ऑनलाईन नोंदणीतील अडथळे कायम

ऑनलाईन नोंदणीतील अडथळे कायम

सांगली - राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजनेच्या घोषणेला दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी ऑनलाईन नोंदणीतील अडथळे कायम आहेत. राज्य शासनाने योजनेसाठी १५ सप्टेंबरची डेडलाईन जाहीर केली. कर्जमाफीस जिल्ह्यातील २.८० लाख पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ ५२ हजार जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. सातत्याने निकष बदलल्याने योजना मृगजळ ठरण्याची भीती आहे. 

 जून २०१६ पर्यंत थकीत कर्जदार असलेल्या दीड लाख शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी मिळणार आहेत, तर दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनी उर्वरित कर्ज भरल्यानंतर त्यांना तेवढीच माफी मिळणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना जास्तीत जास्त २५ हजार अनुदान मिळणार आहे. तीनही सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज भरत आहेत. त्याच्या  छाननीअंती पात्रता यादी जाहीर होईल. सर्व थकीत व नियमित कर्जदारांची माहिती जिल्हा बॅंकेला सादर करावी लागणार आहे. कर्जमाफीसाठी जिल्ह्यात ५२ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात दोन लाख ८० हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील, असा अंदाज आहे. त्यात दीड लाखापर्यंतचे ८९ हजार, दीड लाखांवरील २३ हजार, नियमित कर्ज भरणारे १ लाख ६७ हजार शेतकरी असतील. पात्र शेतकऱ्यांच्या तुलनेत अर्ज भरण्याची संख्या अवघी २० टक्के आहे. 

निकषात सातत्याने बदल... 
सन २००० नंतरच्या त्यातही सन २०१२ पासून ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार होता. कर्ज पुनर्गठन झालेल्यांच्या कर्जमाफीबाबत कसलाही स्पष्ट उल्लेख नव्हता. सरकारने पुनर्गठनमधील शेतकऱ्यांसह सन २००९ पासूनच्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचे जाहीर  केले. सन २०१६ मध्ये घेतलेले कर्ज त्याचवर्षी पूर्णपणे परतफेड केले असेल आणि पुन्हा २०१७ मध्ये घेतलेले कर्ज हे ३० जून २०१७ पर्यंत परतफेड केले असेल, तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकेल, कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानासाठी काही घटकांचा अपवाद करण्यात आला. बॅंक खात्याला आधारची सक्तीही केली आहे. 

डीडीसीकडून पुन्हा  माहिती मागवली... 
कर्जमाफीसाठी ऑनलाईन भरल्या गेलेल्या अर्जांची खातरजमा करण्यासाठी जिल्हा बॅंकांनी त्यांच्याकडील  सर्व कर्जदार  शेतकऱ्यांची माहिती शासनाला सादर  करावी, असे आदेश शासनाने पुन्हा काढलेत. बॅंकांकडून मिळालेल्या माहितीशी ऑनलाईन अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कर्जमाफीसाठी लाभार्थी निश्‍चिती होणार आहेत. कर्जमाफी अर्जाचे काम गतीने होण्यासाठी जिल्हा बॅंक, सेवा सोसायट्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

कर्जमाफीची अंमलबजावणी.....
कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत
१ ऑक्‍टोबर २०१७ पासून कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू  
बंद असलेली ई-सुविधा केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या सूचना
कर्जमाफीसाठी वेळेत अर्ज भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.

कर्जमाफी याद्या  फलकावर झळकणार... 
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तालुका व गावपातळीवर बॅंका, सोसायट्या व ग्रामपंचायतीत लावतील. या यादीवर तक्रार व हरकत घेण्यास संधी  आहे. यादीत कोणाच्या कुटुंबात शासकीय नोकर, आजी, माजी आमदार, खासदार व शासनाने अपात्रतेसाठी जाहीर केलेल्या निकषात बसणारा शेतकरी असेल, तर त्याविरोधात तक्रार करता येईल. हरकतही घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com