, चांदोली राष्ट्रीय उद्यान अशा धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे आहे. तरी पिकांत शिराळा जाडा व जोंधळा तांदूळ म्हणून वेगळी ओळख आहे. वाढत्या उसामुळे तांदळाच्या उत्पादनात हळूहळू घट होऊ लागली आहे. मात्र ‘शिराळा जाडा’ व ‘जोंधळा’ला शहरी भागातून सात्त्विक तांदूळ म्हणून चांगली मागणी आहे. त्याच्या ब्रॅंडिंगसाठी जिल्हास्तरावर तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले गेले पाहिजे.

शेतकऱ्यांना अशा पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास प्रवृत्त केल्यास तालुक्‍यातील मोठ्या व्यवसायाची संधी मिळेल. उत्पन्नाचा चांगला स्रोत म्हणूनही जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

शिराळा तालुक्‍यात भात हे प्रमुख तर उसाचे दुयम पीक. साखर कारखान्यांची संख्या व वाहतुकीची साधने वाढली, उसाला चांगला दर मिळू लागला. वर्षभर पुरेल एवढाच भात पिकवून उर्वरित क्षेत्रात ऊस घेण्याकडे कल वाढला. शिराळा जाडा तांदूळ, जोंधळा तांदूळ, गोल्ड ६४४४, देशी वाण असणारा गुलाबी (मासाडभात), वांडरभात, दोडके भात अशा जातीची पिके घेतली जात. मात्र आता त्यातील अनेक वाणांचे पीक घेणे कमी होत चालले आहे. 

शिराळा जाडा तांदूळ
हा तांदूळ इतर तांदळच्या तुलनेत जाड असतो. सत्व जादा असल्याने मागणीही जादा आहे. पुरवठ्याचा तांदूळ म्हणून ओळख आहे. जाडी कमी असल्याने भरपूर खाल्ला तरी पोट भरल्यासारखे वाटत नाही. हा तांदूळ जास्तीत जास्त शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आढळून येतो.

इंद्रायणी...
हा तांदूळ वारणा व मोरणा काठी जास्त पिकतो. सुगंधी असून चवीला चांगला आहे. मागणी मोठी आहे. विक्रीचे पीक म्हणून मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जोंधळा तांदूळ . 
याचा आकार जोंधळ्यासारखा बारीक असतो. त्याला जोंधळा भात तांदूळ म्हणतात. हाही सुगंधी असतो. इतर तांदळात थोडा मिसळून वासाचा भात करण्यासाठी  उपयोग होतो. शिंदेवाडी याच एका गावात मोठ्या  प्रमाणात पीक घेतले जाते. कमीत कमी ५० रुपये किलो दराने सांगली व कोल्हापूरकडे विक्री केली जाते.

गुलाबी  (मासाड किंवा झडगे भात, देशीवाण)
ग्रामीण भागात वेळेत भात कापणी झाली नाही तर भात शेतातच झडतो. पुढील वर्षी हेच झडगे शेतात उगावते. त्याला झडगे भात म्हणतात. भाताच्या बियाणांतील भेसळ टाळण्यासाठी तीन-चार वर्षांतून हे झडगे भाताचे पीक घेतले जाते. तांदळावरील आवरण साधारणपणे गुलाबी रंगाचे असल्याने त्यास गुलाबी व ग्रामीण भाषेत मासाड अथवा झडगे भात असेही म्हणतात. हा दुधासह किंवा भाकरी करून खाल्यास चवदार लागतो. रत्नागिरी २४, रत्नागिरी ७११, कर्जत ७, पुसा सुगंधा १ ते ७ अशी पिकेही घेतली जातात. कमी कालावधीत ती तयार होतात. कमी पावसाच्या ठिकाणीही पिके घेतली जातात.

सामान्यांना फायदा
अनेक ठिकाणी भात काढणीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी थोड्याच दिवसांत सुरू होतील. या महोत्सवाची घोषणा शासकीय स्तरावरून लवकर झाल्यास शेतकरी तांदूळ वर्ग न विकता तो तांदूळ महोत्सवासाठी ठेवेल. यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढील वर्षी उपन्न वाढीसाठी प्रयत्न होतील. त्याचा फायदा दलालांऐवजी सामान्य शेतकऱ्यांना होईल. स्थानिक लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने गांभीर्याने दाखल घेणे गरजेचे आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com